Pages

Saturday 9 March 2013

अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार?

रस्ता तिथे अतिक्रमण अशी परिस्थिती सध्या सर्वत्र आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर अगदी ग्रामिण परिसर व जंगलात देखिल अतिक्रमणाने आपले पाय पसरले आहेत. बेरोजगारी या गोंडस नावाखाली कोट्यवधींची जमिन अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. घाटंजी तालुकाही त्याला अपवाद नाही. घाटंजी शहरात तर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण आहे. अवघ्या काही महिन्यांपुर्वीच शहरात अतिक्रमण हटाओ मोहिम राबविण्यात आली. बहुतांश अतिक्रमण हटविण्यात आले. यंत्रणेचा यामध्ये प्रचंड खर्चही झाला. मात्र काही महिने जात नाही तोच अतिक्रमणाची स्थिती जैसे थे झाली.
अतिक्रमणाचे समर्थन नक्कीच केल्या जाऊ शकत नाही. मात्र ते हटविल्यावर हजारो बेरोजगारांवर कोसळणारी बेरोजगारीची कु-हाड व त्यावर अवलंबुन असणा-या कुटूंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. यंत्रणेने योग्य नियोजन केले तर बेरोजगारांचा प्रश्न व अतिक्रमणाची समस्याही निकालात निघेल. शहरात नगर परिषद कार्यालय ते राम मंदिर रोड, शि.प्र.मं.कन्या शाळा, बसस्थानक, आठवडी बाजार परिसर यासह विवीध भागात किरकोळ व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. नगर परिषद तसेच खासगी व्यक्तींची कॉम्प्लेक्स आहेत. मात्र त्याची किंमत सर्वसाधारण व्यावसायीकांच्या आवाक्या बाहेरची आहे. मोहिमेदरम्यान त्याच जागेवर व्यावसायीकांसाठी दुकाने काढण्यात येतिल असा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र त्या दृष्टीने अद्याप कोणतीही पावले उचलल्या गेली नाहीत. त्यामुळे प्रचंड खर्च करून मोकळी झालेली जागा पुन्हा अतिक्रमणाने व्यापली. त्याच जागेवर दुकाने दिल्यास अतिक्रमणधारक त्यासाठी भाडे देण्यासही तयार आहेत. नगर परिषदेसाठी हे एक उत्पन्नाचे साधन होऊ शकते. मात्र ही बाब दुर्लक्षील्या गेली हे दुर्दैवच.
शिवाजी चौकाकडे जाणा-या रस्त्यावर बड्या व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. त्यांच्या दुकानांच्या पाय-या अगदी रस्त्यापर्यंत आल्या आहेत. वाहतुकीला त्याचा प्रचंड अडथळा होतो. मात्र प्रत्येक अतिक्रमण हटाओ मोहिमेत या ‘श्रीमंत’ अतिक्रमणाकडे कानाडोळाच करण्यात आला आहे. केवळ कोणी आक्षेप घेऊ नये म्हणुन थातुरमातुर कार्यवाही केल्या जाते. या भागात मुख्यत्वेकरून सराफांची दुकाने आहेत. तसेच काही गोदाम सुद्धा या भागात असल्याने आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर जेव्हा एखादा ट्रक अथवा वाहन साहित्य नेण्यासाठी उभे केल्या जाते तेव्हा वाहतुकीचा खोळंबा होतो. या रस्त्याची भुमी अभिलेख विभागामार्फत मोजणी करून रस्ता अतिक्रमणमुक्त करावा अशी अनेकांची मागणी आहे. पोलीस स्टेशन चौकात अतिक्रमणाच्या जागेत असलेले फ़ेब्रीकेटर्स व मिरचीची गिरणी वाहतुकीस अडचणीची ठरत आहे. मिरचीही पुड रस्त्यावरून जाणा-यांच्या डोळ्यात जात असल्याने या मार्गावर अनेकदा अपघातही होतात. तसेच फ़ेब्रीकेटर्सचे साहित्य रस्त्यावरच पडून राहत असल्याने वाहतुकीस अडथळ्याचे ठरते. भर चौकात असलेल्या या  वेल्डींगच्या दुकानाकडे प्रशासन डोळेझाक का करते असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या नगर परिषदेवर अतिक्रमण काढण्याची व प्रतिबंध करण्याची जबाबदारी आहे त्या नगर परिषदेचे एक प्रवेशद्वारच अतिक्रमणाने व्यापले आहे. दर दोन तिन वर्षांनी राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाओ मोहिम केवळ एक औपचारीकताच होऊन बसली आहे. एकदा अतिक्रमण काढल्यावर ते पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष राहुन बेरोजगारांना त्याच ठिकाणी व्यवसायासाठी योग्य मोबदला घेऊन जागा दिल्यास अतिक्रमणाचा प्रश्न कायमचा सुटू शकेल.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment