प्रत्येक उमेदवाराला काढावे लागणार स्वतंत्र बँक खाते
येत्या ८ डिसेंबरला होणा-या नगर परिषद निवडणुकीत निवडणुक आयोगाने खर्चाची मर्यादा वाढविली आहे. मात्र हा खर्च चेकद्वारेच करावा असा अध्यादेश काढून उमेदवारांच्या आर्थिक व्यवहारांना लगामही घातली आहे. यावेळच्या निवडणुकीत वार्डांचे प्रभागात रूपांतर झाल्यामुळे कार्यकक्षा तब्बल चौपट ते पाचपट झाली आहे.त्यामुळे यापुर्वी असलेल्या खर्च मर्यादेत एवढ्या मतदारांपर्यंत पोहचणे उमेदवारांना शक्य होणार नाही ही बाब लक्षात घेऊन आयोगाने उमेदवारांच्या खर्चात जवळ जवळ ६ ते ७ पटीने वाढ करत ही मर्यादा वाढविली. त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. कारण प्रत्यक्ष खर्चाचा व कागदी खर्चाचा मेळ लावताना उमेदवारांना खुप मोठी कसरत करावी लागणार होती. पण निवडणुक आयोगाने खरा झटका नगरपालिकेला पाठविलेल्या अध्यादेशाने दिला आहे. कारण यात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे की, उमेदवारांनी निवडणुक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र खाते काढून ते जो खर्च करणार आहेत. तो खर्च धनादेशाच्या माध्यमातून करावा लागणार आहे. सर्वसामान्य उमेदवारांसाठी जरी हा निर्णय अडचणीचा ठरणार असला तरी आर्थिक बळावर निवडणुक लढविणा-या उमेदवारांवर या निर्णयाने फास आवळल्या जाणार आहे. या निर्णयाने संपुर्ण बेकायदेशीर प्रकार जरी थांबले नाहीत तरी ब-याच प्रमाणात आर्थिक उलाढालीवर आयोगाचे नियंत्रण राहणार आहे.
जर एखाद्या उमेदवाराने या नियमाचे उल्लंघन केले व त्या विरोधात सामान्य माणसांनी जरी तक्रार दिली व ते कृत्य सिद्ध झाले तर त्या उमेदवाराचे सदस्यत्व देखील रद्द होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांना आर्थिक गणिते जुळवतांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पुर्वी पैशाचा, खर्चाचा मेळ घालणे सोपे काम होते. आता मात्र ते अवघड बनले आहे. याबाबतचा अध्यादेश स्थानिक निवडणुक अधिका-यांना प्राप्त झाला असुन प्रत्येक उमेदवाराला या आदेशाची प्रत दिली जाणार असल्याची माहिती घाटंजीचे तहसिलदार तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी ‘देशोन्नती’ शी बोलतांना दिली. त्यामुळे यावर्षी मतदारांना पार्ट्या, मंडप, सभा, बैठका, पथके, वाहन खर्च आदीचे बील धनादेशाद्वारेच अदा करावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबरच राजकीय पक्षांचीही मोठी गोची होणार आहे.
साभार:-देशोन्नती
No comments:
Post a Comment