Pages

Friday, 11 November 2011

जिल्ह्यातील घडामोडींचे प्रत्युत्तर राज्यात देऊ-माणीकराव ठाकरे

 


यवतमाळ जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या  नेते व कार्यकर्त्यांना आमिष दाखवुन राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे खेचण्याच्या अजित पवारांच्या नीतीला राज्यात चोख प्रत्युत्तर देऊ असा ईशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणीकराव ठाकरे यांनी दिला. घाटंजी येथे आयोजीत कॉंग्रेस पक्षाच्या महामेळाव्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष केंद्र व राज्यात सत्तेवर आहेत. मित्रपक्ष अशी आमची ओळख आहे. मात्र गेल्या काही काळात राष्ट्रवादीने आघाडीचे संकेत पाळले नाहीत. पद व प्रतिष्ठेच्या आमिषाद्वारे ते आपले संख्याबळ वाढवित आहेत. त्यामुळे ज्यांना ईतर पक्षात जायचे आहे त्यांनी खुशाल जावे. कॉंग्रेसलाही त्यांची गरज नाही असे ते म्हणाले. कॉंग्रेसची भिस्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आहे. त्यामुळे कितीही नेते गेले तरी कॉंग्रेसला फरक पडणार नाही असा टोला त्यांनी लगावला. कापसाच्या भाववाढ़ीवर बोलतांना त्यांनी ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने त्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला असुन लवकरच नाफेड व सि.सि.आय.ची खरेदी सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
या मेळाव्याचे उद्घाटन सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, यवतमाळ जिल्ह्याचे प्रभारी अशोक धवड, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार, आमदार निलेश पारवेकर, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विजया धोटे, यवतमाळचे नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, योगेश पारवेकर, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बढे यांचेसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

गेल्या घरी सुखी रहा-मोघे
क्षुल्लक कारणासाठी पक्ष सोडणा-यांनी गेल्या घरी सुखी रहावे असा सल्ला सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सुरेश लोणकरांना दिला. सुरेश लोणकर हे जुने सहकारी असल्याने त्यांच्याबाबत काही टिका करणार नाही असे मोघे म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला धोरण नाही. तर कॉंग्रेस पक्ष धेय्य धोरणामुळेच टिकुन आहे असे ते म्हणाले. तर याप्रसंगी बोलतांना संजय देशमुख म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील नेते उसाच्या भावासाठी आंदोलन करताहेत. त्यामुळे विदर्भ व यवतमाळ जिल्ह्यातील कापसाला भाव मिळावा यासाठी माणीकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी पाऊले उचलण्याची गरज आहे. वामनराव कासावारांनी आपल्या भाषणात पक्ष सोडुन जाणा-यांमुळे पक्ष शुद्धीकरणाची प्रक्रीया सुरू झाल्याचे विधान केले.

कॉंग्रेस पक्ष सोडण्याची पाळी आल्यास जाहीर फाशी घेईन-पुरके
अस्सल स्त्रि कधीच घर सोडत नसते. पक्ष ही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही. ज्या पक्षाने आपल्याला सर्वकाही दिले त्या पक्षाप्रती आदर व निष्ठा गरजेची असुन कॉंग्रेस हा निरोप देणा-यांचा पक्ष असल्याचे सांगत आपल्यावर पक्ष सोडण्याची पाळी आल्यास जाहीर फाशी घेईल असे त्यांनी ठामपणे सांगीतले. या मेळाव्याला पांढरकवडा, आर्णी व घाटंजी तालुक्यातील ग्रामिण भागातुन मोठ्या संख्येने लोकांना आणण्यात आल्याने बरीच गर्दी जमली होती.

‘अकरा’ च्या मुहुर्ताला एकशे अकरा प्रेक्षक
शतकात एकदाच येणा-या ११-११-२०११ चा मुहुर्त साधुन कॉंग्रेसने महामेळाव्याचे आयोजन केले होते. विषेश म्हणजे कार्यक्रमाची वेळही ११ वाजुन ११ मिनिटांची ठेवण्यात आली होती. मात्र नियोजीत वेळेला बाहेरगावाहुन बोलविण्यात आलेल्या प्रेक्षकांच्या गाड्या न पोहचल्याने अत्यंत तुरळक उपस्थिती होती. त्यामुळे अकरा अकरा च्या मुहुर्ताला एकशे अकरा प्रेक्षक उपस्थित असल्याची खमंग चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

No comments:

Post a Comment