Pages

Monday 31 October 2011

चोरांब्याच्या कुप्रसिद्ध कोंबडबाजारावर ‘बाबुराव पॅटर्न’ने कारवाई

बघ्यांना अटक; सुत्रधार मोकळे
शर्यतीच्या कोंबड्यांची रात्रीच विल्हेवाट
अवैध व्यवसायांना संरक्षण देण्याच्या घाटंजी ठाणेदाराच्या वादग्रस्त कार्यशैलीमुळे तालुक्यात ‘बाबुराव पॅटर्न’ चांगलाच चर्चेत आला आहे. एरवी ‘पॅटर्न’ हा चांगल्या कार्यासाठी प्रसिद्ध असतो. मात्र घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ प्रत्येक प्रकरणामध्येच देवाणघेवाणीचा विषय होत असल्याने व गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या अजब कार्यपद्धतीमुळे याला बाबुराव पॅटर्न असे नावच देण्यात आले आहे. याच पॅटर्न नुसार पोलीसांनी एक कारवाई केली. लाखो रूपयांची ऊलाढाल असलेल्या चोरांबा येथिल कोंबडबाजारावर घाटंजी पोलीसांनी अचानक छापा टाकला. 
या कारवाईत अभिमान रामचंद्र मोहिजे याचेसह विस जणांना अटक करण्यात आली. तर शर्यतीचे कोंबडे, मोबाईल, रोकड व १० दुचाकी असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. घाटंजीपासुन अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या चोरांबा शिवारात आठवड्यातुन किमान तिन दिवस भव्य कोंबडबाजार भरतो. कुणाचीही भिती नसल्याने आंध्र प्रदेशासह विदर्भातील अनेक जिल्ह्यातुन येथे हजारो जुगारी सहभागी होतात. मात्र या बाजारावर अद्यापपावेतो पोलीस कारवाई झाली नाही. एवढेच नव्हे तर हा बाजार भरविणा-या मुख्य सुत्रधाराने एकदा पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन पोलीस कर्मचा-यास बेदम मारहाण केली होती. त्यावेळी ठाणेदार बाबुराव खंदारे व सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले यांनी त्या आरोपीचीच बाजु घेतल्याची बाब प्रसिद्धी माध्यमांमध्ये चांगलीच चर्चेत आली होती. पोलीसच पाठीशी असल्याने चोरंब्याचा हा कोंबडबाजार ऐटीत सुरू होता. मात्र नियमितपणे सुरू असलेल्या हप्त्याला या महिन्यात काहीसा विलंब झाल्यामुळे हा कारवाईचा देखावा करण्यात आला अशी चर्चा अवैध व्यावसायीकांमध्ये सुरू आहे. 
ठाणेदार बाबुराव खंदारे व सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनुले यांचे नेतृत्वात हा तथाकथित छापा टाकण्यात आला. त्यावेळी कोंबडबाजारात तब्बल १२ शर्यतीचे कोंबडे होते. मात्र पोलीसांनी केवळ पाच कोंबडे जप्त केल्याची नोंद आहे. शिवाय या कोंबड्यांची रात्रभरातच विल्हेवाट लावण्यात आली. पोलीसांनी अटक केलेल्या बहुतांश आरोपींमध्ये शर्यत पाहणारे व लावणारे यांचाच समावेश आहे. मात्र हा कोंबडबाजार भरविणा-या सुत्रधारांना मोकाट सोडण्यात आल्याने ही संपुर्ण कारवाईच संशयाच्या भोव-यात सापडली आहे.
काल रात्रीच्या सुमारास घाटंजी पोलीस स्टेशनच्या आवारात कोंबडबाजार भरविणा-यांचा जथ्थाच गोळा झाला होता. मात्र पोलीसांनी त्यांचेवर कोणतीही कारवाई केली नाही. जप्त करण्यात आलेल्या काही दुचाकी आर्थिक देवाणघेवाण करून सोडण्यात आल्या. या कथित कारवाई नंतर हा कोंबडबाजार कायमचा बंद होणार की, नव्या जोमाने डोके वर काढणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
साभार:- देशोन्नती

No comments:

Post a Comment