घाटंजी तालुक्यात ‘लोन रॅकेट’ सक्रिय?
नावावर शेती नसतानांही येथिल स्टेट बँकेच्या शाखेतुन पिक कर्ज दिल्याची बाब पुढे आल्याने घाटंजी तालुक्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मिळवुन देणारी टोळी सक्रीय असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.आकपुरी (ता. यवतमाळ) येथिल त्रिवेणी विजय सातपुते या महिलेला तिच्या नावे शेती नसतांनाही चक्क ५५ हजार रूपयांचे पिक कर्ज देण्यात आले. भारतीय स्टेट बँकेच्या घाटंजी शाखेत फिल्ड ऑफिसर पदावर कार्यरत राहुल लेंडारे यांचेकडे कर्ज वितरणाची संपुर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बनावट सातबा-याच्या आधारावर पिक कर्ज मंजुर करून दिले असा आरोप करण्यात येत आहे. उल्लेखनिय म्हणजे सौ.सातपुते व लेंडारे हे आकपुरी येथिल निवासी आहेत. त्यामुळे लेंडारे यांना सातपुते यांच्या शेतीबाबत माहिती नसेल असे नाही. कर्ज प्रकरणासाठी सादर करण्यात आलेला आकपुरी येथिल गट क्रं. १२२/१ या शेताचा सातबारा दुर्गादास शामराव मार्कंड यांच्या नावे तर मौजा झुली येथिल गट क्र. १२२/१चा सातबारा सोमन्ना पेठकर चव्हाण यांच्या नावाचा आहे. या सातबा-याच्या सत्यतेबाबत कोणतीही पडताळणी न करता राहुल लेंडारे यांनी हे कर्ज तातडीने मंजुर करून दिले. या बनवाबनवीची पोलीस स्टेशनला तक्रार करताच त्रिवेणी सातपुते यांनी या सर्व प्रकाराची कबुली देऊन उचललेल्या रकमेचा भरणा केला. असे असले तरी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलणे तसेच त्यासाठी सहकार्य करणे या आरोपाखाली त्रिवेणी सातपुते अथवा राहुल लेंडारे यांचे विरोधात घाटंजी पोलीसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला नाही. ग्रामिण भागात अशा प्रकारे कर्ज मिळवुन देणा-या एजंटांचे मोठे नेटवर्क तयार झाले असुन त्यांचे जवळ बनावट कागदपत्रे तयार करण्याचे तंत्र उपलब्ध आहे. तलाठ्यापासुन तहसिलदारापर्यंत सर्वांचे बनावट शिक्के या टोळ्यांजवळ उपलब्ध आहेत. त्या आधारेच बँक कर्मचा-यांच्या माध्यमातुन कर्ज मिळवुन देण्याचा प्रकार आता राष्ट्रीयीकृत बँकामध्ये सुद्धा फोफावला आहे. या प्रकरणात पोलीसांनी राहुल लेंडारे याची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment