Pages

Showing posts with label सभापतीं. Show all posts
Showing posts with label सभापतीं. Show all posts

Sunday, 3 March 2013

राजकीय कुरघोडीत शेतक-यांच्या सुविधा दावणीला


गेल्या अनेक वर्षांपासुन घाटंजी तालुक्याच्या सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाची भुमिका निभावणारी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतक-यांसाठी मात्र असुविधेचीच ठरली आहे. कापुस व धान्याच्या मार्केट  यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने आजवर बाजार समितीची सत्ता काबिज करणा-यांनी काय केले असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. कधी नव्हे तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प शेतक-यांसाठी सुरू झाला होता. शिदोरी मंडपापासुन ते गोदामापर्यंत सर्व सुविधांनी युक्त अशा २ कोटी ८ लाखांच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. 
आजवर तुरळक अपवाद वगळता कोणतेच विकासकाम न झालेल्या बाजार समितीमध्ये शेतक-यांसाठी शिदोरी मंडप, ईलेक्ट्रॉनिक वजनकाटा, गोदाम, स्वच्छतागृह, मुक्कामाची सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी यासह विवीध सुविधा एकाच वेळी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू झाले. मात्र तांत्रिक मुद्द्यांवरून या प्रकल्पाच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्पाचे काम खोळंबले. यंदाच्या कापुस हंगामात शेतक-यांना या सुविधांचा लाभ होणार असे चित्र दिसत असतांना या तक्रारींमुळे शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले. केवळ काही तांत्रिक मुद्दे सोडले तर तक्रारीत आक्षेप घेण्यासारखे काही नसल्याचे निदर्शनास येते. मात्र हातात सत्ता नसलेल्यांना कदाचित शेतक-यांसाठी होत असलेल्या सुविधा पाहवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या तक्रारी झाल्या. ईलेक्ट्रॉनिक वजनकाट्या अभावी व्यापा-यांना वजनात दांडी मारण्याची मिळत असलेली संधी बाजार समिती मार्केट यार्डात होऊ घातलेल्या ४०० मेट्रीक टनाच्या वजनकाट्यामुळे मिळाली नसती. बाजार समितीचे त्यावर नियंत्रण राहिले असते. मात्र या तक्रारींमुळे हंगामाच्या वेळेपर्यंत काटा उभारल्या जाऊ शकला नाही. सध्या बाजार समितीच्या मार्केट यार्डावर शेतक-यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. टिनाच्या शेडमध्येच समितीचे कर्मचारी बसतात. तशीच स्थिती शिदोरी मंडपाचीही आहे. 
धान्य यार्डावर अनेकदा शेतक-यांचा माल बाहेर तर व्यापा-यांचा माल गोदामात अशी स्थिती असते. यावर्षी बाजार समितीने शेतमाल तारण योजना राबविली. गोदामा अभावी अनेक शेतक-यांना या योजनेपासुन वंचीत राहावे लागले. नाफेडची खरेदी तालुक्यात सुरू झाल्याने शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळाला. काही जिनिंग मध्ये वजनकाट्यात तफावत असल्याचे आढळुन आले. बाजार समितीने या तक्रारींची दखल घेऊन काट्यांची तपासणी केली. मात्र बाजार समितीचा वजन काटा उभारल्या गेल्यास भविष्यात ही समस्या उद्भवणार नाही असे बाजास समिती सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले. शेतक-यांसाठी सुविधा निर्माण करणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडचणी दुर होऊन हा प्रकल्प लवकरच कार्यान्वयीत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
साभार :- देशोन्नती 

Thursday, 15 March 2012

घाटंजी पं.स.सभापतीपदी शैलेश इंगोले अविरोध सुवर्णा निकोडे उपसभापती


पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत घाटंजी पं.स.सभापतीपदी कॉंग्रेसचे शैलेश महादेव इंगोले व उपसभापतीपदी कॉंग्रेसच्याच सुवर्णा राजेश निकोडे यांची अविरोध निवड झाली.
सहा सदस्यीय घाटंजी पंचायत समिती मध्ये कॉंग्रेसचे ४ तर भाजपाकडे २ सदस्य आहेत. कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा झाला. कॉंग्रेसमधीलच पारवेकर गटाने रूपेश कल्यमवार यांच्यासाठी सुरूवातीला जोर दिला. मात्र चर्चेअंती ठराविक कालावधीनंतर सभापतीपद पारवेकर गटाकडे जाणार असल्याने कल्यमवार यांचे नामांकन दाखल करण्यात आले नाही.
विरोधी पक्ष भाजपाच्यावतीने सभापतीपदासाठी नामांकन दाखल करण्यात न आल्याने निवडणुक अविरोध झाली. यावेळी नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्य सुमित्रा पेंदोर, रूपेश कल्यमवार, भाजपाचे रमेश धुर्वे, रत्नमाला कोंडेकर यांची उपस्थिती होती. पीठासीन अधिकारी म्हणुन तहसिलदार संतोष शिंदे, सहाय्यक एस.व्ही.भरडे यांनी काम पाहिले.
साभार :- देशोन्नती 



शेतक-यांच्या हितासाठी घाटंजी बाजार समिती कटीबद्ध - अभिषेक ठाकरे



शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या मुलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर राहिल असे आश्वासन सभापती अभिषेक ठाकरे यांनी दिले. बाजार समिती मार्केट यार्डावर आयोजीत विवीध विकासकामांच्या भुमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. पायाभुत सुविधांची उभारणी होताच बाजार समितीला ‘ऑनलाईन’ करून शेतक-यांना जगभरातील बाजारभावाची माहिती देण्याची सुविधाही कार्यान्वयीत करण्यात येईल असे ते म्हणाले. शासनाने वारंवार कापुस उत्पादक शेतक-यांची थट्टा करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कापुस पणन महासंघाचे संचालक अण्णासाहेब पारवेकर होते. तर जिल्हा बँकेचे संचालक सुरेश लोणकर, पांढरकवडा बाजार समितीचे उपसभापती जानुसेठ जिवानी, भुविकास बँकेचे अध्यक्ष शंकर ठाकरे, माजी नगराध्यक्ष श्याम बेलोरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी बोलतांना लोकनेते सुरेश लोणकर यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकुन टिका केली. शेतकरी आत्महत्या का होत आहेत याचा अभ्यास करण्यासाठी संसदीय समिती जिल्हा दौ-यावर असताना कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेऊन शासनाने आपली बौद्धीक दिवाळखोरीच सिद्ध केली असे ते म्हणाले. सांसदीय समितीचा अहवाल जाण्यापुर्वीच कापुस निर्यातबंदीचा निर्णय घेणे म्हणजे दाक्षीणात्य राज्यातील भांडवलदारांचा गल्ला भरण्याचा डाव असल्याचे त्यांनी सांगीतले. कृषी क्षेत्राशी संबंधीत एवढा महत्वाचा निर्णय घेतांना देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनाही कल्पना देण्यात आली नव्हती याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. देशातील एकुण ९० टक्के कापसाचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. मात्र राज्यात केवळ १० टक्के मिल आहेत. तर ज्या केरळ राज्यात १० टक्के कापुस उत्पादन होत नाही तिथे ९० टक्के मिल आहेत. त्यामुळेच वस्त्रोद्योग मंत्र्यांनी कापुस उत्पादक शेतक-यांवर निर्यातबंदीची कु-हाड चालवली असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब पारवेकर यांनी शेतक-यांच्या होत असलेल्या मुस्कटदाबीबद्दल निषेध नोंदविला. शेतक-यांना आपले हक्क मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. सी.सी.आय.ने यावेळी कापुस खरेदी का केली नाही असा प्रश्न त्यानी उपस्थित केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचे भुमीपूजन करण्यात आले. घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत २ कोटी ८ लाख ८७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये मुलभूत सुविधांमध्ये लिलाव ओटा (धान्य यार्ड) करीता ११.७० लाख, पिण्याच्या पाण्याची सुविधा १ लाख, संरक्षण भिंत २४.१५ लाख, सिमेंट रस्ते २७.६४ लाख, ईलेक्ट्रीक सुविधा ३.५३ लाख, पाण्याची टाकी १२.९७ लाख, सांडपाण्याची व्यवस्था ३.१४ लाख, तर उत्पादीत सुविधांमध्ये धान्य चाळणी यंत्र ३०.६८ लाख, घनकचरा व्यवस्थापन १५.४८ लाख, गोदाम (धान्ययार्ड) २२.७० लाख, गोदाम (कापुस यार्ड) ४५.४१ लाख, भुईकाटा (५० मेट्रीक टन) १०.४२ लाख असा निधी बाजार समितीला प्राप्त झाला आहे. ही सर्व कामे ९ महिन्यांच्या कालावधीत पुर्ण होतील असा विश्वास सभापती अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती सचिन पारवेकर यांनी केले. संचालन बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार व आभार प्रदर्शन प्रकाश डंभारे यांनी केले.
साभार :- देशोन्नती

Wednesday, 4 January 2012

घाटंजी न.प.विषय समिती सभापतींची निवड


नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर सर्वांचेच लक्ष लागुन असलेल्या विषय समिती सभापतींची आज निवड करण्यात आली. सर्वात महत्वाच्या असलेल्या बांधकाम सभापती पदावर कॉंग्रेसचे परेश कारीया यांची वर्णी लागली. तर शिक्षण सभापतीपदावर रा.कॉ.चे राम खांडरे यांची निवड झाली. महिला व बालकल्याण सभापतीपदी शोभा ठाकरे तर उपसभापतीपदी सिमा डंभारे यांची निवड झाली. पाणीपुरवठा सभापतीपदी रा.कॉ.चे अकबर तंव्वर व आरोग्य सभापतीपदी संगिता भुरे यांची निवड करण्यात आली. विषय समित्यांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबरीचा वाटा मिळाला. पीठासीन अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी एस.डी.खांदे तर सहाय्यक म्हणुन मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांचेसह सर्व नवनिर्वाचीत नगरसेवकांची उपस्थिती होती.