Pages

Friday 11 November 2011

बाहेरुन आणलेल्या गर्दीत हरविले न.प.चे धुरेकरी




तालुका कॉंग्रेसने नगर परिषद निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर घाटंजीत आयोजीत केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न करून बरीच गर्दी जमविली. कार्यक्रमाच्या मंचकावर नेते व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र या सर्व धावपळीत नगर परिषद निवडणुकीत ज्यांच्या खांद्यावर कॉंग्रेसची धुरा आहे ते जगदिश पंजाबी मान्यवरांमध्ये कुठेच दिसले नाहीत. विषेश म्हणजे त्यांचा उल्लेखही कार्यक्रमादरम्यान झाला नाही. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. जगदिश पंजाबी हे बराच वेळ प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र काही वेळानंतर ते मंडपात दिसले नाही. अनेक कार्यकर्ते व्यासपीठावर विराजमान होते. निलेश पारवेकर यांच्या गटाचे प्रमुख कार्यकर्ते मात्र व्यासपीठाच्या बाजुला होते. आ.पारवेकरांनी संचालन करणा-याला त्यांना व्यासपीठावर बोलाविण्याची सुचना केली. मात्र बराच वेळ त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर नामोल्लेख न करता त्यांना आमंत्रीत करण्यात आले. एकंदरीतच आयोजकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांसमोर आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सामाजीक न्याय मंत्र्यांच्या  निकटस्थ असलेल्या जि.प.सदस्याने खासगी वाहनांद्वारे खेड्यापाड्यातुन विवीध कारणाने लोकांना एकत्रीत केले. कार्यक्रम झाल्यावर अनेक जण आपले काम होईल या आशेने ‘भाऊंना’ शोधत होते.
या दरम्यान निष्ठावंतांच्या मेळाव्यात काही नागरीकांनी एका खिसेकापुला पकडले. त्याला बेदम मारहाण करीत व्यासपीठाजवळ नेण्यात आले. सदर चोरट्याला पोलीसांच्या ताब्यात देण्याची विनंती जमावाने संयोजकांना केली. मात्र संयोजक आपल्याच कामात असल्याचे लक्षात आल्यावर जमावाने त्या चोरट्याची धुलाई केली. काहींनी तर त्याला व्यासपीठाजवळच्या खांबाला दोरीने बांधण्याचाही प्रयत्न केला. हा गोंधळ थांबविण्यासाठी कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते पुढे धजावत नव्हते. अखेर जमावाने त्या चोरट्याला मारहाण करीतच पोलीसांच्या स्वाधीन केले. कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने पोलीस ताफा होता. मात्र चोरट्याची धुलाई होत असताना एकही पोलीस कर्मचारी कार्यक्रमस्थळी नव्हता. पोलीस स्टेशनला पोलीसांनी सदर चोरट्याची झडती घेतली असता त्याचेजवळ काहीही आढळले नाही. मो.अन्वर मो.शमी असे या चोरट्याचे नाव असुन तो दिग्रस येथिल रहिवासी आहे.
साभार:- देशोन्नती 

No comments:

Post a Comment