गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासकामांचा निधी आपल्या विकासासाठी वापरून नगर परिषद पदाधिका-यांनी घाटंजीकरांचा अक्षम्य छळ केला. आता निवडणुक महिनाभरावर असतांना विवीध विकास कामांना सुरूवात करून आम्ही किती कर्तव्य तत्पर आहोत याचे ‘दयनिय’ प्रदर्शन नुकतेच करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर साधा मुरूम टाकण्यासाठी नागरीकांना न.प.कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले. त्यानंतरही तिथे मुरूमाऐवजी माती टाकुन निर्लज्जपणाचा कळस वर्तमान पदाधिका-यांनी गाठला. हा प्रकार कुठे जाणीवपुर्वक तर कुठे पदाधिका-यांच्या मनमानीपणामुळे करण्यात आला.
घाटंजी न.प.हद्दीतील विवीध कामांचे भुमिपुजन शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेष ठाकुर यांनी भुमिपुजनाच्या फलकावर स्वत:ची सचित्र प्रसिद्धीही करून घेतली. घाटंजी शहरात जणु काही विकासाची गंगाच अवतरली आहे असा बनाव निर्माण करून घाटंजीकरांची थट्टा उडविल्या जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन नागरीकांना ज्या रस्ते नाल्यांची गरज होती ती कामे आतापर्यंत अडवुन निवडणुक येताच अत्यंत तत्परतेने त्या कामांना सुरूवात करण्यात आली. यापुर्वी न.प.च्या सत्तेत असलेल्यांनीही त्यावेळी निवडणुकीपुर्वी विकासाचे असेच ‘नाटक’ उभे केले होते. तेव्हा जनतेने त्याना त्यांची जागा दाखविली होती हे विषेश. बसस्थानकाकडे जाणा-या रस्त्यांचे काम आता सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत या रत्यावरून जाणे म्हणजे एकप्रकारची शिक्षाच होती. त्यात पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यांमध्ये मातीचे ढिगारे टाकुन नगर परिषदेने घाटंजीकरांचा अंतच पाहिला. आता निवडणुकीपुर्वी या रस्त्याचे काम सुरू करून जखमेवर मिठ चोळण्याचेच काम न.प.ने केले असल्याची जनमानसात चर्चा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नगर परिषदेमध्ये विकासकामांसाठी आलेला कोट्यवधींचा निधी केवळ नगर सेवकांच्याच विकासासाठी वापरला गेला अशी संतप्त भावना जनतेमध्ये आहे. त्यामुळे मतांची ‘भिक’ मागायला जाताना प्रसंगी या रागाचा सामनाही वर्तमान पदाधिका-यांना करावा लागणार आहे. केवळ आरक्षणामुळे शिवसेनेकडे नगराध्यक्षपद आले. त्यामूळे वच्छला धुर्वे गेली दोन अडीच वर्ष नाममात्र नगराध्यक्षपदावर विराजमान आहेत. पदाचे संपुर्ण अधिकार मात्र नगरसेवक शैलेष ठाकुर यांनीच वापरले. गेली काही वर्षे सुरू असलेल्या रामभरोसे कारभारामुळे घाटंजी नगर परिषदेत पदाधिकारी व प्रशासन अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.
नुकतीच भुमिपुजन करण्यात आलेली सर्व कामे शैलेष ठाकुर यांच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला देऊन निवडणुकीचा खर्च काढण्याचाच हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. शिवसेनेच्या या भुमिपुजन नाट्याबाबत जनतेमध्ये समाधानाऐवजी संतापच दिसुन येत आहे.
No comments:
Post a Comment