Pages

Sunday, 3 March 2013

राजकीय कुरघोडीत शेतक-यांच्या सुविधा दावणीला


गेल्या अनेक वर्षांपासुन घाटंजी तालुक्याच्या सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाची भुमिका निभावणारी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतक-यांसाठी मात्र असुविधेचीच ठरली आहे. कापुस व धान्याच्या मार्केट  यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने आजवर बाजार समितीची सत्ता काबिज करणा-यांनी काय केले असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. कधी नव्हे तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प शेतक-यांसाठी सुरू झाला होता. शिदोरी मंडपापासुन ते गोदामापर्यंत सर्व सुविधांनी युक्त अशा २ कोटी ८ लाखांच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. 
आजवर तुरळक अपवाद वगळता कोणतेच विकासकाम न झालेल्या बाजार समितीमध्ये शेतक-यांसाठी शिदोरी मंडप, ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा, गोदाम, स्वच्छतागृह, मुक्कामाची सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी यासह विवीध सुविधा एकाच वेळी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू झाले. मात्र तांत्रिक मुद्द्यांवरून या प्रकल्पाच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्पाचे काम खोळंबले. यंदाच्या कापुस हंगामात शेतक-यांना या सुविधांचा लाभ होणार असे चित्र दिसत असतांना या तक्रारींमुळे शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. केवळ काही तांत्रिक मुद्दे सोडले तर तक्रारीत आक्षेप घेण्यासारखे काही नसल्याचे निदर्शनास येते. मात्र हातात सत्ता नसलेल्यांना कदाचित शेतक-यांसाठी होत असलेल्या सुविधा पाहवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या तक्रारी झाल्या. ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्या अभावी व्यापा-यांना वजनात दांडी मारण्याची मिळत असलेली संधी बाजार समिती मार्केट यार्डात होऊ घातलेल्या ४०० मेट्रीक टनाच्या वजनकाट्यामुळे मिळाली नसती. बाजार समितीचे त्यावर नियंत्रण राहिले असते. मात्र या तक्रारींमुळे हंगामाच्या वेळेपर्यंत काटा उभारल्या जाऊ शकला नाही. सध्या बाजार समितीच्या मार्केट यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. टिनाच्या शेडमध्येच समितीचे कर्मचारी बसतात. तशीच स्थिती शिदोरी मंडपाचीही आहे. 
धान्य यार्डावर अनेकदा शेतक-यांचा माल बाहेर तर व्यापा-यांचा माल गोदामात अशी स्थिती असते. यावर्षी बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबविली. गोदामा अभावी अनेक शेतक-यांना या योजनेपासुन वंचीत राहावे लागले. नाफेडची खरेदी तालुक्यात सुरू झाल्याने शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळाला. काही जिनिंग मध्ये वजनकाट्यात तफावत असल्याचे आढळुन आले. बाजार समितीने या तक्रारींची दखल घेऊन काट्यांची तपासणी केली. मात्र बाजार समितीचा वजन काटा उभारल्या गेल्यास भविष्यात ही समस्या उद्भवणार नाही असे बाजास समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. शेतक-यांसाठी सुविधा निर्माण करणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडचणी दुर होऊन हा प्रकल्प लवकरच कार्यान्वयीत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment