Pages

Wednesday 14 September 2011

‘समर्थ' च्या माजी अध्यक्ष व सचिवाविरोधात फौजदारी याचिका


बनावट दस्तावेज प्रकरण
शहरातील प्रमुख शैक्षणीक संस्थानांपैकी असलेल्या श्री. समर्थ शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष निळकंठ डंभारे व माजी सचिव शांताराम गुप्ते यांचे विरोधात येथिल प्रथम श्रेणी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी खोट्या दस्तावेजाद्वारे बँकेतुन रकमेची उचल करून संस्थेची कथितपणे फसवणुक केल्या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष य.शा.महल्ले  यांनी ही याचिका दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री समर्थ शिक्षण मंडळातील निळकंठ डंभारे यांचे अध्यक्षतेखाली असलेल्या कार्यकारी मंडळातील सदस्यांनी राजीनामा दिल्याने डंभारे यांचे कार्यकारी मंडळ विशेष आमसभेने बरखास्त करून नविन कार्यकारी मंडळ स्थापन करण्याचे सुचित केले. त्यानुसार ७ फेब्रुवारी २०१० ला निवडणुक प्रक्रीयेद्वारे नविन कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. तसेच अध्यक्षपदी य.शा.महल्ले यांची अविरोध निवड झाली. या बदलाबाबत विद्यमान सचिवामार्फत  सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर सचिवाने माजी अध्यक्ष निळकंठ डंभारे यांचेशी हातमिळवणी करून हा बदल अर्ज मागे घेतला. त्यामुळे सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी हा बदल खारीज करून महल्ले यांना नविन बदल अर्ज दाखल करण्याची मुभा दिली. या अर्जावरील निर्णय अद्याप प्रलंबीत आहे. मात्र माजी अध्यक्ष डंभारे व सचिवांनी या खारीज झालेल्या अर्जाचा चुकीचा अर्थ लावुन बेकायदेशीरपणे मंडळाच्या कामात ढवळाढवळ करणे सुरू केले. असा महल्ले यांचा आरोप आहे. डंभारे व गुप्ते यांचा राजीनामा आमसभेत मंजुर झाला व कार्यकारी मंडळही बरखास्त करण्यात आले. असे असतानांही माजी अध्यक्ष व सचिवांनी बनावट ठराव करून मंडळाशी संबंधीत बँकाना सादर केला. माजी सचिव शांताराम गुप्ते यांच्या नावाने खातेपालट केले. तसेच अनेकदा रकमेची उचल करण्यात आली असा आरोप करण्यात आला आहे. अशा आशयाची तक्रारही मंडळाच्या विद्यमान अध्यक्षांनी घाटंजी पोलीस स्टेशनला केली होती. मात्र पोलीसांनी याप्रकरणात कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे अखेर मंडळाचे माजी अध्यक्ष डंभारे माजी सचिव गुप्ते यांचे विरोधात बनावट दस्तावेज तयार करून रकमेची उचल करणे व संस्थेची फसवणुक करणे या सबबीखाली भा.दं.वि. कलम ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७२ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment