Pages

Wednesday, 30 November 2011

घाटंजीत वर्तमान नगरसेवकांसाठी 'दरवाजे बंद'

नगर परिषद निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसा प्रचाराचा वेग वाढत असुन उमेदवारांच्या गृहभेटींना सुरूवात झाली आहे. घाटंजी नगर परिषदेचा गेल्या पाच वर्षांचा कार्यकाळ लक्षात घेता नगरिकांमध्ये नगरसेवकांविषयी मुळीच सहानुभूती राहिली नसुन उमेदवार भेटीसाठी येताच मतदार घरातुन काढता पाय घेत आहेत. तर काही ठिकाणी उमेदवारांसाठी घराचे दरवाजेच बंद होत असल्याने काही उमेदवारांची चांगलीच पंचाईत होत आहे. हा अनुभव प्रामुख्याने वर्तमान नगरसेवक व सत्तेत असलेल्या उमेदवारांना येत आहे. नागरिक ज्यावेळी आपल्या अडचणी व समस्या घेऊन न.प.कार्यालयात जात असत तेव्हा अनेकदा हे तथाकथित लोकप्रतिनिधी दडुन बसत. रस्त्यावर मुरूम टाकतांनाही जे भेदभाव करित होते त्या नगरसेवकांना आता घरी उभेच करायचे नाही अशी अनेक घाटंजीकरांची मानसिकता झाली आहे. उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप होण्याच्या तिन दिवसांपुर्वीच एका राजकीय पक्षाने मोठमोठे होर्डींग्स व लाऊडस्पिकरच्या कर्णकर्कश आवाजात प्रचाराला सुरूवात करून आपल्या उताविळपणाचा परिचय दिला. गेल्या तिन दिवसात खोटारडी आश्वासने व पोकळ घोषणांच्या आवाजानेच घाटंजीकरांची झोप उघडत आहे. लाऊडस्पिकरच्या आवाजासंबंधी सर्व नियम मोडीत निघत असुन सुद्धा प्रशासन यावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरत आहे. सकाळी ९ वाजल्यानंतरच लाऊडस्पिकर वाजविण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.
गेल्या काही वर्षात ‘विकास’ हा शब्दच घाटंजीकरांसाठी नवलाईचा आहे. सध्या घाटंजीच्या सर्वांगीन विकासाची खात्री देणा-यांनी गेल्या अडीच वर्षात काय दिवे लावले असा प्रश्न पुढे येत आहे. पाच वर्षाच्या छळाचे उत्तर देण्याची हिच खरी वेळ आहे याच भावनेतुन आता अनेक मतदारांची विद्यमान नगरसेवक असलेल्या उमेदवारांविषयी नकारघंटा असल्याचे चित्र आहे. यामध्ये केवळ सत्तेत असलेलेच नव्हे तर विरोधकानाही जनतेच्या प्रासंगिक संतापाचा सामना करावा लागत आहे. नुकताच एका पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग क्र. १ मध्ये लाऊडस्पिकरच्या कर्कश  आवाजात गृहभेटी घेतल्या. ज्या ठिकाणी आपली डाळ शिजणार नाही याची त्यांना खात्री होती तेथे जाणेच या उमेदवारांनी टाळल्याने ते किती पाण्यात आहेत हे सर्वांनाच लक्षात आले. जुन्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली नविन उमेदवारांकडे मतदार आशेने पहात असुन नवख्या तसेच पुर्वानुभवी उमेदवारांना यावेळी मतदार संधी देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
साभार:- देशोन्नती

3 comments: