Pages

Saturday 9 March 2013

घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटू पोहचले आंतरराष्ट्रीय पातळीवर

बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यात सहभाग

जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या चमकदार कामगिरीने तालुक्याचे नाव उंचावणा-या घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटुंनी आता देशाची सिमा ओलांडली आहे. दि.२० एप्रील ते २ मे या कालावधीत बांग्लादेशात होणा-या आशियायी सामन्यांकरीता या क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. 
तालुक्यातील प्रणित यशवंत घुगरे, राहुल उनकेश्वर राठोड, रत्नदिप दिलीप नगराळे व रविसिंग प्रेमसिंग राठोड हे या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये योटी ग्रुपमार्फ़त भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. फरिदाबाद (हरीयाणा) येथे झालेल्या निवड चाचणीत देशभरातील २०० खेळाडूंमधुन १९ वर्ष वयोगटातील १५ सदस्यीय संघात घाटंजी तालुक्यातील चार क्रिकेटपटूंची निवड होणे ही तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. या खेळाडूंनी जालना, रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. त्यामुळे त्यांची कुरूक्षेत्र (हरीयाणा) व दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीच्या सामन्यांसाठी निवड झाली. येथेही त्यांनी चमकदार कामगिरी केल्याने निवडचाचणीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी योटी ग्रुपच्या संघात त्यांची निवड करण्यात आली आहे. या संघात वेगवान गोलंदाजाची भुमिका बजावणारा प्रणित यशवंत घुगरे हा घाटंजीतील ईस्तारी नगर भागात राहतो. तो शि.प्र.मं.विद्यालयात ईयत्ता १० वीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील जि.प.शाळेत शिक्षक आहेत. श्री.समर्थ विद्यालयातील ईयत्ता १०वीचा विद्यार्थी व संघातील उत्कृष्ट फलंदाज राहुल उनकेश्वर राठोड हा नेहरू नगर भागात राहतो. त्याचे वडील शेती करतात. तडाखेबाज फलंदाजीने राष्ट्रीय सामन्यांमध्ये मॅन ऑद द मॅच पुरस्कार पटकाविणारा रत्नदिप नगराळे हा तालुक्यातील ससाणी गावचा आहे. तो शि.प्र.मं.शाळेत दहाव्या वर्गात शिकत असुन वसतीगृहात राहतो. त्याचे वडील शेतकरी आहेत. तर मुळचा आर्णी तालुक्यातील बोरगावचा रहिवासी व आर्णीतील सावित्रीबाई फ़ुले विद्यालयाचा १२ वीचा विद्यार्थी रविसिंग प्रेमसिंग राठोड हा संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच तो उत्कृष्ट फलंदाजही आहे. तो मुळचा आर्णी तालुक्यातील असला तरी सरावासाठी तो घाटंजी येथे असतो. त्याचे वडीलही शेती करतात. 
दि.२० एप्रील ते २ मे या कालावधीत बांग्लादेशाची राजधानी ढाका यासह विवीध शहरात होणा-या आशियायी सामन्यांमध्ये भारतातून जाणा-या संघामध्ये तालुक्यातील चार खेळाडूंचा समावेश असणार आहे. नुकतेच या दौ-यासाठी निवड झाल्याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना योटी रूरल क्रिकेट असोशिएशन तर्फ़े पाठविण्यात आले आहे. या सर्व क्रिकेटपटूंना शिरोली ता.घाटंजी येथिल राष्ट्रीय पातळीवरील धावपटू व क्रिडा मार्गदर्शक राजन भुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment