खाच खळग्यांनी व्यापलेल्या रस्त्यावरून वाटचाल करणे हा सर्वसामान्यांच्या राहणीमानाचाच एक भाग झाला आहे. ग्रामिण भागातील काही रस्त्यांनी तर वाहने चालविणे सुद्धा शक्य होत नाही. मात्र अशाच एका खडतर रस्त्यावरून खुद्द यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांनी चक्क दुचाकी चालविण्याचा अनुभव घेतला. एका उच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्ती मधील ‘साधा माणुस' या निमित्ताने अनेकांना अनुभवास आला.
रोजगार हमी योजनेच्या कार्यशाळेसाठी ते घाटंजी येथे आले होते. या कार्यशाळेला तालुक्यातील ग्रा.पं.सरपंच, उपसरपंच तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचा-यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात केळापुर तांड्यावरील ग्रा.पं.उपसरपंचाच्या पतीने जिल्हाधिका-यांना तांड्यावर येऊन तेथिल भिषण परिस्थिती पाहण्याचे भावनिक आवाहन केले. जिल्हाधिका-यांनीही कार्यक्रम आटोपता घेत रात्री ७.३० वाजता सर्व ताफ्यासह केळापुर तांड्याकडे प्रयाण केले. मात्र मुख्य रस्त्यापासुन २ किलोमिटर आत मध्ये असलेल्या तांड्यावर जाण्यासाठी असलेला रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे वाहने तिथेच ठेऊन जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर, इतर सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी २ कि.मी.चालत जाऊनच तांडा गाठला. या भागात असलेल्या भिषण असुविधांबद्दल जिल्हाधिका-यांनी चिंता व्यक्त करून त्या सोडविण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्याच प्रमाणे ग्रामिण भागातील समस्यांवर काटेकोरपणे लक्ष पुरविण्याचे स्थानिक यंत्रणेला आदेश दिले.
साहेब गावात पोहचले त्यावेळी तांड्यावरील संत सेवालाल मंदिरात आरती सुरू होती. येथिल आध्यात्मिक वातावरणाने ते भारावले. जिल्हाधिकारी प्रथमच तांड्यावर आल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना चहापान करण्याचा आग्रह केला. मात्र व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी त्यास नम्र नकार दिला व गावक-यांचा मान राखत साखर खाऊन त्यांनी तोंड गोड केले. त्यानंतर परत येतांना अचानक जिल्हाधिका-यांच्या समोरूनच एक साप गेला. त्यामुळे यंत्रणेची भंबेरी उडाली. मात्र साप मुकाटपणे निघुन गेल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर तांड्यावरून दुचाकी बोलविण्यात आली. दुचाकी मागे बसण्या ऐवजी जिल्हाधिका-यानी गाडी चालविण्याची ईच्छा बोलुन दाखविली. आणी या खडतर रस्त्याने ते एका सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे दुचाकी सांभाळत मुख्य रस्त्यापर्यंत गेले. एका सनदी अधिका-याच्या व्यक्तीमत्वातील कमालीचा साधेपणा घाटंजी तालुक्याने अनुभवला.
No comments:
Post a Comment