पारवेकर समर्थकांची घाटंजी येथे निषेध सभा
राष्ट्रवादीला ठोकणार रामराम
माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जाहीर केले आहे. पक्ष विरोधी कारवायांमुळे त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे पारवेकर यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, आमदार संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांनाही कळविण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये पांढरकवडा नगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यात एबी फॉर्म नसतानाही पारवेकर यांनी काही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले होते. निवडणुकीच्या प्रचारार्थ लावण्यात आलेल्या फलकांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो न लावता पारवेकर यांनी स्वतःचे फोटो लावले होते. या प्रकाराची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली होती.
अण्णासाहेब पारवेकर यांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून निष्काषीत केल्यामुळे दुखावलेल्या पारवेकर समर्थकांनी येथिल कृषीभवनात आयोजीत सभेत या निर्णयाचा निषेध नोंदविला. व्यक्तीद्वेष व व्यापारी तत्वाच्या नवख्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही कार्यवाही करण्यात आल्याची प्रतिक्रीया यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी
नोंदविली. या सभेच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण पोतराजे होते. रा.कॉ.चे माजी तालुका अध्यक्ष व बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे, माजी सभापती सचिन पारवेकर, सुहास पारवेकर, अंजी (नृ.) चे सरपंच गजानन भोयर, दादाराव खोब्रागडे, पोचारेड्डी जिड्डेवार, पारव्याचे सरपंच अर्जुन आत्राम, रा.यु.कॉ.शहराध्यक्ष अंकुश ठाकरे यांचेसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासुन ज्या नेत्याने तालुक्यात पक्षाचे अस्तित्व निर्माण केले त्यांना क्षुल्लक कारणांवरून थेट पक्षातूनच काढणे अन्यायकारक असुन त्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निषेध करीत असल्याचे मनोगत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या पक्षात आता कंत्राटदार व धनदांडग्यांनाच स्थान आहे का ? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ शेकडो पारवेकर समर्थक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच पक्षातील पदाचा राजीनामा देणार असल्याचे या सभेत सांगण्यात आले. ज्या पक्षात आमच्या नेत्याचा सन्मान होत नसेल, नवखे लोक येऊन त्यांच्याबाबत अपशब्द बोलत असतील तर ते आम्ही मुळीच सहन करणार नाही असे प्रकाश डंभारे म्हणाले.
No comments:
Post a Comment