Pages

Thursday 26 July 2012

घाटंजी तालुक्यात पावसाचे भिषण तांडव

२ हजार कुटूंबांना पुराचा फटका
अडीच हजार हेक्टरवरील पिक वाहुन गेले
कोट्यवधींचे नुकसान









गेल्या दोन दिवसांपासुन घाटंजी तालुक्यात कोसळत असलेल्या संततधार पावसाने तब्बल अडीच हजार हेक्टर शेतातील पिके खरडून नेली. तर सुमारे २ हजार कुटूंबे पावसाच्या तडाख्याने बेघर झाली आहेत.या पावसामुळे तालुक्यात कोट्यवधी रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या पाण्यात ९ जनावरे वाहुन गेली तर १ हजार १०३ घरे अंशत: व ९०५ घरे पुर्णपणे उध्वस्त झाले. दि.२२ जुलैच्या रात्री पासुन सुरू झालेल्या संततधार पावसाने संपुर्ण घाटंजी तालुक्यात धिंगाणा घातला. अनेक गावांना पुराचा फटका बसला. काही गावे तर पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथिल नागरिकांना जंगलात रात्र काढावी लागली. घरातील साहित्य, कपडे, धान्य व पावसाची वाट पाहात राखुन ठेवलेले बि.बियाणे, रासायनिक खतेही पावसाने वाहुन नेली. सर्वाधीक नुकसान झालेल्या गावांमध्ये कवठा खुर्द येथे २०० घरे पुर्णपणे उध्वस्त झाले तर ८० घरे अंशत: बाधीत झाली. कोळी बु.येथे १५५ घरे पुर्णत: ४० घरे अंशत:, कोपरी येथे ८० घरे पुर्णत: २० घरे अंशत:, डांगरगाव येथे ४० घरे पुर्णत: २० अंशत:, माणुसधरी येथे ६० घरे पुर्णत: १५ घरे अंशत:, चांदापुर येथे ३० घरे पुर्णत: व १५ अंशत:, चिंचोली येथे ३५ पुर्णत: १५ अंशत:, निंबर्डा ३६ पुर्णत: १८ अंशत:, तर घाटंजी शहरात १२५ घरांचे पुर्णत: व २०० घरांचे अंशत:, घाटी भागात २५ घरांचे पुर्णत: तर ५० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेतपिकाला तर पावसाचा चांगलाच फटका बसला असुन ५० गावातील तब्बल २ हजार ४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा शासकीय यंत्रणेचा प्राथमिक अंदाज असुन हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घाटंजी शहरातील काही नेहरू नगर, घाटी, पांढुर्णा रोड, आनंद नगर मधील घरांमध्ये पाणी घुसल्याने तेथिल  राहिवाशाना न.प.शाळा, गजानन महाराज मंगल कार्यालय, सोनु मंगलम, पंजाबी लॉन, न.प.सांस्कृतिक भवन या ठिकाणी हलविण्यात आले. येथे या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था सर्व  नगरसेवक, व्यापारी व सामाजीक कार्यकर्त्यांनी केली. कोळी बु. हे गाव अडाण नदीच्या काठी असल्याने या गावाला पुराचा सर्वाधीक फटका बसला. संततधार पावसामुळे अडाण नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले व पाहता पाहता संपुर्ण गाव पाण्याखाली गेले. त्यामुळे येथिल नागरीकांना गावालगत असलेल्या आश्रमशाळेत आश्रय घ्यावा लागला. शिरोली येथिल नागरीकानी पुरग्रस्तांसाठी आवश्यक साहित्य पुरविले. तर विलास निलावार यांनी या नागरीकांसाठी खिचडीची व्यवस्था केली. तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या वेळकाढु धोरणामुळे शासकीय मदत मात्र वेळेवर पोहचली नसल्याची माहिती आहे.. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितीन राऊत, यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांनी पुरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. तर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यानी या भागांचा दौरा केला. उपविभागीय अधिकारी एस.ए.खांदे, तहसिलदार प्रकाश राऊत हे देखिल गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करीत आहेत. दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसानाचा शासकीय अंदाज व प्रत्यक्षात झालेले नुकसान यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप न होऊ देता वास्तविक नुकसानाचे सर्वेक्षण केल्या जावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment