Pages

Sunday, 13 November 2011

घाटंजीत शिवसेनेच्या ‘त्या’ उमेदवारासाठी कॉंग्रेस-रा.काँ. करणार अ‍ॅडजस्टमेंट?

सत्तेत असतांना नगर परिषदेला ‘मालकी’ हक्काने वापरणा-या सेनेच्या नगर सेवकाला या निवडणुकीत नागरिकांच्या संतापामुळे पळता भुई थोडी होणार असल्याने त्याने कॉंग्रेस व रा.-कॉ.या पक्षांसोबत अ‍ॅडजस्टमेंटचे धोरण अवलंबिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सेनेच्या या उमेदवाराच्या वार्डामध्ये आरक्षणामुळे त्याच्यासाठी जागाच उरलेली नाही. मात्र वार्डाबाहेर तिळमात्रही अस्तित्व नसल्याने  निवडुन येणार नाही याची खात्री उमेदवारासह सर्वांना आहे. आपली राजकीय ‘दुकानदारी’ कायम ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केलेल्या या नगरसेवकाने विवीध मुद्द्यांच्या आधारे कॉंग्रेस रा.कॉ.ला दबावात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आरक्षणामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे आले. त्यावेळी कॉंग्रेस व काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वेळोवेळी सेनेला मदत केली. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या कार्यक्रमातही या नगरसेवकांची उपस्थिती चर्चिल्या गेली होती. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुक जिंकली त्या पक्षाला व बहुमताला महत्व न देता दोन्ही कॉंग्रेसचे काही नगरसेवक सेनेला ‘शरण’ गेले. कॉंग्रेसच्या नगरसेविकेच्या यजमानाचे कोट्यवधींचे ले-आऊट तांत्रीक कारणामुळे प्रलंबीत आहे. या ले-आऊटला मार्गी लावण्याच्या अटीवर कॉंग्रेसच्या नगरसेविकेने सेनेशी सलगी केली होती. मात्र अद्यापही या ले-आऊटचा तिढा सुटलेला नाही.
या निवडणुकीत सेनेच्या या नगरसेवकाला सहकार्य केले नाही तर ले-आऊटच्या कामात तो ‘कुरापती’ करणार या भितीने पुर्वाश्रमी कॉंग्रेस मध्ये असलेल्या व सध्या रा.कॉ.च्या वाटेवर असलेल्या या नगरसेविकेच्या पतीकडे रा.कॉं.ची शहरातील रणनिती ठरविण्याची जबाबदारी आहे. तसेच न.प.मध्ये निवडुन न आल्यास हा उमेदवार कॉंग्रेससाठीही अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे कॉंग्रेस व रा-कॉं.आपल्या प्रमुख उमेदवारांना सेनेच्या उमेदवाराविरूद्ध न ठेवता ईतरत्र हलविणार असल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी सक्षम उमेदवाराऐवजी एखादा ‘कामचलाऊ’ उमेदवार देऊन सेनेच्या उमेदवाराच्या विजयासाठी दोन्ही कॉंग्रेसमधील स्थानिक कार्यकर्ते मदत करणार असल्याचे खासगीत बोलल्या जात आहे. एकंदरीतच सर्वच दृष्टीने खचलेली सेना व व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणात आलेले कॉंग्रेस-रा.काँ.मधील काही महाभाग यांच्या पक्षविरोधी डावांना वरिष्ठ सहकार्य करतात की हाणुन पाडतात याकडे घाटंजी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
साभार:-देशोन्नती 

No comments:

Post a Comment