Pages

Wednesday 30 November 2011

घाटंजीत वर्तमान नगरसेवकांसाठी 'दरवाजे बंद'

नगर परिषद निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसा प्रचाराचा वेग वाढत असुन उमेदवारांच्या गृहभेटींना सुरूवात झाली आहे. घाटंजी नगर परिषदेचा गेल्या पाच वर्षांचा कार्यकाळ लक्षात घेता नगरिकांमध्ये नगरसेवकांविषयी मुळीच सहानुभूती राहिली नसुन उमेदवार भेटीसाठी येताच मतदार घरातुन काढता पाय घेत आहेत. तर काही ठिकाणी उमेदवारांसाठी घराचे दरवाजेच बंद होत असल्याने काही उमेदवारांची चांगलीच पंचाईत होत आहे. हा अनुभव प्रामुख्याने वर्तमान नगरसेवक व सत्तेत असलेल्या उमेदवारांना येत आहे. नागरिक ज्यावेळी आपल्या अडचणी व समस्या घेऊन न.प.कार्यालयात जात असत तेव्हा अनेकदा हे तथाकथित लोकप्रतिनिधी दडुन बसत. रस्त्यावर मुरूम टाकतांनाही जे भेदभाव करित होते त्या नगरसेवकांना आता घरी उभेच करायचे नाही अशी अनेक घाटंजीकरांची मानसिकता झाली आहे. उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप होण्याच्या तिन दिवसांपुर्वीच एका राजकीय पक्षाने मोठमोठे होर्डींग्स व लाऊडस्पिकरच्या कर्णकर्कश आवाजात प्रचाराला सुरूवात करून आपल्या उताविळपणाचा परिचय दिला. गेल्या तिन दिवसात खोटारडी आश्वासने व पोकळ घोषणांच्या आवाजानेच घाटंजीकरांची झोप उघडत आहे. लाऊडस्पिकरच्या आवाजासंबंधी सर्व नियम मोडीत निघत असुन सुद्धा प्रशासन यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत आहे. सकाळी ९ वाजल्यानंतरच लाऊडस्पिकर वाजविण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.
गेल्या काही वर्षात ‘विकास’ हा शब्दच घाटंजीकरांसाठी नवलाईचा आहे. सध्या घाटंजीच्या सर्वांगीन विकासाची खात्री देणा-यांनी गेल्या अडीच वर्षात काय दिवे लावले असा प्रश्न पुढे येत आहे. पाच वर्षाच्या छळाचे उत्तर देण्याची हिच खरी वेळ आहे याच भावनेतुन आता अनेक मतदारांची विद्यमान नगरसेवक असलेल्या उमेदवारांविषयी नकारघंटा असल्याचे चित्र आहे. यामध्ये केवळ सत्तेत असलेलेच नव्हे तर विरोधकानाही जनतेच्या प्रासंगिक संतापाचा सामना करावा लागत आहे. नुकताच एका पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग क्र. १ मध्ये लाऊडस्पिकरच्या कर्कश  आवाजात गृहभेटी घेतल्या. ज्या ठिकाणी आपली डाळ शिजणार नाही याची त्यांना खात्री होती तेथे जाणेच या उमेदवारांनी टाळल्याने ते किती पाण्यात आहेत हे सर्वांनाच लक्षात आले. जुन्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली नविन उमेदवारांकडे मतदार आशेने पहात असुन नवख्या तसेच पुर्वानुभवी उमेदवारांना यावेळी मतदार संधी देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
साभार:- देशोन्नती

रिव्हॉल्व्हरच्या धाकावर गावात धुमाकुळ घालणा-याला अटक

तालुक्यातील साखरा येथे रिव्हॉल्व्हर चा धाक दाखवुन गावात धुमाकूळ घालणा-या ईसमास गावक-यांनी पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी विनु (मन्नु) वसंता झाडे (वय ३२) रा.घोटी हा सकाळी ८ वाजताच्या सुमारास राजुरवाडी (कोठा) येथे आला. त्याने देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर चा धाक दाखवुन गोंधळ घालायला सुरूवात केली. गावातील त्याच्या एका नातेवाईकाच्या डोक्याला त्याने रिव्हॉल्व्हर लावुन धमकाविल्याचेही सांगण्यात येत आहे. एक व्यक्ती रिव्हॉल्व्हर घेऊन गावात धिंगाणा घालत असल्याची वार्ता गावक-यांमध्ये पसरताच लोकांनी एकत्र येऊन सदर ईसमाला पकडले. त्यानंतर पोलीसांना कळवुन त्याला ताब्यात देण्यात आले. आरोपीजवळ देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर, देशी कट्टा काडतुसे व चाकु जप्त करण्यात आला. आरोपी विरूद्ध विवीध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कापुस भाववाढीसाठी घाटंजी बंदला प्रतिसाद

 
कापसाला ६ हजार रूपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी घाटंजी तालुक्यात आंदोलनांचे सत्र अजुनही सुरूच असुन शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ घाटंजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. व्यापारी वर्गाने या बंदला सकारात्मक प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. रसिकाश्रयचे महेश पवार यांचे नेतृत्वात शेतकरी व युवकांनी शहरात फिरून बंद ठेवण्याचे आवाहन केले. शालेय प्रतिष्ठाने व वाहतुक सुरू होती.
तालुक्यातील साखरा येथे भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजयुमोचे तालुका अध्यक्ष राजु शुक्ला, सरचिटणीस गणेश चव्हाण, यांचेसह प्रदिप राठोड, अशोक राठोड, रामलाल पवार, साधुलाल चव्हाण, मोतीलाल चव्हाण, दिनेश चव्हाण, बंडु जाधव, उल्हास जाधव, विष्णु दंडाजे, निशेल राठोड, दिनेश पवार, अरविंद जाधव, चंद्रकांत राठोड, सुनिल राठोड, संदिप चव्हाण, शिवलाल पवार, हरसिंग जाधव, लाला राठोड, नितीन राठोड, रिंकु नगराळे, विजय डंभारे, अरविंद राठोड, कैलास चौधरी, राहुल खांडरे, तणव वाघ, विशाल भोंग, स्वप्निल मंगळे, विशाल कदम यांनी सहभाग घेतला.

एस.पी.एम.विद्यालयाला आदर्श पाठशाला पुरस्कार


स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालीत एस.पी.एम. विद्यालयाला आदर्श पाठशाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्यालयात नुकतेच महात्मा गांधी राष्ट्रभाषा हिन्दी प्रचार संस्था पुणे द्वारा राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय राष्ट्रभाषा हिन्दी प्रतियोगीता परिक्षेत संस्थेतील सुमारे ६७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबा भोंग यांना आदर्श प्रधानाचार्य व हिन्दी शिक्षक दिपक सपकाळ यांना राष्ट्रभाषा भुषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. आदर्श पाठशाला पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष सद्रुद्दीनभाई गिलानी यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी माजी खासदार सदाशिव ठाकरे, संस्थेचे सचिव अनिरूद्ध लोणकर, संजय गढीया, गिलानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.शहजाद, एस.पी.एम कॉन्व्हेंट चे मुख्याध्यापक महेश शुक्ला, प्रोजेक्ट डायरेक्टर आलिया शहजाद, यांची उपस्थिती होती. या परिक्षेत एस.पी.एम.विद्यालयातील प्रशांत आडे, प्रशिक मुरार, स्नेहल लोटे, स्वाती शेंदरे, समिक्षा कांबळे, अजय वासेकर, संतोष गंपावार, एस.पी.एम.कन्या शाळेतुन काजल लेखनार, काजल राठोड, वैशाली पांढरमिसे, एस.पी एम.कॉन्व्हेन्ट मधुन दर्शिका जैन, जान्हवी चौधरी, सलोनी जैस्वाल या विद्याथ्र्यांनी परिक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करून सुवर्णा पदक पटकावले. विद्याथ्र्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व संचालक, शिक्षक व कर्मचारी वृंदाने कौतुक केले आहे.



स्व. इंदिराबाई भोयर अध्यापक विद्यालयात छात्रसंसदेचे गठण
येथिल स्व.सौ.इंदिराबाई भोयर अध्यापक विद्यालयात  डि.टी.एड.प्रथम वर्षाच्या वतीने छात्रसंसद व विवीध समित्यांचे गठण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राठोड, प्रा.सौ.भेंडे, प्रा.वाघमारे, श्रीमती डंभारे, श्रीमती ठाकरे, प्रा.वैश्य यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थापीत करण्यात आलेल्या विवीध समित्यांमध्ये सांस्कृतीक, संचालन व नियोजन समिती मध्ये वर्षा कदम, नकुल जाधव, खिमजी जाधव यांची नेमणुक प्रा.गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्वच्छता व बाह्य प्रात्यक्षीक समिती मध्ये साईलिला कल्यमवार, कल्पना येल्टीवार, अमोल शापेकर यांची नेमणुक प्रा.सौ.ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. क्रिडा, शिस्त व दंड समिती मध्ये पवन वाघाडे, अजय राठोड व दुर्गा कोवे यांची नेमणुक प्रा.वैश्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहल समिती मध्ये कस्तुरी बोबडे, स्वप्निल जाधव, अभिजीत भारती यांची नेमणुक प्रा.वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच प्रसिद्धी व अहवाल लेखन समिती मध्ये वैभव मलकापुरे, अमोल वाघाडे, श्वेता झाडे, राहुल गेडाम, रूपाली सोनुले, स्वप्निल जाधव यांची नेमणुक करण्यात आली. त्याचप्रमाणे डि.टी.एड. प्रथम वर्षाचे छात्राध्यापक अभिजीत भारती व कस्तुरी बोबडे यांची वर्गप्रतिनिधी तर वैष्णवी निकम हिची अध्यापक विद्यालय प्रतिनिधी म्हणुन नेमणुक करण्यात आली.

पारवा परिसरात अवैध व्यवसायांना खुली सुट

तंटामुक्त ग्राम समितीचा आंदोलनाचा ईशारा
तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत घोटी व परिसरात अवैध व्यावसायीकांनी चांगलेच पाय पसरले असुन त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना जगणे कठीण झाले आहे. यावर नियंत्रण आणावे अशा मागणीचे निवेदन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, घोटी व ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन पारवा यांना दिले आहे. मात्र पोलीसांनी अद्याप यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. 
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार गेल्या काही वर्षांपासुन घोटी परिसरात गावठी दारू, जुगार, वरली मटका, कोंबडबाजार तसेच अवैध शिकार याला जोर चढला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा मात्र या अवैध व्यावसायीकांच्या अधिन असल्याचेच निदर्शनास येत आहे. अवैध व्यावसायीकांविरोधातील तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये ऐकल्याच जात नाहीत. घोटी येथे प्रेमनगर व रामनगर भागात रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी दारू विकल्या जाते. रस्त्यावर दारूड्यांची रेलचेल असल्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला वर्ग व सर्वसामान्यांना येथुन ये-जा करणेही दुरापास्त झाले आहे. काही दारूडे नेहमीच ग्रामसभेत येऊन व्यत्यय आणतात. अशी येथिल नागरिकांची तक्रार आहे. 
मटक्याला तर व्यवसायाचा दर्जा दिला अशा तो-यात सुरू आहे. जे सर्वसामान्य नागरीकांना दररोज दिसते ते पोलीसांना का दिसु नये याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अवैध व्यवसायीकांविरोधात कडक कार्यवाही करण्यात यावी असे जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आदेश असले तरी पारवा परिसरावर मात्र या आदेशाचा कोणताही प्रभाव असल्याचे दिसत नाही. पारव्याचे ठाणेदार अवैध व्यावसायीकांना संरक्षण देत असल्याचा आरोप होत असुन वरिष्ठांनी तातडीने यावर नियंत्रण न आणल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अरविंद राठोड, भाऊराव पुसनाके, प्रयाग जाधव, सदाशीव राठोड यांचेसह ग्रामस्थांनी दिला आहे.
साभार:- देशोन्नती

Monday 28 November 2011

शेतक-यांचे उभे पिक विज कंपनीच्या टाचेखाली

पोलीस दहशतीत टॉवरचे काम
शेतक-यांमध्ये प्रचंड असंतोष
 कापुस व सोयाबीनला योग्य भाव मिळण्यासाठी सर्वत्र  संघर्ष सुरू असतांना घाटंजी तालुक्यात शेतक-यांच्या पिकांवर विज पारेषण कंपनीची करडी नजर पडली आहे. शेतात पिके उभी आहेत. मात्र अशा अवस्थेतही विज पारेषण कंपनीने मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा बोलावुन दहशतीच्या वातावरणात शेतामध्ये टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
चोरांबा भागात मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या या टॉवर उभारणीला शेतक-यांचा विरोध आहे. पारेषण कंपनीचे कर्मचारी शेतामध्ये घुसून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी देतात अशा आशयाची तक्रारही सुनिल पांढरमिसे, लियाकत तंव्वर, राजेश जाधव, पवन गोडे या शेतक-यांनी घाटंजी पोलीस स्टेशनला केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर या शेतक-यांनी शेतकरी नेते तथा देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या मार्गदर्शनानुसार या टॉवर उभारणी विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात दि. ५ मे २०११ रोजी रिट पीटीशन याचीका (क्र.२१०७) दाखल केली आहे. सदर खटला अद्याप सुरू आहे. त्यामुळे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत टॉवर उभारणी करू नये अशी या भागातील शेतक-यांची मागणी आहे. मात्र विज पारेषण कंपनी व कंत्राटदाराने पोलीसांशी हातमिळवणी करून मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज शेतपिके पायदळी तुडवित टॉवर उभारणीच्या कामाला सुरूवात केली. या प्रकाराला विरोध केल्यास गंभिर गुन्हे दाखल करण्यात येतिल अशी धमकी पोलीसांकडुन देण्यात येत असल्याची शेतक-यांची तक्रार आहे. शेतक-यांवर दडपण आणण्यासाठी राखीव पोलीस दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.
विज पारेषणचे अधिकारी व पोलीसांच्या या दडपशाही विरोधात सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांचेसह स्थानिक नेते व कार्यकर्ते सुद्धा हस्तक्षेप करीत नसल्याने शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. हे काम त्वरीत न थांबविल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा शेतक-यांनी दिला आहे.
साभार:- देशोन्नती

घाटंजीत उमेदवारांकडुन आचारसंहितेचे खुलेआम उल्लंघन

तक्रार होऊनही प्रशासकीय यंत्रणा सुस्त
 
 
निवडणुक नि:पक्ष व्हावी याकरीता निवडणुक आयोग आचारसंहिता दिवसेंदिवस कठोर करीत आहे. मात्र नियम असले तरी त्याची अमंलबजावणी करणारी यंत्रणा सक्षम नसल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन कागदोपत्रीच होत असल्याची बाब पुढे येत आहे. आचारसंहितेच्या काळात उमेदवार, राजकीय नेते यांच्याकडुन मतदारांना कोणतीही आमिषे देण्यात येऊ नये असा नियम आहे. मात्र घाटंजी शहरात या नियमाचे खुले आम उल्लंघन होत असुन प्रशासकीय यंत्रणेला याचा मागमुसही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
घाटंजी शहरात सध्या न.प.निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला असुन प्रत्येक उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहे. मात्र आपल्या कोरड्या आश्वासनांना मतदार आता भाव देणार नाही म्हणुन काही विद्यमान नगरसेवक व उमेदवारांनी आचारसंहितेच्या काळातच ठिकठिकाणी कामे करून देण्याचा सपाटा लावला आहे. विशिष्ट समाजाच्या मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांनी धार्मिक भावनेचा आधार घेणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणुन शहरातील काही भागात विशिष्ट धर्मियांसाठी सभामंडप बांधण्याच्या कामाला ऐन आचारसंहितेच्या काळातच सुरूवात करण्यात आली आहे. ले आऊट मधिल ओपन स्पेस देऊन त्याठिकाणी तातडीने कम्पाउंड व तात्पुरते शेड सुद्धा उभे करण्यात आले आहेत. येथिल नृसिंह वार्डात खांडरे ले आऊट मध्ये अशाच प्रकारचे शेड उभे केल्यामुळे तेथिल नागरीकांनी यासंबंधी तक्रारही संबंधीतांकडे केली आहे. मात्र त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. स्मशानभुमीकडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला मुलींच्या वसतीगृहासमोर लोखंडी अँगलचा वापर करून टिनाचे शेड बांधणे सुरू आहे. एक नगरसेवक यासाठी स्वत: पैसे खर्च करीत असल्याची या भागात चर्चा आहे. असाच प्रकार आनंद नगर, घाटी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड या भागातही सुरू आहे. पंचायत समितीला लागुन असलेल्या मंदिरा समोर सुद्धा शेड उभारणीचे काम सुरू आहे. काही भागात नागरीकांनी विरोध दर्शविल्याने काम तात्पुरते बंद करण्यात आले आहे. संत मारोती महाराज वार्डात गेल्या आठ दहा दिवसांच्या काळात तिन हातपंप बांधल्या गेले आहेत. वसंतनगरात विज नसलेल्या भागामध्ये एक दोन दिवसात विजेचे खांब लावण्यात येणार असल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली.
धार्मिक स्थळांना जागा देण्यात भावनेचे राजकारण करून त्यावर आपली पोळी शेकणारा उमेदवार आघाडीवर आहे. ले आऊट मधिल खुल्या जागेवर बगिचा अथवा तत्सम उपयोगाकरीता देण्याऐवजी वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावावर सभामंडप वाटण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. आचार संहितेच्या काळात अशा प्रकारे आमिषे देण्याचा प्रकार सुरू असुनही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असलेली यंत्रणा मात्र निद्रिस्त आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात आचारसंहितेचे किती पालन केल्या जाईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकंदरीतच ले आऊट मधील जागा वाटप, हातपंप व शेड उभारण्याच्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज असुन हा प्रकार नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला? नगर परिषदेने यासंबंधी आधीच ठराव घेतले आहेत का? याबाबत वरिष्ठांनीच चौकशी करण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.
साभार:- देशोन्नती

मोघेंच्या धनादेश वाटपाला मनसेचे प्रत्युत्तर

             ग्रामपंचायत स्तरावर धनादेश वाटप
स्थानिक पातळीवरील पदाधिका-यांचा हक्क डावलुन शासकीय मदतीचे धनादेश स्वहस्तेच वाटप करण्याचा अट्टाहास करणा-या सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे व त्यांच्या निकटस्थ जि.प.सदस्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘म.न.से.’ स्टाईलनेच प्रत्युत्तर दिले आहे. नुकतेच बेलोरा येथे पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यासाठी पंचायत समिती अधिका-यांवर दबाव टाकण्यात आला. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी गावपातळीवरील धनादेश वाटपाचा हक्क स्थानिक सरपंचाला असला पाहिजे याकरीता ३ ग्रामपंचायती मधील घरकुल लाभार्थ्यांचे धनादेश घेऊन वासरी, मुरली व चोरांबा येथे ग्रा.पं.सरपंचांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
महादेव सुरपाम, तुळशीराम आत्राम, किसन आत्राम, शंकर मेश्राम, दौलत सुरपाम, पुंडलीक गराटे, बेबी मंगाम, लक्ष्मण दंडाजे, श्रावण बारेकर, सुरेश आत्राम, बाजीराव सुरपाम, माणिक आत्राम, गोविंदा मेश्राम, गणेश पेंदोर या लाभार्थ्यांना सरपंचांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी वासरीच्या सरपंच प्रियंका प्रशांत धांदे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे ग्रा.पं.सदस्य भोपीदास राठोड, शंकर मादाडे तसेच विठ्ठल गोवारदिपे, प्रदिप राजुरकर, तुळशीराम निबुधे, किसन राजुरकर, भाऊराव धांदे, वासुदेव गुरनुले, प्रभाकर वानखडे, रविंद्र कोडापे, मनसेचे पंकज राठोड, प्रशांत अवचित, अनिल जाधव, जगन्नाथ चौधरी, रविंद्र चव्हाण उपस्थित होते.
सामाजीक न्याय मंत्र्यानी आपल्या पदाची प्रतिष्ठा लक्षात घेता प्रत्येक धनादेश आपल्याच हस्ते वाटप व्हावा असा अट्टाहास न धरता स्थानिक पदाधिका-यांना त्यांचा मान मिळु द्यावा. तसेच शासकीय मदत आपल्यामुळेच आली असा बनाव निर्माण करून लोकांना संभ्रमात टाकु नये असे आवाहन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी केले आहे. पंचायत समितीच्या अधिका-यांनी राजकीय दबावातुन अशा प्रकारांना संमती दिल्यास यापुढे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
साभार:- देशोन्नती

Saturday 26 November 2011

ना.मोघेंच्या 'वाटप' हट्टामुळे घरकुल लाभार्थ्यांची परवड

धनादेशाच्या प्रतिक्षेत शेकडो लाभार्थी पंचायत समितीत
शासकीय मदतीचा कोणताही धनादेश आपल्याच हस्ते वाटप व्हावा असा पायंडा पाडणा-या सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यामुळे शेकडो घरकुल लाभाथ्र्याना पंचायत समितीत ताटकळत रहावे लागले.
ना.मोघेंच्या उपस्थितीत नुकताच बेलोरा येथे पाणी टंचाई आढावा बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाबाबत पंचायत समिती सभापती व सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होत असल्यामुळे हा कार्यक्रम वादाच्या भोव-यात सापडला आहे.
या बैठकीसाठी केवळ पाणी टंचाई संबंधीत कर्मचारीच नव्हे तर पंचायत समिती कार्यालयातील जवळपास सर्वच कर्मचारी गेले होते. त्यामुळे घरकुलाचे धनादेश घेण्यासाठी आलेल्या शेकडो लाभार्थ्यांना दिवसभर पंचायत समितीच्या आवारात ताटकळत रहावे लागले.यामुळे संतप्त झालेल्या काही पंचायत समिती सदस्यांनी गटविकास अधिका-यांच्या कक्षाला कुलूप लावण्याचाही प्रयत्न केला.
पं.स.सभापती व सदस्यांना डावलुन गटविकास अधिकारी मंत्री महोदय व एका जि.प.सदस्याच्या ईशा-यावर काम करतात असा आरोप पं.स.सदस्य सहदेव राठोड यांच्यासह इतर सदस्यांनीही केला आहे. शासनाकडुन विवीध योजनेंतर्गत आलेला निधी आपणच आणला असा संभ्रम निर्माण करण्यासाठीच अशा वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असा आरोप राठोड यांनी पत्रपरिषदेत केला. घरकुल योजनेत प्रचंड अनियमितता आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या मात्र कार्यवाही मात्र झाली नाही. या योजनेसाठी प्राधान्यक्रम डावलुन गावांची निवड करण्यात आली. बंजारा व आदीवासी समाज बहुल गावांना या योजनेतुन डावलण्यात आले. त्यामुळे स्वत:ला बंजारा समाजाचे हितचिंतक म्हणवुन घेणा-यांना ही बाब लक्षात येऊ नये याबाबत राठोड यांनी आश्चर्य व्यक्त केले.
भारत निर्माणच्या योजनेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. मात्र एकाही प्रकरणात कुणावरही ठोस कार्यवाही झालेली नाही. पाणी टंचाई कृती आराखड्यात मोठा भ्रष्टाचार असुन आढाव्याचे हे नाट्य केवळ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाच पोसण्यासाठी असल्याचा आरोप सहदेव राठोड यांनी यावेळी केला. काही महिन्यांपुर्वी ना. मोघेंच्या हस्ते वाटप करण्यात आलेल्या धनादेशांवर संबंधीतांच्या स्वाक्ष-याच नसल्यामुळे कार्यक्रम आटोपताच धनादेश लाभार्थ्यांकडुन परत घेण्यात आले होते. त्यावेळीही ना.मोघेंच्या वाटप हट्ट चांगलाच चर्चेत आला होता हे विषेश.
साभार:- देशोन्नती 

सगळ्यांनाच लागले नगराध्यक्षपदाचे ‘डोहाळे’

अवघ्या दहा बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुकीसाठी धावपळ सुरू असली तरी यावेळी मतदार व उमेदवारांमध्ये हवा तेवढा उत्साह दिसत नाही. गेल्या पाच वर्षातील कार्यकाळात नगर परिषदेच्या अक्षम्य ढिसाळपणामुळे नागरिकांमध्ये निवडणुक व उमेदवारांविषयी आपुलकीच उरली नाही.
ब-याच प्रतिक्षेनंतर घाटंजी न.प.नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाले आहे. त्यामुळे या खुर्चीवर बसण्याची अनेकांची सुप्त ईच्छा जागृत झाली असुन नगराध्यक्षपदासाठीच काही उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. गेल्या पाच वर्षात घाटंजीच्या नगराध्यक्षपदावर महिलाराज होते. याचा चांगलाच फायदा काही नगरसेवकांनी घेतला. या अडीच वर्षात तर नगर परिषदेत ‘ठाकुरकी’ने एवढा कहर केला की, लोकांचा नगर सेवकांवरील विश्वासच उडुन गेला आहे.
यावेळी सुमारे चार माजी नगराध्यक्ष निवडणुक रिंगणात आहेत. प्रभाग क्र.१ मधुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निवडणुक लढवित असलेले श्याम बेलोरकर यांनी १९९१ ते १९९६ पर्यंत नगराध्यक्षपद भुषविले. त्यानंतर १९९६ ते १९९८ पर्यंत जगदिश पंजाबी हे या पदावर विराजमान होते. सध्या त्यांनी प्रभाग क्र.३ मधुन कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे.१९९८ ते २००१ या काळात नगराध्यक्षपदी असलेल्या माया मंगाम यावेळी प्रभाग क्र.२ मधुन अपक्ष उमेदवार आहेत. तर २००६ ते २००८ मध्ये नगराध्यक्ष राहिलेल्या दुर्गा साखरकर प्रभाग २ मधुन भाजपाच्या उमेदवार आहेत.
या निवडणुकीत कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यास नगराध्यक्षपदी जगदिश पंजाबी यांनाच सधी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र राष्ट्रवादीला  बहुमताचा कौल मिळाल्यास नगराध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच होणार असे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कडुन श्याम बेलोरकर हे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. परंतु त्यांच्या दावेदारीला रा.कॉ.मधील दुस-या गटाकडुन आव्हान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर काही पक्षांनी महत्वाच्या उमेदवारांना नगराध्यक्षपदाचे चॉकलेट दाखवुन निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यास प्रवृत्त केले आहे. मात्र निवडणुक निकालानंतर नेमके काय चित्र पुढे येणार याकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
साभार:- देशोन्नती 

Friday 25 November 2011

आकपुरीत शेतक-यांनी काढली शासनाची अंत्ययात्रा


खापरी नाक्यावर तिन तास वाहतुक ठप्प




तालुक्यात शिवसेना व भाजपाच्या वतीने कापसाच्या प्रश्नावर करण्यात आलेल्या औपचारीक आंदोलनानंतर ख-या अर्थाने शेतकरी आज स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरला. यवतमाळ घाटंजी रस्त्यावर आकपुरी व खापरी येथे शेतक-यांनी रस्ता अडवुन कापसाला ६ हजार व सोयाबीनला ३ हजार रूपये हमीभाव देण्याची मागणी केली. खापरी नाक्यावर बैलगाड्या उभ्या करून रस्ता अडविण्यात आला होता.
त्यामुळे घाटंजी यवतमाळ रस्त्यावरील वाहतुक तब्बल तिन ते चार तास ठप्प झाली होती. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बॅनर शिवाय या आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी झाले होते. खापरी येथिल आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद नित, सुरेश बेले, राजु वातीले, मधुकर भोयर, विनोद उल्हे, शशांक साठे, राजु चौधरी, विलास भोयर, मनोज गोपने, अरविंद चौधरी, दिलीप सिडाम यांनी केले. घाटंजीचे निवासी नायब तहसिलदार एस.व्ही.भरडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  घाटंजी लगत असलेल्या आकपुरी येथेही हजारो संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी दगड, काटेरी झुडूपे रस्त्यावर टाकुन वाहतुक थांबवीली होती. त्यामुळे यवतमाळकडे जाणा-या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गावातील लहान मुलेही घोषणा देत रस्त्यावर आली होती. शेतक-यांनी राज्य व केंद्र शासन तसेच राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढुन भडाग्नी दिला. यवतमाळचे तहसिलदार वाय.आर.खान यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात जयवंत भोयर, मधुकर निस्ताने, अभिमान चाफेकर, लक्ष्मण आडे, सुनिल चौधरी, योगेश खरात, आशिष नलगे, मोहन जळके, गजानन आत्राम, विजय डहाके, विलास अवचित, विजय अवचित, विलास ढाले, ज्ञानेश्वर चौधरी, अनिल लांडगे, रवि दोरगे यांनी केले.

घाटंजीत विकासाची गोळाबेरीज शून्य

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शहरामध्ये घाटंजीचा समावेश होतो. येथे निर्सगाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. मात्र या आडवळणावरच्या शहराला सौंदर्यांची विकासात्मक झालर लावणे गेल्या १५ वर्षात नगरपरिषदेतील सत्ताधार्‍यांना जमलेच नाही. चार प्रभाग असलेल्या छोट्याश्या शहरात समस्यांचे अनेक डोंगर आहेत. नगरपरिषद असून अनेक ठिकाणी प्राथमिक मुलभूत सुविधा पोहचल्या नाहीत. नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि हौसेगवसे नवसे यांची लगीनघाई सुरू झाली. नमस्कार चमत्काराला वेग आला. यात काही नवीन चेहरे आहेत तर काही जुने चेहरेही आहेत. अशांनी नगर विकासासाठी काय दिवे लावले आहे याची जंत्रीच मतदारांजवळ आहे. 
शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी प्रभाग एक ते चार मध्ये फेरफटका मारला असता तेथे विविध समस्यांचा दिसून आल्यात. प्रभाग एक मधील नेहरूनगर परिसरात अंतर्गत पक्के रोड नाही. नालीतील घाण पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे. घन कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग लागले आहेत. स्वच्छतेसाठी कोणतीची यंत्रणा कार्यतरत नसल्याचे स्पष्ष्टपणे जाणवते. साचलेला कचरा जागेवरच कुजून त्यांची दुर्गंधी सुटली आहे.पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायमस्वरूपी आहे. नळांची जोडणी ही जुनी असल्याने पाणी पूरवठा बरोबर होत नाही तर काही भागात नळच नाही. वसहतीपासून वाहणार्‍या नदीवर संरक्षण भिंत नसल्याने दरवर्षी पुराचे पाणी अनेकांच्या घरात घुसते. दुर्गामाता वॉर्डातील रस्त्यावर अनेकवर्षांपासून डांबरीकरणच झाले नाही. मात्र परिसरातील एका पदाधिकार्‍याने स्वत:सह नातेवाईकांच्या घरापर्यंत डांबरीकरण करून घेतले आहे. हा अन्याय उघड्या डोळ्य़ांनी नागरिकांनी पाहिला आहे.सांडपाण्याच्या नाल्यासुध्दा अर्धवट असल्याने सांडपाणी रस्त्यावरच साचत आहे.डबके साचले असून त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. अर्धवट नाल्याच्या सफाईची तसदीही घेतली जात नाही. त्याची सफाई नागरिकानाच करावी लागते. दुर्गा माता वॉर्डपरिसरातील नाल्यावरची संरक्षण भिंतसुध्दा अर्धवटच आहे. पावसाळ्य़ात याही भागाला पूराच्या पाण्याचा तडाखा बसतो.

धर्मशाळा वॉर्डमध्येही अर्धवट कच्च्या नाल्यातील पाणी रस्त्यावर साचून गटारे तयार झाली आहे. येथील एका सार्वजनिक शौचालयास आडवे टीनपत्रे लावून केला. त्यामुळे हागणदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जेसीस कॉलनीमध्येही अंतर्गत रस्त्याची समस्या आहे. नाल्या व सांडपाण्याची व्यवस्था नाही. अंबादेवी वॉर्डात तर अंतर्गत रस्ते नाही आणि वीजही नाही. कसेबसे येथील १0 लोकांनी मिळून पैसे भरून घरी वीज घेतली आहे. येथे आता एक रोड होत आहे पण तोही नागरिकांच्या पाठपुराव्यानेच होत आहे. आंबेडकर वॉर्ड प्रभाग चारमध्ये येत असून तो नदीकाठी आहे. तेथे संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे. आनंदनगरमध्ये चालता येण्याजोगे रस्ते नाही, नाल्या नाही, सांडपाणी रस्त्यावरून वाहते, काही ठिकाणी ही घरात शिरते, परिसराची साफसफाई नागरिकच करतात. येथील पथदिवे तक्रार दिल्यानंतर १५ दिवस बंद राहतात. अनेकदा चालूच होत नाही. येथे डुकरांचा मुक्तसंचार आहे. डूकरांच्या हल्ल्यात अनेक लहान मुले जखमी झाली आहेत.डुकरांच्या भितीने मुलांना अपल्या खेळास मुकावे लागत आहे. अशाही स्थिती नगरपरिषद प्रशासनाने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीच मोहिम हाती घेतली नाही.


 शहरातील वसंतनगरमध्येही रोड नाही, नाल्या नाही, वीजही नाही. त्यामुळे येथील ५0-६0 महिलांनी तहसील व नगरपरिषदेवर तीन-चारवेळा मोर्चा नेला. पण समस्या सुटल्या नाहीत. प्रभाग दोनमध्ये येणार्‍या घाटी भागात हागणदारीची मोठी समस्या आहे. हागणदारी मुक्तीसाठी शासनाने अनेक कार्यक्रम राबविले, पथनाट्ये, नाटके केली पण परिणाम शून्यच राहिला. नागरिकांनीही बोध घेतला नाही. लहान पूल ते पारवा रोडवर लोकांनी उघड्यावर बसू नये म्हणून एक मोठी भिंत बांधून आडोसा केला आहे. या आडोशामागे हागणदारी होत आहे. त्या भिंतीऐवजी तिथेच दोन-चार शौचालय बांधले असते तर ते कमी खर्चाचे झाले असते., शिवाय हागदारीचा प्रश्नही निकाली निघाला असता.परंतु सम्येचे कायमस्वरूपी निराकरण करायचेचं नाही, असा प्रघात आहे. स्मशानभूमीवर शेड असून उत्तरक्रियेसाठी कोणतीच व्यवस्था नाही.
कधी थांबणार पुराचे पाणी?
समस्यांचा खच असल्याने महत्वाची कोणती असा भेद करता येत नाही. आजही पावसाळ्य़ात लगतच्या नदीनाल्यांचे पाणी वसाहतीत शिरते त्यासोबतच घाणही वाहून येते. अर्धवट नाल्या व पूरसंरक्षक भिंती, कच्चे रस्ते, रस्त्यावर काळोख, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नगरपरिषद असूनसुध्दा अंत्यविधीसाठी सुव्यवस्थित स्मशानभूमी नाही. साधे दहनशेड उभारणेही आजपर्यंत जमलेच नाही.
शौचालयाची दुरवस्था
दुर्गामाता वॉर्डातील सार्वजनिक शौचालयाची स्थिती अतिशय बिकट आहे.शौचालयाला दारेच नसल्याने तिथे डुकरांनी डेरा घातला आहे. नागरी वसहातीत बंद पडलेल्या शौचालयाच्या घाणीची दुर्गंधी पसरली आहे. त्यातील घाण तीनही बाजूंनी असलेल्या नालीत साचली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना घरात राहणेही नकोशे झाले आहे. नगरपरिषदेला याचे काही देणे-घेणे नाही. पावसाळ्यात तर येथील स्थिती अतिशय भयावह होते. तसेच हागणदरीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे.

सौंदर्यीकरणाचा विसर
केवळ राजकारण आणि राजकारण यातच गुरफटून असलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वच नगरसेवकांना शहराच्या सौंदर्यीकरणाचा विसर पडला आहे. शहर हिरवेगार दिसावे, सुंदर असावे हे त्यांना कळलेच नाही. एक बगीचा होता तो नगरपरिषदेने खासगी संस्थेला देऊन उजाड केला. दुसरे उद्यान दुर्लक्षित आहे. तर घाटी रोडवर लोकसहभागातून काही युवकांनी लावलेल्या झाडांना पाणी टाकणेही नगरपरिषदेला जमले नाही. मुलांना बागडण्यासाठी शहरात एकही बगीचा नाही.
 
उघड्यावर कचर्‍याचे ढिग
शहरातील कचरा वसंतनगरकडे येणार्‍या मुख्य रस्त्याच्याकडेला आणून टाकला जात आहे. पालिकेने वसंतनगर परिसरात अनधिकृत कचरा डेपोच उघडला असल्याचे यावरून दिसते. नगरपरिषदेच्या कामात भर टाकण्याचे काम डुकरांकडून केले जाते. हा कचरा इतरत्र पसरवितात. शिवाय हवेबरोबर हा कचरा रस्त्यावर येऊन घाणीचे कण ये-जा करणार्‍याच्या अंगावर उडतात. यामुळे रस्त्यावरून पायदळ जाणेही दुष्कर झाले असल्याचे दिसून येते.
साभार-लोकमत
विठ्ठल कांबळे
9421774062

Wednesday 23 November 2011

७९ उमेदवार निवडणुक रिंगणात ४ उमेदवारांचे अर्ज खारीज

नगर परिषद निवडणुक नामांकन अर्ज छाननी दरम्यान ४ उमेदवारांचे नामांकन अर्ज विवीध कारणांनी खारीज झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रभाग ४ मधील उमेदवार राम खांडरे यांना पक्षातर्फे  देण्यात आलेल्या एबी फॉर्म वर संबंधीतांची स्वाक्षरी नसल्याने त्यांची पक्षाची उमेदवारी रद्द झाली. त्यांनी अपक्ष म्हणुनही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ते रिंगणात असले तरी आता त्यांना राष्ट्रवादी समर्थीत उमेदवार म्हणुन निवडणुक लढवावी लागणार आहे. निवडणुक रिंगणाबाहेर पडलेल्यांमध्ये पद्मा खोब्रागडे (प्रभाग ४), प्रभाग क्र.३ मधुन माया कटकमवार, मंगेश इंगोले, प्रभाकर चटुले हे आहेत.
सध्या ७९ उमेदवार निवडणुक रिंगणात असुन त्यामध्ये ४२ पुरूष व ३७ महिला उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग क्र.१ (जलाराम)संजय गोडे, दत्तात्रय गटलेवार, प्रशांत भोरे, संदिप बिबेकार, संजय राऊत, संजय बुल्ले, परेश कारिया, गुणवंत निकम, श्याम बेलोरकर, शैलेष ठाकरे, रेखा दोनाडकर, वत्सलाबाई तलमले, सरोज पडलवार, संगिता भुरे, स्वाती महाजन, सुलभा खांडरे, प्रभाग क्र.२ (घाटी) मधुकर पेटेवार, दादाराव खोब्रागडे, अजय गजभिये, विजय कासार, नरेश कुंटलवार, भारत मोटघरे, संतोष शेंद्रे, अनिल रामटेके, सतिश तोडसाम, आनंद मडावी, संतोष गेडाम, किरण नैताम, दिनेश उईके, सिमा डंभारे, पुजा दिकुंडवार, सै.सुफिया सै.फिरोज, विजुताई राठोड, फरझाना परविन अ.रशिद, नलु मोहिजे, माया मंगाम, सुधा ठाकरे, जैनुबी अफजलखॉ पठाण, वर्षा जाधव, शर्मिला उदार, सुनिता गवारकर, सिंधु सिरपुरे, अर्चना गोडे, सिता गिनगुले, किशोरी चौधरी, दुर्गा साखरकर, प्रभाग ३ (राम मंदीर) किशोर दावडा, रविंद्र ठाकरे, अशोक कटकमवार, संतोष गवळी, जगदिश पंजाबी, प्रमोद गिरी, विनायक परचाके, गजानन मालेकर, जयश्री दिडशे, निर्मला पांडे, ललिता ठाकुर, शोभा ठाकरे, सारिका ऊगले, सुलभा खांडरे, प्रभाग क्र.४ (डॉ.बाबासाहेब आंबेडकर) भारती चुनारकर, चंद्ररेखा रामटेके, शोभा रामटेके, चित्रकला देवतळे, राम खांडरे, नरेंद्र धनरे, मधुकर निस्ताने, स्वरूप नव्हाते, इंदुताई परतेकी, शालु गेडाम, नंदा कोडापे, अकबर तंव्वर, सै.मोहिब, मधुकर निस्ताने, प्रभा शेवरे, अरविंद बोरकर, सुधिर अग्रहरी, जितेंद्र सहारे, सुधिर उरकुडे

मध्यरात्री लागलेल्या आगीत दुकान भस्मसात

शहरातील मुख्य बाजारपेठेत नगर परिषद व्यापारी संकुलात असलेल्या अजमेर मार्केटिंग या दुकानाला काल मध्यरात्री भिषण आग लागली. या आगीत संपुर्ण दुकान व साहित्य जळुन खाक झाल्याने सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री १२ वाजताच्या सुमारास येथिल व्यापारपेठ बंद असल्यामुळे सगळीकडे सामसुम होती. काही नागरीक या भागातील चौकात बसुन होते. त्यांना दुकानातुन धुर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी संबंधीतांना कळविले तसेच या भागातील नागरीकांना गोळा केले. पोलीस विभागाला सुचना देण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक कोंडे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. यवतमाळ येथिल अग्निशमन यंत्रणेला बोलविण्यात आले. मात्र तोवर आग विझविण्यासाठी घाटंजी नगर परिषदेकडे असलेला पाण्याचा टँकर आणण्यासाठी सुचना देण्यात आली. मात्र सदर टँकर रिकामा असल्याने तो भरण्यासाठी तब्बल दोन तासांचा अवधी लागला. विषेश म्हणजे यावेळी कर्तव्यावर असलेल्या टॅ्रक्टर चालकाकडे चावीच नव्हती. शिवाय या टँकरचा पाईप सुद्धा फुटलेला होता. योग्य वेळी हा टँकर न पोहचल्याने सदर दुकान भस्मसात झाले. नागरीकांनी परिसरातुन पाण्याची व्यवस्था करून आग पसरू दिली नाही. यवतमाळ येथुन अग्निशमनाची गाडी आल्यावर आग आटोक्यात आली. मात्र सिराज अजानी यांच्या मालकीचे अजमेर मार्केटिंग हे दुकान संपुर्णपणे आगीच्या तडाख्यात खाक झाले. आग शॉर्ट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
न.प.चे ‘अग्निशमन’ थंडबस्त्यात
काही महिन्यांपुर्वी राज्य शासनाकडून नगर परिषदेला अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे. न.प.ला आपला सहभाग नोंदवायचा होता. मात्र नगर परिषदेकडे पैसाच नसल्याचे कारण पुढे करून विद्यमान पदाधिका-यांनी अग्निशमन यंत्रणा उभारण्यास नकार दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे सोंग उभे करणा-या न.प.पदाधिका-यांना नागरिकांच्या जिवीताशी संबंधीत सुविधेबद्दल किती आस्था आहे हेच यावरून स्पष्ट होते. नागरिकांनीही न.प.निवडणुकीच्या निमित्ताने यावर वर्तमान
पदाधिका-यांना जाब विचारण्याची गरज आहे.

Tuesday 22 November 2011

नगर परिषद निवडणुकीसाठी प्रतिक्रीया पाठवा


घाटंजी न्युजच्या सर्व वाचकांसाठी सुचना
येत्या ८ डिसेंबरला घाटंजी नगर परिषदेची निवडणुक होऊ घातली आहे. घाटंजी शहराची वर्तमान स्थिती आपल्या नजरेसमोर आहेच. त्यामुळे या निवडणुकीत निवडुन येणा-यांकडुन आपणास काय अपेक्षा आहेत? तुम्हाला आजवर नगर परिषदेत कोणत्या समस्याना सामोरे जावे लागले? न.प.च्या गत पाच वर्षांच्या कार्यकाळाबाबत तुमचे प्रांजळ मत काय? तसेच निवडणुकी संदर्भातील कविता, चुटकुले, वात्रटीका आमचेकडे तुमच्या छायाचित्रासह पाठवा. तुमच्या प्रतिक्रीयाना अवश्य प्रसिद्धी दिली जाईल. मात्र प्रतिक्रिया वैय्यक्तीक द्वेष, आकस अथवा सुडबुद्धीने लिहीलेली नसावी. कोणावरही
 वैय्यक्तीक टिका असलेली प्रतिक्रीया
 प्रसिद्ध केल्या जाणार नाही.
आपली प्रतिक्रीया खालील ई मेल वर पाठवावी. 
तसेच शक्यतो मराठीत असावी. 

E-Mail-   ghatanjinews@gmail.com

Monday 21 November 2011

कुणी काढणार ‘काटा’ तर कुणी घालेल ‘टोपी’

अपक्षांसाठी ४९ मनोरंजक निवडणुक चिन्हे
आता त्याचा ‘काटा’ काढायचाच,अरे हा आता कुणालातरी ‘टोपी’ घालणार अशी वाक्य या निवडणुकीत ऐकायला येणार आहेत. कारण निवडणुक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी एकापेक्षा एक मनोरंजक चिन्हे दिल्याने निवडणुकीच्या गरमागरमीत खुसखुशीत चर्चेची भर पडणार आहे.
अपक्ष उमेदवार जरी फारसे चर्चेत येत नसले तरी त्यांना देण्यात येणारी चिन्हे मात्र निवडणुक काळात चांगलेच मनोरंजन करतात. नगर परिषदेसाठी नामांकन दाखल करण्याला  आता केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अखेरच्या दिवशीच नामांकन अर्ज दाखल करतील. पक्षीय उमेदवारांसोबतच न.प. निवडणुकीत अपक्षांचाही भरणा असतो. अपक्षांना देण्यात येणारी निवडणुक चिन्हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यावर्षी निवडणुक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी ४९ मुक्तचिन्हे निश्चित केली आहेत. तसेच राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्षांची यादीही निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये बहुजन समाज पार्टी (हत्ती), भारतीय जनता पार्टी (कमळ), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (कणिस आणी विळा), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माक्र्ससिस्ट) (हातोडा विळा आणी तारा), इंडियन नॅशनल कॉंग्रेस (हात-पंजा), नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी (घड्याळ), राज्यस्तरीय पक्षांमध्ये शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) याशिवाय २३५ नोंदणीकृत राजकीय पक्षांची यादीही आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
तर अपक्षांसाठी ४९ मुक्त चिन्हे ठरविण्यात आली आहेत. त्यामध्ये कपाट, फुगा, टोपली, बॅट, फलंदाज, बॅटरी टॉर्च, फळा, पाव, ब्रिफकेस, ब्रश, केक, कॅमेरा, मेणबत्त्या, छताचा पंखा, कोट, नारळ, कंगवा, कपबशी, डिझेल पंप, विजेचा खांब, काटा, कढई, गॅस सिलेंडर, काचेचा पेला, हारमोनियम, हॅट, आईस्क्रिम, इस्त्री, जग, किटली, पतंग, पत्रपेटी, मका, नगारा, अंगठी, रोडरोलर, करवत, कात्री, शिवणयंत्र, शटल, पाटी, स्टुल, टेबल, टेबल लॅम्प, दुरदर्शन, तंबू, व्हायोलीन, चालण्याची काठी, शिटी ही चिन्हे आहेत. यावेळी एका प्रभागात एकच मुक्त चिन्ह अपक्षांसाठी राहणार अशी चर्चा आहे. त्यामुळे पॅनल लढविणा-यांची चांगलीच गोची झाली आहे. मात्र
चिन्ह वाटपाबाबत अजुन आयोगाकडुन स्पष्ट निर्देश प्राप्त व्हायचे आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार संतोष शिंदे यांनी देशोन्नतीशी बोलतांना दिली.
साभार:- देशोन्नती 

Sunday 20 November 2011

काय करावे कळेना, कुणाचेच कुणाशी जुळेना


सेनेच्या कुटीलतेमुळे भाजप अडचणीत
राष्ट्रवादीला पोखरतोय ‘उंदीर’
कॉंग्रेसमध्ये एकछत्री कारभार
केवळ व्यक्तीगत स्वार्थावर केंद्रित झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असुनही राजकीय पक्षांची रणनिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना हे प्रमुख राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी खरी लढत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस  या पक्षांमध्ये होणार असे चित्र सध्या दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी प्रथमच निवडणुक रिंगणात उतरणार अशी चर्चा असली तरी त्या दृष्टीने तयारी दिसत नाही. शिवसेनेचा स्थानिक नेता कुटील नितीचा अवलंब करून आपले लयास जात गेलेले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे. कॉंग्रेस मध्ये असलेला एक मोठा गट नुकताच राष्ट्रवादी मध्ये आल्याने पक्ष सशक्त झाला आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणुन प्रोजेक्ट करण्याचा पक्षाचा मानस असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम राष्ट्रवादीला होऊ शकतो. मात्र बेलोरकरांच्या वर्चस्वाला तिरप्या नजरेने पाहणारा एक गट राष्ट्रवादीत आहे. या गटाला नगराध्यक्षपद आपल्याच खिशात असावे अशी तिव्र ईच्छा आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नियोजनाची सुत्रे याच गटाकडे आहेत. मात्र नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जाणा-या श्याम बेलोरकरांना निर्णय प्रक्रीयेमध्ये फारसे महत्व दिल्या जात नसल्याने राष्ट्रवादी मध्ये दोन गटात कुरबुर सुरू आहे. केवळ जातीच्या राजकारणाचा आधार घेऊन ईकडे तिकडे उड्या मारणारा एक ‘उंदीर’ राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये पोकळी निर्माण करीत आहे. यापुर्वी कॉंग्रेसमध्ये असलेल्या नगरसेविकेला नगराध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हेतुने हे सगळे कारस्थान सुरू आहे. याच उठाठेवीचा एक भाग म्हणुन राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवाराला प्रभाग एक मधुन हटवुन शिवसेनेच्या उमेदवारासाठी मैदान मोकळे करण्याचाही घाट रचला जात आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सकारात्मकतेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कॉंग्रेसमध्ये अगदी याऊलट चित्र आहे. नगर परिषदेसाठी निर्णय घेण्याचे सर्वाधीकार माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांना आहेत. अन्य कोणाचीही लुडबूड ऐकल्या जाणार नाही असा अलिखित करारच झाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकछत्री असला तरी त्याचा फायदाच कॉंग्रेसला होणार आहे.
भाजप व शिवसेनेची युती व्हावी असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असला तरी शिवसेनेने कुटील डाव खेळुन सर्व महत्वाच्या जागा आपल्याकडे ठेवुन घेतल्या. दबावात येऊन सेनेशी सलगी करणारा भाजप मधला एक गट सोडला तर उर्वरीत भाजप कार्यकत्र्यांमध्ये या निर्णयाबाबत नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे झुकण्यापेक्षा स्वतंत्र निवडणुक लढविणे श्रेयस्कर असल्याची अनेक कार्यकत्र्यांची भावना आहे. एकंदरीतच युती झाली तरी मनोमिलन मात्र होणार नाही हेच वर्तमान परिस्थितीवरून दिसते.
गेली पाच वर्षे एकमेकांचे पाय ओढुन घाटंजी शहराला एखाद्या खेड्यापेक्षाही दयनिय केलेल्या नगर परिषदेच्या महाभागांमध्ये निवडणुक काळातही समन्वय असल्याचे दिसत नाही. मतदार राजा मात्र या सर्व घडामोडींवर मोठ्या हुशारीने लक्ष ठेऊन ८ डिसेंबरची वाट पहात आहे.
साभार:- देशोन्नती 

Saturday 19 November 2011

मंगळसुत्र चोर महिलांच्या टोळीचा घाटंजीत धुमाकूळ


बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासुन मंगळसुत्र चोर महिलांच्या टोळीने धुमाकूळ घातला असुन पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. आज दुपारच्या सुमारासही पाच ते सहाच्या संख्येत असलेल्या महिलांनी दोन महिलांचे मंगळसुत्र तसेच सुमारे सहा हजार रूपये रोख रूपये लंपास केले. ही बाब लक्षात आल्याने सदर महिला व परिसरातील नागरिकांनी त्या महिलांचा पाठलाग केला. जेसिस कॉलनी मध्ये फिरत असतांना त्या महिलांना गाठले. जमावाला लक्षात येऊ नये म्हणुन  गिलानी महाविद्यालयाच्या मैदानात सदर चोरट्या महिलांनी साड्याही बदलल्या. मात्र त्या दरम्यान सुमारे १०० ते २०० लोकांचा जमाव एकत्र आल्याने सदर महिला त्यांच्या तावडीत सापडल्या. यावेळी त्यांच्या जवळील पिशव्यांची झडती घेतली असता त्यामध्ये दोन मंगळसुत्र व रोख रक्कम सापडली. मात्र पोलीस योग्य वेळी न पोहचल्याने सदर महिला पसार झाल्या. घटना घडताच बसस्थानकावरून काहींनी पोलीस स्टेशनला सुचना दिली होती. मात्र बराच वेळ पोलीस न आल्याने नागरीकांनीच त्या महिलांचा पाठलाग केला. सुमारे एक दिड तासाने पोलीस आल्यावर त्यानी महिला ज्या दिशेने गेल्या तिथे शोध घेतला व पाच महिलाना ताब्यात घेतले. ज्यांचे मंगळसुत्र व रोख रक्कम चोरीस गेली होती त्यांना ती मिळाल्यामुळे त्यानी घटनेची फिर्याद नोंदवली नाही. त्यामुळे पोलीसांनीही अवघ्या काही मिनीटात त्यांना थातुरमातुर चौकशी करून सोडुन दिले. फिर्याद देण्यास कोणी पुढाकार न घेतल्यामुळे हाती आलेली टोळी निसटुन गेली. घाटंजी बसस्थानकावर चोरट्या महिलांची ही टोळी नेहमीच सक्रीय असते. मात्र पोलीसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांच्या टोळीला प्रोत्साहनच मिळत आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी सायतखर्डा वासीयांचे तहसिलदारांना निवेदन

गेल्या अनेक वर्षांपासुन सायतखर्डा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या विवीध प्रलंबीत मागण्यांसाठी शेकडो नागरीकांनी तहसिलदार संतोष शिंदे यांना निवेदन दिले. विज वितरणच्या शिरोली कनिष्ठ अभियंता कार्यालयाने कोणतीही पुर्वसुचना न देता कृषी पंपांचा विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे ओलीत बंद झाल्याने उभे पिक वाळुन जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच गेल्या कित्येक दिवसांपासुन सायतखर्डा गाव व परिसरात कमी दाभाचा विज पुरवठा होत आहे. येथिल लाईनमन सतत गैरहजर राहात असल्यामुळे विजेबाबत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. विज वितरण कंपनी मात्र या सर्व समस्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन केवळ विज बिल वसुलीसाठीच तगादा लावत आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर शासनाने नियंत्रण आणावे. शिवाय कापसाला उत्पादन खर्चानुसार किमान ६ हजार रूपये हमीभाव द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा पांडुरंग निकोडे, गजानन शेंडे, गजाजन लेनगुरे, गजानन चौधरी, रघुनाथ शेंडे, राजेश निकोडे, बंडु निकोडे, झोलबाजी लेनगुरे, श्रीराम बोरूले, तुकाराम मुनेश्वर, विनोद ठाकरे यांनी दिला आहे.

Friday 18 November 2011

घाटंजीत १४ हजार २५८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नगर परिषदेच्या ८ डिसेंबरला होणा-या निवडणुकीत यावेळी घाटंजीत मतदारांच्या संख्येत वाढ झाली असुन १४ हजार २५८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. चार प्रभागातुन १७ नगरसेवकांची निवड होणार आहे. प्रभाग पद्धतीमुळे उमेदवारांना चौपट श्रम करावे लागणार आहे. प्रभाग क्र.१ मध्ये ३ हजार ६५१ मतदार असुन १ हजार ८६२ पुरूष मतदार तर १ हजार ७८९ महिला मतदार आहेत.
सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्र.२ मध्ये एकुण ४ हजार ४३ मतदार आहेत. यात २ हजार ९८ पुरूष तर १ हजार ९४५ महिला आहेत. प्रभाग क्र. ३ मध्ये ३ हजार २९७ मतदार संख्या असुन १ हजार ७०७ पुरूष व १ हजार ५९० महिला मतदार आहेत. प्रभाग क्र. ४ मध्ये एकुण ३ हजार २६७ मतदार आहेत यामध्ये १ हजार ६९९ पुरूष असुन १ हजार ५६८ महिला मतदार आहेत.
यावर्षी मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले असले तरी मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ असल्याची बाब आता निदर्शनास येत आहे. काही मतदारांची दोन एका पेक्षा अधिक वेळा नोंद असुन अनेकांचे घर क्रमांक चुकीचे टाकण्यात आले आहेत. प्रत्येक मतदाराचे छायाचित्र मतदार यादीत असावे यासाठी घरोघरी जाऊन छायाचित्र गोळा करण्यात आले होते. तरी देखिल बहुतांश मतदारांची छायाचित्रे झळकलीच नाहीत. शिवाय काही मतदारांची छायाचित्रे चुकीची लागल्याने मतदानाच्या वेळी त्यांना चांगलाच मनस्ताप होणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीमुळे मतदार मतदानापासुन वंचित राहु नये यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे.

Thursday 17 November 2011

"फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे"


कापूस ठरला यातनांचे पीक.........!
कापूस म्हणजे पांढरं सोनं  अन शेतकरी म्हणजे देशाचा कणा. खरं पाहिलं तर अशी वाक्ये निबंधामध्ये अन् भाषणामध्ये बरी वाटतात. वस्तूस्थिती मात्र विचित्र आहे सोन्याचा भाव किती आहे अन्पाठीच्या कण्याची काय अवस्था आहे याचे चिंतन केले तर संवेदनशिल माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. 
जखमेवर बांधल्या जाणार्‍या कापसालाच आज जखम झालीय. शेतकर्‍यांच्या यातनांचं गाठोडं मोठं झालं आहे. आज कापूस उत्पादक शेतकर्‍याच्या शिवारात स्मशान शांतता पसरली आहे. रानातली पक्ष्यांची शिळही आता त्याला नकोशी झालीय. सरकार कर्णबधीर झालयं, नेते एसीत बसून धोरण ठरवताहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात एक राजू शेट्टी तयार झालाय विदर्भात केव्हा होणारं? ही आशा आता शेतकर्‍यांच्या मनांत घर करू लागलीय. मागील वर्षी कापसाला बर्‍यापैकी भाव मिळाला. म्हणूनच यंदा नव्या आशेनं शेतकर्‍यांनी जमिनीतं स्वप्नं पेरलं. कापसासाठी वाट्टेल तो खर्च केला. परंतु आज मात्र कापूस अनिश्‍चिततेच्या सावटात सापडला आहे. नाफेड, सीसीआयची दारं कधी उघडणार याचीच शेतकरी वाट पाहात आहे. सोयाबीनचं पीक पाहिजे तसं झालं नाही. कापूस तरी वाचवेल असं वाटत असताना ऐनवेळी निसर्गानं दगा दिला. एकरी अडीच ते तीन क्विंटलचा अँव्हरेज येतो आहे. एकरी खर्च बारा हजार रुपये व उत्पादन मात्र ११ हजार रुपयाचे अशी एकंदरित स्थिती आहे. कापसाच्या होणार्‍या चोर्‍या, खेडा खरेदीत होणारी लूट, वीज वितरण कंपनीचे सैतानी डावपेच, जागल करताना होणारा साप, विंचू यांचा त्रास व सरकारच्या मनातील कपटी अंदाज यामुळे कापसाचे पीक हे शेतकर्‍यांसाठी यातनांचेच पीक ठरले आहे.
सध्या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांसमोर प्रचंड मोठे संकट उभे ठाकले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून फोटो काढण्यापुरते मार्गदर्शन शेतकर्‍यांना होत आहे. शेती परवडत नाही म्हणून जमिनीचा मालक आता रोजगाराच्या शोधात स्थलांतर करूलागला आहे. येणार्‍या काळात ही वेदना अधिक तीव्र होणार आहे. 
शेतकर्‍यांना आयुष्यभर आसवांच्याच पावसात भिजवित ठेवणार्‍या या व्यवस्थेत शेतकरी मात्र आता निराधार होतोय. विठ्ठल वाघ म्हणतात त्याप्रमाणे 'फुलवल्या कापसाले चंद्र चोरू चोरू पाह्ये, तरी मायमाऊलीची मांडी उघडीचे राहे' अशीच अवस्था कापूस उत्पादक शेतकर्‍यांची झाली आहे. कापसाची ही वेदना संपविण्यासाठी कुणीतरी आता पुढं आलंच पाहिजे.

संतोष अरसोड, नेर मो. 9423434315

साभार :- लोकमत          
                                                                                

Wednesday 16 November 2011

निवडणुकीचा खर्च ‘धनादेश’ देऊनच होणार !


प्रत्येक उमेदवाराला काढावे लागणार स्वतंत्र बँक खाते
येत्या ८ डिसेंबरला होणा-या नगर परिषद निवडणुकीत निवडणुक आयोगाने खर्चाची मर्यादा वाढविली आहे. मात्र हा खर्च चेकद्वारेच करावा असा अध्यादेश काढून उमेदवारांच्या आर्थिक व्यवहारांना लगामही घातली आहे. यावेळच्या निवडणुकीत वार्डांचे प्रभागात रूपांतर झाल्यामुळे कार्यकक्षा तब्बल चौपट ते पाचपट झाली आहे.त्यामुळे यापुर्वी असलेल्या खर्च मर्यादेत एवढ्या मतदारांपर्यंत पोहचणे उमेदवारांना शक्य होणार नाही ही बाब लक्षात घेऊन आयोगाने  उमेदवारांच्या खर्चात जवळ जवळ ६ ते ७ पटीने वाढ करत ही मर्यादा वाढविली. त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. कारण प्रत्यक्ष खर्चाचा व कागदी खर्चाचा मेळ लावताना उमेदवारांना खुप मोठी कसरत करावी लागणार होती. पण निवडणुक आयोगाने खरा झटका नगरपालिकेला पाठविलेल्या अध्यादेशाने दिला आहे. कारण यात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे की, उमेदवारांनी निवडणुक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते काढून ते जो खर्च करणार आहेत. तो खर्च धनादेशाच्या माध्यमातून करावा लागणार आहे. सर्वसामान्य उमेदवारांसाठी जरी हा निर्णय अडचणीचा ठरणार असला तरी आर्थिक बळावर निवडणुक लढविणा-या उमेदवारांवर या निर्णयाने फास आवळल्या जाणार आहे. या निर्णयाने संपुर्ण बेकायदेशीर प्रकार जरी थांबले नाहीत तरी ब-याच प्रमाणात आर्थिक उलाढालीवर आयोगाचे नियंत्रण राहणार आहे.
जर एखाद्या उमेदवाराने या नियमाचे उल्लंघन केले व त्या विरोधात सामान्य माणसांनी जरी तक्रार दिली व ते कृत्य सिद्ध झाले तर त्या उमेदवाराचे सदस्यत्व देखील रद्द होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांना आर्थिक गणिते जुळवतांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पुर्वी पैशाचा, खर्चाचा मेळ घालणे सोपे काम होते. आता मात्र ते अवघड बनले आहे. याबाबतचा अध्यादेश स्थानिक निवडणुक अधिका-यांना प्राप्त झाला असुन प्रत्येक उमेदवाराला या आदेशाची प्रत दिली जाणार असल्याची माहिती घाटंजीचे तहसिलदार तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी ‘देशोन्नती’ शी बोलतांना दिली. त्यामुळे यावर्षी मतदारांना पार्ट्या, मंडप, सभा, बैठका, पथके, वाहन खर्च आदीचे बील धनादेशाद्वारेच अदा करावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबरच राजकीय पक्षांचीही मोठी गोची होणार आहे.
साभार:-देशोन्नती 

घाटंजीकरांच्या भावनांचा ‘भाव’ लावणाऱ्या ‘त्या’ उमेदवाराविरोधात समाजमन एकवटणार

गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात नगर परिषदेच्या माध्यमातुन प्रत्येक कामात जनतेला वेठीस धरणा-या हुकुमशाही प्रवृत्तीच्या त्या उमेदवाराला न.प.मधुन हद्दपार करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकातुन प्रयत्न होणार असल्याचे चित्र सध्या घाटंजी शहरात आहे. त्या विद्यमान नगर सेवकाने केवळ घाटंजी नगर परिषदेतच धिंगाणा घातलेला नसुन काही वर्षांपुर्वी घाटंजी तालुका ज्या भावनेने एकत्र झाला होता त्या भावनेचाच ‘भाव’ या महाभागाने लावला होता. येथिल एका शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाने धार्मिक द्वेषभावनेतुन विद्यार्थ्यांसमोर वक्तव्य केले होते. त्यानंतर काही संघटना व विद्यार्थ्यांचे एक अभुतपुर्व आंदोलन घाटंजी शहरात झाले होते. तब्बल एक महिना या घटनेमुळे महाविद्यालय बंद होते. सदर प्राध्यापकावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये अवघे घाटंजी शहर सहभागी झाले होते. शहराच्या ईतिहासातील ते अद्वितीय जन आंदोलन ठरले. त्यावेळी हिंदुत्ववादी पक्षाचा नेता या नात्याने सदर नगरसेवकाकडे या आंदोलनाचे नेतृत्व होते. मात्र आंदोलन ऐन भरात असतांना त्याने चक्क जनतेच्या भावनांची किंमत लावुन आंदोलनाची धार कमी केली. त्या प्राध्यापकाकडुन घसघशीत रक्कम खिशात पडताच या महाशयांचा तोराच बदलला. त्यावेळी या ‘खपलेल्या’  नेत्याची खमंग चर्चा घाटंजी शहरात झाली होती.
एकंदरीतच जनतेच्या उठावाचे भांडवलही स्वत:चा स्वार्थ साधुन घेण्यासाठी करणा-या उपटसुंभ नेत्याचा अनुभव गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात जनतेने घेतला आहे. त्यामुळे केवळ पोकळ दहशतीचा वापर करून आपली पोळी शेकुन घेणा-या या नगरसेवकाला यावेळी नगरपरिषदेतुन हद्दपार करण्याचा चंग समाजातील काही घटकांनी घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने युवा वर्गाचा समावेश आहे. या उमेदवाराला इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने जवळ करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव त्यांचेवरही पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
साभार:-देशोन्नती 

Sunday 13 November 2011

घाटंजीत शिवसेनेच्या ‘त्या’ उमेदवारासाठी कॉंग्रेस-रा.काँ. करणार अ‍ॅडजस्टमेंट?

सत्तेत असतांना नगर परिषदेला ‘मालकी’ हक्काने वापरणा-या सेनेच्या नगर सेवकाला या निवडणुकीत नागरिकांच्या संतापामुळे पळता भुई थोडी होणार असल्याने त्याने कॉंग्रेस व रा.-कॉ.या पक्षांसोबत अ‍ॅडजस्टमेंटचे धोरण अवलंबिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सेनेच्या या उमेदवाराच्या वार्डामध्ये आरक्षणामुळे त्याच्यासाठी जागाच उरलेली नाही. मात्र वार्डाबाहेर तिळमात्रही अस्तित्व नसल्याने  निवडुन येणार नाही याची खात्री उमेदवारासह सर्वांना आहे. आपली राजकीय ‘दुकानदारी’ कायम ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केलेल्या या नगरसेवकाने विवीध मुद्द्यांच्या आधारे कॉंग्रेस रा.कॉ.ला दबावात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आरक्षणामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले. त्यावेळी कॉंग्रेस व काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वेळोवेळी सेनेला मदत केली. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या कार्यक्रमातही या नगरसेवकांची उपस्थिती चर्चिल्या गेली होती. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुक जिंकली त्या पक्षाला व बहुमताला महत्व न देता दोन्ही कॉंग्रेसचे काही नगरसेवक सेनेला ‘शरण’ गेले. कॉंग्रेसच्या नगरसेविकेच्या यजमानाचे कोट्यवधींचे ले-आऊट तांत्रीक कारणामुळे प्रलंबीत आहे. या ले-आऊटला मार्गी लावण्याच्या अटीवर कॉंग्रेसच्या नगरसेविकेने सेनेशी सलगी केली होती. मात्र अद्यापही या ले-आऊटचा तिढा सुटलेला नाही.
या निवडणुकीत सेनेच्या या नगरसेवकाला सहकार्य केले नाही तर ले-आऊटच्या कामात तो ‘कुरापती’ करणार या भितीने पुर्वाश्रमी कॉंग्रेस मध्ये असलेल्या व सध्या रा.कॉ.च्या वाटेवर असलेल्या या नगरसेविकेच्या पतीकडे रा.कॉं.ची शहरातील रणनिती ठरविण्याची जबाबदारी आहे. तसेच न.प.मध्ये निवडुन न आल्यास हा उमेदवार कॉंग्रेससाठीही अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे कॉंग्रेस व रा-कॉं.आपल्या प्रमुख उमेदवारांना सेनेच्या उमेदवाराविरूद्ध न ठेवता ईतरत्र हलविणार असल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी सक्षम उमेदवाराऐवजी एखादा ‘कामचलाऊ’ उमेदवार देऊन सेनेच्या उमेदवाराच्या विजयासाठी दोन्ही कॉंग्रेसमधील स्थानिक कार्यकर्ते मदत करणार असल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. एकंदरीतच सर्वच दृष्टीने खचलेली सेना व व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणात आलेले कॉंग्रेस-रा.काँ.मधील काही महाभाग यांच्या पक्षविरोधी डावांना वरिष्ठ सहकार्य करतात की हाणुन पाडतात याकडे घाटंजी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
साभार:-देशोन्नती 

Friday 11 November 2011

‘मुन्नी’च्या तालावर नाचणारा ठाणेदार बाबुराव खंदारे निलंबीत

अश्लिल गाण्यांच्या तालावर दुर्गोत्सव मिरवणुकीत धांगडधिंगा घालुन पोलीसांची प्रतिमा धुळीस मिळविणारा ठाणेदार बाबुराव खंदारे याला अखेर निंलबीत करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेचे सविस्तर वृत्त देशोन्नतीनेच प्रसिद्ध केले होते. वादग्रस्त कारकिर्द असल्याने अनेक प्रकरणात त्यांचेवर कार्यवाही प्रलंबीत होती. त्यातच घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये नेमणुक झाल्यापासुन त्यांनी अवैध यावसायीकांना संरक्षण व प्रत्येकच प्रकरणात सेटींगचे धोरण अवलंबुन पदाचा दुरूपयोग करणे सुरू केले होते. राजकारण्यांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे दाखल करायचे व आर्थिक पिळवणुक करायची असे अनेक प्रकरणात पुढे आले होते. अवैध व्यावसायीकांना पाठीशी घालुन पोलीस कर्मचा-यांवर अन्याय केल्याचेही ताजे उदाहरण आहे. या सर्व प्रकरणांबाबत देशोन्नतीने वेळोवेळी परखडपणे वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर बाबुराव खंदारेंच्या मनमानी प्रकरणांचा घडा आज भरला व त्यांना तडकाफडकी निंलबित करण्यात आले अशी माहिती आहे. पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यात सर्वत्र अवैध व्यवसायांना लगाम घालण्याचे आदेश दिले असतानांही घाटंजी तालुक्यात मात्र धडाक्यात हे व्यवसाय सुरू होते. त्यामुळे नागरिकांमध्येही पोलीस विभागाबद्दल संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या. खंदारेच्या निलंबनामुळे पोलीस दलाची चुकीची प्रतिमा जनतेसमोर आणणारा ‘बाबुराव पॅटर्न’ आता थांबणार असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
साभार:- देशोन्नती

बाहेरुन आणलेल्या गर्दीत हरविले न.प.चे धुरेकरी




तालुका कॉंग्रेसने नगर परिषद निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर घाटंजीत आयोजीत केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न करून बरीच गर्दी जमविली. कार्यक्रमाच्या मंचकावर नेते व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र या सर्व धावपळीत नगर परिषद निवडणुकीत ज्यांच्या खांद्यावर कॉंग्रेसची धुरा आहे ते जगदिश पंजाबी मान्यवरांमध्ये कुठेच दिसले नाहीत. विषेश म्हणजे त्यांचा उल्लेखही कार्यक्रमादरम्यान झाला नाही. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. जगदिश पंजाबी हे बराच वेळ प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र काही वेळानंतर ते मंडपात दिसले नाही. अनेक कार्यकर्ते व्यासपीठावर विराजमान होते. निलेश पारवेकर यांच्या गटाचे प्रमुख कार्यकर्ते मात्र व्यासपीठाच्या बाजुला होते. आ.पारवेकरांनी संचालन करणा-याला त्यांना व्यासपीठावर बोलाविण्याची सुचना केली. मात्र बराच वेळ त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर नामोल्लेख न करता त्यांना आमंत्रीत करण्यात आले. एकंदरीतच आयोजकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांसमोर आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सामाजीक न्याय मंत्र्यांच्या  निकटस्थ असलेल्या जि.प.सदस्याने खासगी वाहनांद्वारे खेड्यापाड्यातुन विवीध कारणाने लोकांना एकत्रीत केले. कार्यक्रम झाल्यावर अनेक जण आपले काम होईल या आशेने ‘भाऊंना’ शोधत होते.
या दरम्यान निष्ठावंतांच्या मेळाव्यात काही नागरीकांनी एका खिसेकापुला पकडले. त्याला बेदम मारहाण करीत व्यासपीठाजवळ नेण्यात आले. सदर चोरट्याला पोलीसांच्या ताब्यात देण्याची विनंती जमावाने संयोजकांना केली. मात्र संयोजक आपल्याच कामात असल्याचे लक्षात आल्यावर जमावाने त्या चोरट्याची धुलाई केली. काहींनी तर त्याला व्यासपीठाजवळच्या खांबाला दोरीने बांधण्याचाही प्रयत्न केला. हा गोंधळ थांबविण्यासाठी कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते पुढे धजावत नव्हते. अखेर जमावाने त्या चोरट्याला मारहाण करीतच पोलीसांच्या स्वाधीन केले. कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने पोलीस ताफा होता. मात्र चोरट्याची धुलाई होत असताना एकही पोलीस कर्मचारी कार्यक्रमस्थळी नव्हता. पोलीस स्टेशनला पोलीसांनी सदर चोरट्याची झडती घेतली असता त्याचेजवळ काहीही आढळले नाही. मो.अन्वर मो.शमी असे या चोरट्याचे नाव असुन तो दिग्रस येथिल रहिवासी आहे.
साभार:- देशोन्नती 

जिल्ह्यातील घडामोडींचे प्रत्युत्तर राज्यात देऊ-माणीकराव ठाकरे

 


यवतमाळ जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या  नेते व कार्यकर्त्यांना आमिष दाखवुन राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे खेचण्याच्या अजित पवारांच्या नीतीला राज्यात चोख प्रत्युत्तर देऊ असा ईशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणीकराव ठाकरे यांनी दिला. घाटंजी येथे आयोजीत कॉंग्रेस पक्षाच्या महामेळाव्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष केंद्र व राज्यात सत्तेवर आहेत. मित्रपक्ष अशी आमची ओळख आहे. मात्र गेल्या काही काळात राष्ट्रवादीने आघाडीचे संकेत पाळले नाहीत. पद व प्रतिष्ठेच्या आमिषाद्वारे ते आपले संख्याबळ वाढवित आहेत. त्यामुळे ज्यांना ईतर पक्षात जायचे आहे त्यांनी खुशाल जावे. कॉंग्रेसलाही त्यांची गरज नाही असे ते म्हणाले. कॉंग्रेसची भिस्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आहे. त्यामुळे कितीही नेते गेले तरी कॉंग्रेसला फरक पडणार नाही असा टोला त्यांनी लगावला. कापसाच्या भाववाढ़ीवर बोलतांना त्यांनी ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने त्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला असुन लवकरच नाफेड व सि.सि.आय.ची खरेदी सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
या मेळाव्याचे उद्घाटन सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, यवतमाळ जिल्ह्याचे प्रभारी अशोक धवड, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार, आमदार निलेश पारवेकर, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विजया धोटे, यवतमाळचे नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, योगेश पारवेकर, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बढे यांचेसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

गेल्या घरी सुखी रहा-मोघे
क्षुल्लक कारणासाठी पक्ष सोडणा-यांनी गेल्या घरी सुखी रहावे असा सल्ला सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सुरेश लोणकरांना दिला. सुरेश लोणकर हे जुने सहकारी असल्याने त्यांच्याबाबत काही टिका करणार नाही असे मोघे म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला धोरण नाही. तर कॉंग्रेस पक्ष धेय्य धोरणामुळेच टिकुन आहे असे ते म्हणाले. तर याप्रसंगी बोलतांना संजय देशमुख म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील नेते उसाच्या भावासाठी आंदोलन करताहेत. त्यामुळे विदर्भ व यवतमाळ जिल्ह्यातील कापसाला भाव मिळावा यासाठी माणीकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी पाऊले उचलण्याची गरज आहे. वामनराव कासावारांनी आपल्या भाषणात पक्ष सोडुन जाणा-यांमुळे पक्ष शुद्धीकरणाची प्रक्रीया सुरू झाल्याचे विधान केले.

कॉंग्रेस पक्ष सोडण्याची पाळी आल्यास जाहीर फाशी घेईन-पुरके
अस्सल स्त्रि कधीच घर सोडत नसते. पक्ष ही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही. ज्या पक्षाने आपल्याला सर्वकाही दिले त्या पक्षाप्रती आदर व निष्ठा गरजेची असुन कॉंग्रेस हा निरोप देणा-यांचा पक्ष असल्याचे सांगत आपल्यावर पक्ष सोडण्याची पाळी आल्यास जाहीर फाशी घेईल असे त्यांनी ठामपणे सांगीतले. या मेळाव्याला पांढरकवडा, आर्णी व घाटंजी तालुक्यातील ग्रामिण भागातुन मोठ्या संख्येने लोकांना आणण्यात आल्याने बरीच गर्दी जमली होती.

‘अकरा’ च्या मुहुर्ताला एकशे अकरा प्रेक्षक
शतकात एकदाच येणा-या ११-११-२०११ चा मुहुर्त साधुन कॉंग्रेसने महामेळाव्याचे आयोजन केले होते. विषेश म्हणजे कार्यक्रमाची वेळही ११ वाजुन ११ मिनिटांची ठेवण्यात आली होती. मात्र नियोजीत वेळेला बाहेरगावाहुन बोलविण्यात आलेल्या प्रेक्षकांच्या गाड्या न पोहचल्याने अत्यंत तुरळक उपस्थिती होती. त्यामुळे अकरा अकरा च्या मुहुर्ताला एकशे अकरा प्रेक्षक उपस्थित असल्याची खमंग चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

Thursday 10 November 2011

घाटंजीत कॉंग्रेसच्या ‘निष्ठावान’ कार्यकर्त्यांचा महामेळावा

११ तारखेच्या मुहूर्तावर होणार निष्ठेची परिक्षा
जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये ‘राष्ट्रवादी’ पक्षांतराचे संक्रमण झपाट्याने पसरत असल्याने कॉंग्रेसवर निष्ठावान कार्यकर्त्यांचा महामेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करण्याची पाळी आली आहे. डोक्यावर येऊन ठेपलेल्या नगर परिषद निवडणुका व त्यानंतर महिन्याभरातच होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे कॉंग्रेसला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. याचाच एक भाग म्हणुन दि. ११/११/२०११ ला ठिक ११ वाजुन ११ मिनिटांनी घाटंजी येथे कॉंग्रेसच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांचे हस्ते होईल. तर प्रमुख पाहुणे म्हणुन विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, कॉंग्रेसचे यवतमाळ जिल्हा प्रभारी अशोक धवड, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार, यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर, उमरखेडचे आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, अ.भा.महिला कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संध्या सव्वालाखे, महिला कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष विजया धोटे, घाटंजी न.प.निवडणुकीचे कॉंग्रेस समन्वयक दिलीप भोजराज यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन घाटंजी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
लवकरच कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मेगा पक्षांतर होणार आहे. त्या पृष्ठभुमीवर कॉंग्रेसचा हा महामेळावा महत्वाचा ठरणार आहे.

घाटंजी नगर परिषद ‘सक्षम’ नेतृत्वाच्या प्रतिक्षेत


राजकीय पक्षांना उमेदवारांची टंचाई
येत्या ८ डिसेंबरला होणा-या नगर परिषदेच्या निवडणुकीतून यावेळी तरी घाटंजी शहराला सक्षम नेतृत्व लाभणार का याची उत्सुकता प्रत्येक घाटंजीकराला लागली आहे. मागील निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने सत्ताधा-यांची गुर्मी उतरविल्यानंतर नव्या नेतृत्वाकडून मतदारांना चांगल्या कामांची अपेक्षा होती. मात्र खुर्चीवर बसताच नवख्या नगरसेवकांचा तोरा बदलला. निवडणुकित दिलेल्या सर्व आश्वासनांचा त्यांना विसर पडला. अन त्यानंतर निगरगट्ट कारभाराच्या एका नव्याच पर्वाची सुरूवात झाली. अडीच वर्ष भाजप-रा.कॉ.च्या अभद्र युतीकडे नगराध्यक्ष पद होते. त्यांच्या मनमानी कारभारानंतर आरक्षणामुळे शिवसेनेकडे आयतीच सत्ता आली. बहुमत नसतानांही मिळालेल्या नगराध्यक्षपदाचा शक्य तितका फायदा सेनेने घेतला. अडीच वर्ष प्रशासनाला बोटावर नाचवुन ‘हम करे सो कायदा’ याच तत्वाने त्यांचे काम चालले.
या निवडणुकीत प्रभाग पद्धत आल्यामुळे राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची कसोटीच लागणार आहे. एकुण १७ वार्ड पाच प्रभागात विभागल्या गेल्याने निवडणुक प्रचारात उमेदवारांची दमछाक होणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची केंद्र व राज्यात आघाडी असली तरी नगर परिषद निवडणुकीत मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहे. घाटंजी तालुक्यात निवडणुकीपुर्वी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लोणकर यांच्या सोबत एक मोठा गट रा.कॉ.मध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याने या दोन मुख्य पक्षामधील दरी आणखीच वाढली आहे. घाटंजीत मुख्य लढत या दोन पक्षांमध्येच होणार असा प्राथमिक अंदाज आहे. महिलांना मिळालेले पन्नास टक्के आरक्षण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती यामुळे राजकीय पक्षांना योग्य उमेदवारांची टंचाई भासत आहे.
तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी मात्र अनेक उमेदवार आपली दावेदारी सांगत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे दिर्घ प्रतिक्षेनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाल्याने बहुतांश उमेदवार नगराध्यक्षपदाकडे नजर ठेऊनच निवडणुकीचा विचार करीत आहे.


जात पडताळणीसाठी १५ नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवा
तहसिलदार संतोष शिंदे यांचे आवाहन
जानेवारी  ते मार्च महिन्यात होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकांसाठी मागासवर्गीय उमेदवारांना जात पडताळणीचे प्रस्ताव १५ नोव्हेंबर पर्यंत तहसिल कार्यालयात सादर करावे लागणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय व विषेश सहाय्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरीता राखीव प्रभागातुन निवडणुक लढविणा-या ईच्छुक उमेदवारांनी जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह तहसिल कार्यालयात सादर करावे असे आवाहन घाटंजीचे तहसिलदार संतोष शिंदे यांनी केले आहे.

साभार:- देशोन्नती

Wednesday 9 November 2011

‘राजुरवाडी’ ने जाणले ‘लाख’ मोलाच्या शेतीचे महत्व

लाखेचे उत्पन्न घेणारे ‘रोलमॉडेल’ गाव


आपल्या नित्यपयोगातील ईलेक्ट्रॉनिक वस्तु, सौंदर्य प्रसाधने व इतरही अनेक कामात वापरल्या जाणारा ‘लाख’ हा पदार्थ कुठून येतो याबाबत अनेकांना कल्पनाही नसते. शासकीय कामकाजात ‘सिल’ लावण्यासाठी प्रामुख्याने उपयोगात येणा-या लाखेची शेती हा प्रयोग विदर्भासाठी नवखाच. मात्र घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी गावाने लाखेची शेती करून वर्षभरातच सुमारे १५ ते २० टन उत्पन्न घेण्यापर्यंतची मजल मारली आहे. वनविभाग व गावक-यांच्या सहभागातुन शासनाचा हा उपक्रम या गावाने सार्थ ठरवुन एक अनुकरणीय पायंडा घातला आहे.लाख शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी वनविभागातर्फे गावपातळीवर संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले होते. राजुरवाडी येथे या समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर खंडाळकर यांची निवड करण्यात आली. खंडाळकर यांनी लाख शेतीचे महत्व ओळखुन गावातील बेरोजगार युवक, शेतकरी, शेतमजुर यांना या अभिनव उपक्रमाबद्दल जागृत केले.
लाख शेतीबाबत सविस्तर माहिती तसेच तंत्रजान आत्मसात करण्यासाठी खंडाळकर यांनी रांची (बिहार), कांकेर (छत्तीसगढ), बालाघाट (मध्यप्रदेश) याठिकाणी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गावातील बी.पी.एल.धारक आदिवासी तथा शेतमजुरांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
अन पाहता पाहता अवघ्या एका वर्षातच राजुरवाडी या छोट्याशा गावात लाखेचे सुमारे १५ ते २० टन उत्पन्न घेण्यात आले. अत्यल्प श्रम व खर्चात अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याने ग्रामस्थानांही या शेतीची आवड निर्माण झाली आहे.
लाख ही एकप्रकारची नैसर्गीक राळ आहे. मादा लाख किटकापासुन प्रजनन केल्यानंतर स्त्रावाच्या रूपात तयार होतो. भारतात केरिया लक्का नावाच्या लाख किटकाच्या दोन जाती आढळतात. ज्यांच्यापासुन कुसूमी व रंगीनी ही दोन प्रकारची लाख मिळते. लाखेचे उत्पन्न वर्षातुन दोनदा घेतल्या जाते. पळस, बोर, बाभुळ, खैर, वड, पिंपळ अशा पोषक वृक्षांच्या फांद्यांवर लाखेचे बिज (किटक) सोडल्या जातात. काही काळ लाखेच्या किटकांची शत्रु किटकांपासुन संरक्षण व्हावे यासाठी काळजी घ्यावी लागते. त्यानंतर काही महिन्यानी परिपक्व झालेल्या लाखेच्या फांद्यांची छाटणी करतात. यामुळे झाडाचा आणखी विस्तार होतो. तसेच आपोआपच वृक्षतोड नियंत्रीत झाल्याने पर्यावरण संतुलनासही मोलाचा हातभार लागतो.
संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर खंडाळकर व सचिव वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक के.पी.गायकवाड यांनी या शासकीय योजनेला प्रभावीपणे राबविल्यामुळे राजुरवाडी गाव लाख उत्पादनात केवळ यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातही लक्षवेधी ठरले आहे. घाटंजीचे वनपरिक्षेत्र अधिकारी के.झेड.राठोड यांनी वेळोवेळी ग्रामस्थांना साहित्य, बिज तसेच मार्गदर्शन केल्याने ही योजना राबविणे सोपे झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. उपवनसंरक्षक सुधाकर डोळे, मुख्य वनसंरक्षक देवेंद्र कुमार यांनी राजुरवाडीला भेट देऊन लोकसहभाग व समितीच्या कामाची प्रशंसा केली आहे.
आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांसाठी लाख शेती संजीवनी ठरू शकते. त्यामुळे ईतर गावांनी राजुरवाडीपासुन प्रेरणा घेऊन हा प्रकल्प राबवावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुधाकर खंडाळकर तसेच वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक के.पी.गायकवाड यांनी केले आहे.
अमोल राऊत
साभार:- देशोन्नती