प्रत्येक धर्माचे आचरण वेगळे असले तरी शिकवण मात्र एकच आहे. तरी देखिल काही विघ्नसंतोषी लोक धार्मिक भावना कलुषीत करून समाजात तेढ निर्माण करतात. जातीय विद्वेषातुन लागलेल्या आगीत आजवर आपला समाज अनेकदा होरपळल्या गेला आहे. याचा अर्थ आपल्यात सद्भावनाच उरली नाही असे नाही. समाजात आजही अशी उदाहरणे आहेत ज्यांनी एकात्मतेची ज्योत तेवत ठेवली आहे.
घाटंजी तालुक्यातील शिरोलीचे ‘एकात्मता' दुर्गोत्सव मंडळ हे त्यापैकीच एक. मंडळाच्या नावाप्रमाणेच या गावातील युवकांनी धार्मिक एकात्मतेचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
तब्बल चौदा वर्षांपासुन मुस्लिम युवक व त्यांचे कुटूंबीय दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून नऊ दिवस उपासना करतात. या दरम्यान देवीची पुजा तसेच आरती मध्येही अनेक मुस्लिम कुटूंबीय सहभागी होतात.
मंडळातील काही युवक तर नऊ दिवस कट्टरतेने उपवासही करतात. या दरम्यान मुस्लिम कुटूंबात मांसाहारी जेवण बनविल्या जात नाही. या मंडळातील ८० टक्के सदस्य मुस्लिम आहेत. यावर्षी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सै.आरीफ सै.कासाम यांचेवर आहे. तर उपाध्यक्ष सै.शेरीफ सै.कासाम व सचिव शेख इसाक शेख मुसा हे आहेत. प्रमुख सदस्यांमध्ये अल्ताफ अब्दुल चव्हाण, ईरफान रफीक चव्हाण, अखिल गफ्फार चव्हाण, शे.रौफ शे.रसुल, दिलीप नानाजी काकडे, निलेश बंडुजी मेसेकार यांचा समावेश आहे.
या मंडळामुळे कुठलीही क्रांती किंवा समाज परिवर्तन झाले नसले तरी जातीय सलोख्याचे अनोखे व अनुकरणीय उदाहरण जगासमोर ठेवल्या गेले आहे. सद्भावाची ही परंपरा गेल्या चौदा वर्षांपासुन अखंडीतपणे जोपासण्यासाठी शिरोलीतील रहिवाश्यांचे कौतुकच करावे लागेल.
No comments:
Post a Comment