Pages

Tuesday 26 March 2013

घाटंजीच्या आठवडी बाजारात असुविधांचा कळस


तालुक्यातील अनेक खेड्यांसाठी घाटंजी ही मुख्य बाजारपेठ आहे. दर मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. मात्र व्यावसायीक व ग्राहक यांच्यासाठी कोणत्याही सुविधा स्थानिक नगर परिषदेने आजवर पुरविल्याचे उदाहरण नाही. अनेक खेड्यापाड्यांमध्येही आता आठवडी बाजारात व्यावसायीकांसाठी ओटे बांधलेले आहेत. मात्र घाटंजी न.प.ने आजवर ओटे बांधण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. घाटंजीच्या बाजारात भाजीपाला, धान्य, मसाले, फळे, कापड, फरसाण यासह अनेक किरकोळ व्यावसायीक आपली दुकाने थाटतात. केवळ मुरूम व दगड टाकुन त्यांना जागा आखणी करून देण्यात आलेल्या आहेत. मात्र दुकानांच्या अवतीभवती दगड धोंडे, कचरा पडून राहत असल्याने ग्राहकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो.
आझाद मैदान परिसरात भरत असलेल्या या आठवडी बाजारात सर्वत्र प्रचंड घाण असल्याने वातावरणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना नाकावर रूमाल ठेवुनच कसाबसा बाजार करावा लागतो. बाहेरगावाहुन येणारे व्यावसायीक व ग्राहकांच्या सोयीसाठी पाणी, सार्वजनिक शौचालय, मुत्रीघर यापैकी कोणतीही सोय आठवडी बाजार परिसरात नाही.
व्यावसायीकांना कोणतीही सुविधा न देणारी नगर परिषद त्यांचेकडून दर आठवड्याला कर मात्र न चुकता वसुल करते. व्यवसायानुसार १० रू, २० रू, ५० रू असा कर दैनिक वसुलीचे वंâत्राटदार वसुल करतात. मात्र त्या तुलनेत दुकानापर्यंत ग्राहक विनाअडथळा येऊ शकेल एवढी व्यवस्थाही न.प.ने आजवर केली नाही. पावसाळ्यात तर बाजारात एवढी घाण पसरलेली असते की, पाय कुठे ठेवावा असा प्रश्न पडतो. पाऊस आला की व्यावसायीकांची तारांबळ उडते. अनेकदा तर मोठे आर्थिक नुकसानही होते.
आजवरच्या कोणत्याही न.प.सत्ताधा-यांनी आठवडी बाजाराकडे लक्ष दिले नाही. व्यवसाय करण्यासाठी सिमेंटचे ओटे, शेड, स्वच्छ परिसर, बाजारात फिरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा, रस्ते, पाणी,स्वच्छतागृह या सुविधा टप्प्या टप्प्याने निर्माण करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र सध्यातरी तेवढी ईच्छाशक्ती न.प.चे सत्ताधारी, विरोधक व प्रशासन यापैकी कोणामध्येही असल्याचे दिसत नाही हेच घाटंजी शहराचे दुर्दैव आहे.
साभार :- देशोन्नती 


No comments:

Post a Comment