Pages

Showing posts with label सामाजीक न्याय मंत्री. Show all posts
Showing posts with label सामाजीक न्याय मंत्री. Show all posts

Wednesday, 5 December 2012

महापंचायतीतील तक्रारींचा निपटारा करण्याचे आव्हान - ना.मोघे



लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व जनतेमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी महापंचायतीचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे. यामध्ये सातत्य ठेवुन आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आव्हान पेलणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजीक न्याय मंत्री ना.शिवाजीराव मोघे यांनी केले. घाटंजी पंचायत समितीमध्ये आयोजीत महापंचायतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार होते. विभागीय आयुक्त डि.आर.बनसोड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष ईकलाख खान, पांढरकवड्याचे नगराध्यक्ष शंकर बडे, घाटंजीचे नगराध्यक्ष जगदिश पंजाबी, पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले यांचेसह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मोघे म्हणाले की, पंचायतीची परंपरा ब-याच काळापासुन अस्तित्वात आहे. विवीध समस्यांसाठी नागरिकांना भटकावे लागु नये यासाठी हा उपक्रम चांगला आहे असे ते म्हणाले. अधिकाधीक लोकांपर्यंत हा विषय जावा यासाठी जनजाग्रृतीची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. शेतक-यांनी जोडधंदे केल्यास शेतीसाठी ते पुरक ठरेल. शेळीपालन, दुग्धव्यवसाय यासह अनेक व्यवसायांची कास शेतक-यांना धरता येईल. आपल्या भागातील नागरिक सक्षम व्हावे याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक पदाधिका-यांची असल्याचे ते म्हणाले. येत्या सहा महिन्यात मतदार संघातील डोळ्यांच्या विकाराने पीडीत असलेल्या रूग्णांवर उपचार व चष्मे वितरीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांची समायोचीत भाषणे झालीत. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पथनाट्य सादर करण्यात आले. या महापंचायतीत काही नागरीकांच्या तक्रारींचे प्रातिनिधीक स्वरूपात वाचन करण्यात आले. आपली तक्रार सोडविली जाणार या अपेक्षेने अनेक नागरिकांनी तक्रार अर्ज भरून दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तहसिलदार प्रकाश राऊत, गटविकास अधिकारी अजय राठोड यांच्या मार्गदर्शनात कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.
साभार :- देशोन्नती 

Saturday, 26 November 2011

ना.मोघेंच्या 'वाटप' हट्टामुळे घरकुल लाभार्थ्यांची परवड

धनादेशाच्या प्रतिक्षेत शेकडो लाभार्थी पंचायत समितीत
शासकीय मदतीचा कोणताही धनादेश आपल्याच हस्ते वाटप व्हावा असा पायंडा पाडणा-या सामाजीक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्यामुळे शेकडो घरकुल लाभाथ्र्याना पंचायत समितीत ताटकळत रहावे लागले.
ना.मोघेंच्या उपस्थितीत नुकताच बेलोरा येथे पाणी टंचाई आढावा बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाबाबत पंचायत समिती सभापती व सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होत असल्यामुळे हा कार्यक्रम वादाच्या भोव-यात सापडला आहे.
या बैठकीसाठी केवळ पाणी टंचाई संबंधीत कर्मचारीच नव्हे तर पंचायत समिती कार्यालयातील जवळपास सर्वच कर्मचारी गेले होते. त्यामुळे घरकुलाचे धनादेश घेण्यासाठी आलेल्या शेकडो लाभार्थ्यांना दिवसभर पंचायत समितीच्या आवारात ताटकळत रहावे लागले.यामुळे संतप्त झालेल्या काही पंचायत समिती सदस्यांनी गटविकास अधिका-यांच्या कक्षाला कुलूप लावण्याचाही प्रयत्न केला.
पं.स.सभापती व सदस्यांना डावलुन गटविकास अधिकारी मंत्री महोदय व एका जि.प.सदस्याच्या ईशा-यावर काम करतात असा आरोप पं.स.सदस्य सहदेव राठोड यांच्यासह इतर सदस्यांनीही केला आहे. शासनाकडुन विवीध योजनेंतर्गत आलेला निधी आपणच आणला असा संभ्रम निर्माण करण्यासाठीच अशा वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असा आरोप राठोड यांनी पत्रपरिषदेत केला. घरकुल योजनेत प्रचंड अनियमितता आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या मात्र कार्यवाही मात्र झाली नाही. या योजनेसाठी प्राधान्यक्रम डावलुन गावांची निवड करण्यात आली. बंजारा व आदीवासी समाज बहुल गावांना या योजनेतुन डावलण्यात आले. त्यामुळे स्वत:ला बंजारा समाजाचे हितचिंतक म्हणवुन घेणा-यांना ही बाब लक्षात येऊ नये याबाबत राठोड यांनी आश्चर्य व्यक्त केले.
भारत निर्माणच्या योजनेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. मात्र एकाही प्रकरणात कुणावरही ठोस कार्यवाही झालेली नाही. पाणी टंचाई कृती आराखड्यात मोठा भ्रष्टाचार असुन आढाव्याचे हे नाट्य केवळ कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाच पोसण्यासाठी असल्याचा आरोप सहदेव राठोड यांनी यावेळी केला. काही महिन्यांपुर्वी ना. मोघेंच्या हस्ते वाटप करण्यात आलेल्या धनादेशांवर संबंधीतांच्या स्वाक्ष-याच नसल्यामुळे कार्यक्रम आटोपताच धनादेश लाभार्थ्यांकडुन परत घेण्यात आले होते. त्यावेळीही ना.मोघेंच्या वाटप हट्ट चांगलाच चर्चेत आला होता हे विषेश.
साभार:- देशोन्नती 

Friday, 11 November 2011

बाहेरुन आणलेल्या गर्दीत हरविले न.प.चे धुरेकरी




तालुका कॉंग्रेसने नगर परिषद निवडणुकांच्या पाश्र्वभुमीवर घाटंजीत आयोजीत केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न करून बरीच गर्दी जमविली. कार्यक्रमाच्या मंचकावर नेते व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र या सर्व धावपळीत नगर परिषद निवडणुकीत ज्यांच्या खांद्यावर कॉंग्रेसची धुरा आहे ते जगदिश पंजाबी मान्यवरांमध्ये कुठेच दिसले नाहीत. विषेश म्हणजे त्यांचा उल्लेखही कार्यक्रमादरम्यान झाला नाही. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. जगदिश पंजाबी हे बराच वेळ प्रेक्षकांमध्ये बसले होते. मात्र काही वेळानंतर ते मंडपात दिसले नाही. अनेक कार्यकर्ते व्यासपीठावर विराजमान होते. निलेश पारवेकर यांच्या गटाचे प्रमुख कार्यकर्ते मात्र व्यासपीठाच्या बाजुला होते. आ.पारवेकरांनी संचालन करणा-याला त्यांना व्यासपीठावर बोलाविण्याची सुचना केली. मात्र बराच वेळ त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर नामोल्लेख न करता त्यांना आमंत्रीत करण्यात आले. एकंदरीतच आयोजकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांसमोर आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सामाजीक न्याय मंत्र्यांच्या  निकटस्थ असलेल्या जि.प.सदस्याने खासगी वाहनांद्वारे खेड्यापाड्यातुन विवीध कारणाने लोकांना एकत्रीत केले. कार्यक्रम झाल्यावर अनेक जण आपले काम होईल या आशेने ‘भाऊंना’ शोधत होते.
या दरम्यान निष्ठावंतांच्या मेळाव्यात काही नागरीकांनी एका खिसेकापुला पकडले. त्याला बेदम मारहाण करीत व्यासपीठाजवळ नेण्यात आले. सदर चोरट्याला पोलीसांच्या ताब्यात देण्याची विनंती जमावाने संयोजकांना केली. मात्र संयोजक आपल्याच कामात असल्याचे लक्षात आल्यावर जमावाने त्या चोरट्याची धुलाई केली. काहींनी तर त्याला व्यासपीठाजवळच्या खांबाला दोरीने बांधण्याचाही प्रयत्न केला. हा गोंधळ थांबविण्यासाठी कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते पुढे धजावत नव्हते. अखेर जमावाने त्या चोरट्याला मारहाण करीतच पोलीसांच्या स्वाधीन केले. कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने पोलीस ताफा होता. मात्र चोरट्याची धुलाई होत असताना एकही पोलीस कर्मचारी कार्यक्रमस्थळी नव्हता. पोलीस स्टेशनला पोलीसांनी सदर चोरट्याची झडती घेतली असता त्याचेजवळ काहीही आढळले नाही. मो.अन्वर मो.शमी असे या चोरट्याचे नाव असुन तो दिग्रस येथिल रहिवासी आहे.
साभार:- देशोन्नती 

Friday, 22 July 2011

आश्रमशाळा मान्यतेसाठी सामाजीक न्याय मंत्री शिवाजीराव मोघेंनी घेतले होते ४२ लाख



कुर्लीच्या सरपंचांनी केली फसवणुकीची तक्रार


















आदिवासी माध्यमीक आश्रमशाळा व डि. एड. कॉलेजला मान्यता मिळवुन देण्यासाठी सामाजीक न्याय मंत्री ना. शिवाजीराव मोघे, विजय मोघे, तत्कालीन स्विय सहाय्यक देवानंद पवार यांनी ४२ लाख रूपये घेऊन पैसे हडप केल्याची तक्रार घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथिल सरपंच अयनुद्दीन सोळंकी यांनी केली आहे. पारवा पोलीस स्टेशन व वडगाव रोड पोलीस स्टेशन यवतमाळ येथे ही तक्रार दाखल करण्यात आली असुन पोलीस तपास सुरू आहे.
२००१ साली ना. मोघे परिवहन, रोजगार व स्वयंरोजगार खात्याचे मंत्री असताना त्यांच्या तत्कालीन स्विय सहाय्यकाने सोळंकी यांचेशी संपर्वâ करून आश्रमशाळा व डि. एड. कॉलेजची मान्यता मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. आश्रमशाळेसाठी १२ लाख व डि.एड. कॉलेजसाठी ३० लाख असे एकुण ४२ लाख रूपयांची मागणी करण्यात आल्याची सोळंकी यांची तक्रार आहे. मात्र त्या नंतरच्या कालावधीत झालेल्या निवडणुकीमध्ये ना. मोघे पराभुत झाले.
त्यानंतर मान्यता मिळवुन देण्याच्या कामासाठी सातत्याने टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे सोळंकी यानी काम होत नसेल तर पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र अजुनपर्यंतही ४२ लाख रूपये परत करण्यात आले नसल्याचे सोळंकी यांचे म्हणने आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पैसे घेतल्याबाबत

ना. मोघेंच्या शासकीय ‘लेटरपड' वर पत्रही देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकषी करण्यात यावी अशी मागणी सोळंकी यांनी केली आहे. मात्र या दरम्यान मंत्र्यानी आपले वजन वापरून पोलीस कार्यवाही होऊ दिली नाही. त्यामुळे सोलंकी यानी यवतमाळ न्यायालयात यविरोधात दाद मागीतली. त्यानुसार न्यायालयाने वडगाव रोड पोलीसांना कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रीया संहितेप्रमाणे आरोपींवर खटला दाखल करून ६० दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.