कोणत्याही गोष्टीचे पुर्ण ज्ञान असल्याशिवाय तिचा वापर करतांना झालेली चुक कशी घोडचुक ठरू शकते याचा प्रत्यय दारव्ह्यातील घटनेतून दिसुन येतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे नक्कीच श्रेयस्कर आहे. मात्र ते करतांना त्यातील प्रत्येक बाबीचे किमान प्राथमिक ज्ञान व विवेक असणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजीक संपर्काचे एक प्रभावी माध्यम ठरलेले ‘फेसबुक’ आता मोठ्या शहरापासुन थेट ग्रामिण भागापर्यंतही पोहचले आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व आपले आचार विचार इतरांशी ‘शेअर’ करण्यासाठी फेसबुक व तत्सम सामाजीक संकेतस्थळांची उपयुक्तता निश्चितच जास्त आहे. त्यामुळेच प्रस्थापीत माध्यमांनाही त्याची गरज भासत आहे. मात्र ज्या गोष्टीचा सकारात्मक दृष्टीने चांगला वापर होऊ शकतो तितकाच त्याचा वाईट गोष्टींसाठीही वापर होतो असा अनुभव आहे. सामाजीक संकेतस्थळांवर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे तणाव निर्माण होण्याची दारव्ह्याची घटना पहिलीच नव्हे. किंबहुना अशा वादग्रस्ततेमुळेच ही सामाजीक संकेतस्थळे सर्वांच्या परिचयाची झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुरूवातीला ऑर्कुट व आता फेसबुक अशा वादाचे कारण ठरत आहे. विकृत मानसिकता व माहितीचा अभाव हेच अशा तणावाचे कारण आहे.
कुठल्यातरी एका विकृत डोक्यातून नको ती गोष्ट बाहेर येते. त्याचे प्रदर्शन तो चक्क सामाजीक संकेतस्थळावरच करतो. अन त्या गोष्टीला एखादी समविचारी प्रवृत्ती अनावधानाने अथवा खोडसाळपणाने ‘लाईक’ करते. त्यामुळे भडकलेल्या व प्रसंगी भडकविण्यात आलेल्या भावनांमुळे तणाव निर्माण होतो. खरं तर फेसबुकवरील फोटो, पोस्ट, लिंक हे लाईक करणे किंवा त्यावर प्रतिक्रीया देणे ही अत्यंत क्षुल्लक बाब आहे. सेकंदाला कोट्यवधी वेळा होणा-या या क्रियेपैकी एका क्रियेसाठी संपुर्ण शहरात तणाव निर्माण व्हावा हे कितपत योग्य आहे याचा विचारही व्हायला हवा. याचा अर्थ असा मुळीच नाही की दारव्ह्यातील त्या दोन विक्षिप्तांनी केलेली कृती समर्थनिय आहे. कोणाच्याही भावनांना तडा जाईल अशी कृती कधीच योग्य ठरू शकत नाही. मात्र सद्यस्थितीत फेसबुक सारख्या माध्यमांचा होत असलेला चुकीचा वापर लक्षात घेता त्याबाबत समाजाने संयमाने वागण्याची गरज आहे. फेसबुकवर आपण स्वत: जरी आक्षेपार्ह मजकुर टाकला नाही तरी इतर कोणी टाकलेल्या मजकुराला लाईक, टॅग, शेअर करणे म्हणजे एकप्रकारे आपण सुद्धा त्याच विचाराचे आहोत हे आपसुकच दर्शविते. त्यामुळेच संकेतस्थळांवर वावरतांना आपण काय करतोय याचे भान असणे गरजेचे आहे. अशा मजकुराला ‘लाईक’ अथवा तत्सम कृती करणारा व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या दोषी ठरेलच असे नाही. परंतू भडकलेल्या भावना कोणाचीच गय करीत नाहीत हे आपल्या समाजाचे वास्तव आहे.
त्याचप्रमाणे सगळेजण वापरतात म्हणुन आपणही वापरायचे अशा मानसिकतेतून सामाजीक संकेतस्थळांचा वापर करणा-या तरूणाईला सुद्धा आता जागरूक राहण्याची गरज आहे. अनेक तरूणी या संकेतस्थळांवर आपली छायाचित्रे टाकतात. त्यापैकी बहुतांश तरूणी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्विकारतांना समोरचा व्यक्ती आपल्या परिचयाचा आहे अथवा नाही याचाही विचार करीत नाही. याचा परिणाम अनेकदा विचित्रच होतो. काही विक्षिप्तांकडून त्याचा गैरवापर होतो अन त्याचा शेवट मनस्तापात. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा वापर करतांना त्याचे पुरेपूर ज्ञान व संयमी मानसिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा क्षुल्लक गोष्टीतून मोठा भडका होणे अटळ आहे.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती
क्षुल्लक बाबीला दिलेला कट्टर धर्मांधतेचा रंग असेच या घटनेचे वर्णन करता येईल. आसामची हिंदू कॉंग्रेस आमदार रोमा हि लग्नाच्या पतीला घटस्फोट न देता फेसबुक प्रियकर मुस्लीम युव्कासोबत पळून जाऊन संसार थाटते तेव्हा यांचा आवाज का गप्प होता ,एकाही धर्मान्धाने या बाबीला का विरोध केला नाही...मग या असल्या क्षुल्लक बाबीला अवास्तव महत्व देण्यात काय हशील
ReplyDelete