Pages

Sunday 17 March 2013

पोलीसच बनले अवैध व्यवसायाचे ‘पालनहार’


गेल्या काही वर्षांपासुन घाटंजी तालुका अवैध व्यावसायीकांसाठी अत्यंत सुरक्षीत परिसर झाला आहे. कारण ज्यांच्या खांद्यावर या व्यवसायांना पायबंद घालण्याची जबाबदारी आहे ती पोलीस यंत्रणाच जाणिवपुर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. जणु काही पोलीसच या अवैध व्यवसायांचे पालनहार आहेत की काय असे वाटण्या एवढी गंभिर परिस्थिती आहे. पोलीस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर चालणारे मटका अड्डे या गोष्टीची साक्ष देतात. तर क्लबच्या गोंडस नावाखाली चालणा-या जुगार अड्ड्यांवर महिन्याकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. पारवा पोलीस स्टेशन परिसरात अवैध दारू व मटका व्यवसायाची भरभराट आहे. गेल्या वर्षभरात घाटंजी व पारवा पोलीस स्टेशन परिसरात विषेश शाखेच्या पथकाने अनेकदा छापे मारले. मात्र स्थानिक पोलीसांनी आजवर कोणताही मोठा छापा मारल्याचे ऐकीवात नाही. केवळ विशेष शाखेच्या छाप्यानंतर औपचारीकता म्हणुन तुरळक कार्यवाही दाखविण्यात येते. घाटंजी शहरात उघडपणे मटका अड्डे चालतात. कन्या शाळा, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, घाटी यासह विवीध परिसरात अगदी सर्वसामान्यांना दिसेल अशा ठिकाणी हे अड्डे चालतात. मात्र पोलीसांना त्यावर कार्यवाही करण्याची गरज वाटत नाही. तालुक्यातील पारवा, चिखलवर्धा, घोटी, शिवणी, जरूर यासह ग्रामिण भागात कुठे अवैध दारू तर कुठे मटक्याचे प्रस्थ निर्माण झाले आहे. तालुक्यात दोन पोलीस स्टेशन, पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध असुनही अवैध व्यवसायांवर पोलीसांचे नियंत्रण नसेल तर ते जाणिवपुर्वकच त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सिद्ध होते. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असतील तिथल्या ठाणेदारांवर कार्यवाही करण्याचे सुतोवाच पोलीस अधिक्षकांनी केले होते. मात्र घाटंजी तालुक्यातील परिस्थितीकडे पाहता तालुक्याला यामध्ये ‘सुट’ तर देण्यात आली नाही ना असा संभ्रम निर्माण होईल एवढी गंभिर परिस्थिती आहे. ठाणेदार जगमोहन जोहरे यांच्या काळात अवैध व्यावसायीकांवर निर्माण झालेली जरब पुन्हा कधी होईल याची नागरीक वाट पाहात आहेत. 
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment