Pages

Tuesday 3 July 2012

पारवा पोलीसांना अवैध दारू विक्रेत्यांचा पुळका

दारू विक्रीची तक्रार करणा-यांना ठाण्यात दमदाटी

तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला अवैध दारू विक्रेत्यांशी एवढी सहानुभूती निर्माण झाली आहे की, गावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीची तक्रार करणा-यांना चक्क पोलीस ठाण्यात बोलावुन दमदाटी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. या प्रकाराने चिडलेल्या ग्रामस्थांनी शेकडो महिलांसह सावळी सदोबा पोलीस चौकीवर धडक दिली. याबाबत विस्तृत वृत्त असे की, पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरी कापेश्वर येथिल ग्रामस्थांनी गावातील दोन अवैध दारू विक्रेत्यांविषयी ग्रामसभेत तक्रार केली. पोलीसांनाही याबाबत कळविण्यात आले. मात्र अवैध व्यावसायीकांना पाठिशी घालणा-या पारवा पोलीसांनी तक्रारकर्त्यांनाच गोत्यात आणण्याची खेळी केली. ज्या अवैध दारू विक्रेत्यांची ग्रामस्थांनी तक्रार केली होती त्यांच्याकडून पोलीसांनी त्या ग्रामस्थांविरोधात खोटी तक्रार घेतली. तसेच चार ते पाच ग्रामस्थांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावुन, ‘तुमच्या विरोधात तक्रार आली आहे, तुम्ही दारू विक्रेत्यांना विरोध केल्यास ते सुद्धा तुमच्या विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे यापुढे तक्रार करू नका’ असा धमकीवजा सल्ला पारवा पोलीसांनी दिल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. योग्य बाबीची तक्रार केल्यावर पोलीस दारू विक्रेत्यांची बाजु घेऊन ग्रामस्थांना धमकावत असल्याचे लक्षात येताच उमरी कापेश्वर येथिल शेकडो गावक-यांनी थेट सावळी सदोबा पोलीस चौकी गाठुन या प्रकाराचा निषेध नोंदविला. यावेळी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते अशी माहिती आहे. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंजाब वंजारे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांना संरक्षण देण्याचे धोरण अवलंबिल्याने अवैध व्यावसायीकांचे धारिष्ट्य वाढले आहे. उल्लेखनिय म्हणजे काही दिवसांपुर्वीच विशेष शाखेने पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला होता. परंतु ग्रामिण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर अवैध दारू, मटका, जुगार, अवैध वाहतुक व  तत्सम व्यवसाय पोलीसांच्या डोळ्यादेखत बिनदिक्कतपणे सुरू आहे. वरिष्ठांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment