Pages

Monday 12 September 2011

घाटंजी बाजार समिती सभापतीपदी अभिषेक ठाकरे उपसभापतीपदी प्रकाश डंभारे

ऐनवेळी झालेल्या नाट्यमय घडामोडी नंतर घाटंजी बाजार समिती सभापती पदाची माळ अखेर आमडीचे सरपंच अभिषेक ठाकरे यांच्या गळ्यात पडली. तर उपसभापतीपदी प्रकाश डंभारे यांची निवड झाली. सभापती-उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत दोन्ही गटांना सारखीच मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीने निवड करण्यात आली. बाजार समिती निवडणुकीत मोघे-लोणकर व अण्णासाहेब-निलेश पारवेकर या दोन मुख्य गटात निवडणुक झाली. त्यात मोघे-लोणकर गटाचे बहुमत आले. मात्र आज ना.मोघेंचे समर्थक देवानंद पवार यांनी वेगळी चुल मांडल्याने या गटात फुट पडली. सहकार क्षेत्रातील निवडणुकीत सत्तास्थापनेचा दांडगा अनुभव असलेल्या सुरेश लोणकरांनी पारवेकर गटाला हाताशी घेऊन बाजार समितीवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यामुळे देवानंद पवार तोंडघशी पडले आहेत. नवनियुक्त सभापती अभिषेक ठाकरे हे लोणकरांचे समर्थक आहेत तर उपसभापती प्रकाश डंभारे हे पारवेकरांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आज झालेल्या निवडणुकीत लोणकर पारवेकर गटाकडून सभापतीपदासाठी अभिषेक ठाकरे तर उपसभापती पदासाठी प्रकाश डंभारे यांनी नामांकन दाखल केले होते. तर मोघे-पवार गटाकडून रमेश आंबेपवार व सचिन ठाकरे यांचे नामांकन होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणल्या गेल्याने दोन्ही गटांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. निवडणुकीनंतर विजयी मिरवणुक काढण्यात आली. त्यामध्ये जि.प.सदस्य सुरेश लोणकर, राष्ट्रवादीचे सहकोषाध्यक्ष सतिष भोयर, माजी सभापती सचिन पारवेकर यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment