कर्णकर्कश आवाज, दारुची झिंग चढल्याने चित्र विचित्र हातवारे करीत नाचणारे लोक हे आजकालच्या विसर्जन मिरवणुकीतील चित्र असते. आपल्या वागण्याचा ईतरांना काय त्रास होतोय याचे भान त्यांना नसते. गेल्या काही वर्षांपासुन विवीध उत्सव समित्यांनी धार्मिक उत्सवात अश्लिल गाणी वाजविल्या जाऊ नयेत अशी बंधने लादल्याने हा किळसवाणा प्रकार काही प्रमाणात नियंत्रणात आला आहे. मात्र घाटंजी पोलीसांनी विसर्जन मिरवणुकीत घाणेरड्या गाण्यांना स्थान देऊन पुन्हा तोच अध्याय नव्याने सुरू केला आहे. यावर्षी पोलीस स्टेशनच्या आवारात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सर्व नियम पाळुन आदर्श मिरवणुक कशी काढता येऊ शकते याचे उदाहरण घाटंजी पोलीसांना जनतेसमोर ठेवता आले असते. मात्र याच्या अगदी उलट पायंडा पोलीसांनी पाडल्याने आगामी काळात परिसरातील वातावरण दुषीत होण्याची शक्यता बळावली आहे. बंदी असतानांही कर्णकर्कश आवाजात डि.जे.वाजविल्या जात होता. त्यावर ‘पोरी झगा गं...झगा गं...वा-यावरी उडं, चोली के पिछे क्या है?, मुंगळा मुंगळा मै गुड की डली...मंगता है तो आजा रसिया.....’ अशा एकापेक्षा एक थिल्लर व अश्लिल गाण्यांवर ठाणेदार बाबुराव खंदारे यांच्यासह पोलीस ठाण्यातील जवळपास सर्वच पोलीस कर्मचारी विचित्र हातवारे करीत नाचत होते. आपली जबाबदारी, सामाजीक भान व कर्तव्य गुलालाप्रमाणे उधळीत पोलीसांचा हा ‘धिंगाणा’ सुरू होता. थोडी ‘जास्त’ झाल्याने अनेकांचा तोलही ढळत होता.
पोलीसांच्या भोवती अवैध व्यावसायीकांचे कडे होते. ते टाळ्या वाजवुन पोलीसांना ‘चालु द्या साहेब’ असे प्रोत्साहन देत होते. ठाणेदार बाबुराव खंदारे हातात पाचशेच्या नोटांचे बंडल घेऊन होते. कर्मचा-यांच्या अंगावर ओवाळुन ते एक एक नोट बँड वाल्यांच्या तोंडात कोंबत ते आणखीच जोशात आले होते. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या शि.प्र.मं. कन्या शाळेजवळ तर तब्बल एक तास मिरवणुक थांबली. मिरवणुकीमध्ये सहभागी काही टवाळखोरांनी ‘पोरी झगा गं...झगा गं...वा-यावरी उडं’ हेच गाणं वारंवार वाजवायला लावल्याने येथिल शालेय विद्यार्थीनी, रस्त्यावरून ये जा करणा-या महिलांची प्रचंड कुचंबना झाली. तब्बल तिन किलोमिटर परिसरात डि.जे.चा कानठाळ्या बसविणारा आवाज घुमत होता. प्रत्यक्ष पोलीसच असा धिंगाणा घालीत असल्याने सर्वसामान्य नागरीकांनी तर कपाळी हातच मारून घेतला.
पोलीस हा देखिल माणुसच आहे. त्यामुळे त्यांच्या मिरवणुकीत नाचण्यात काहीच गैर नाही. मात्र मिरवणुकीत त्यांच्या खांद्याला खांदा लावुन नाचणारे अवैध व्यावसायीक, टवाळखोर तरूण याना पोलीसांचे अघोषीत संरक्षणच मिळाले. मिरवणुकीत आवाजाच्या तिव्रतेचे सारे नियम गुंडाळुन वाजविण्यात आलेली अश्लिल गाणी व त्यावर आपल्या पदाचे भान विसरून नाचणारे ठाणेदार बाबुराव खंदारे यानी घाटंजीच्या दुर्गोत्सवाला गालबोट लावले अशीच चर्चा सध्या घाटंजी शहरात सुरू आहे. पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यानी यावर्षी शांततेत व मद्यविरहीत मिरवणुक काढणा-या मंडळांना पुरस्कृत करण्यात येईल असे सांगीतले होते. मात्र घाटंजी पोलीसांनीच दुर्गोत्सवाचे पावित्र्य नष्ट करणारे काम केल्याने पोलीस अधिक्षक या घटनेला गांभिर्याने घेणार का? असा प्रश्न विचारल्या जात आहे.
साभार:- देशोन्नती
Sunder apratim
ReplyDelete