पोलीस स्टेशनच्या आवारात कॉन्स्टेबलला मारहाण करणा-या अवैध व्यावसायीकाविरोधात अखेर घाटंजी पोलीसांनी नाईलाजास्तव गुन्हा दाखल केला. सुरूवातीला कलम १८६ अन्वये कारवाई करून गुन्ह्याचे बर्कींग करणारे ठाणेदार बाबुराव खंदारे व सहाय्यक पोलीस निरिक्षक अरूण गुरनूले यांना सदर आरोपी विरूद्ध कलम ३५३, २९४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करणे भाग पडले. मारहाणीच्या वेळी उमेश चंदन हे ड्युटीवर नव्हते तसेच त्यांनी गणवेश घातलेला नव्हता अशी कारणे देऊन स्थानिक अधिका-यानी वरिष्ठांची दिशाभुल केली होती. स.पो.नि. गुरनूले यांनी तर चंदन यांच्या फिर्यादीवर ''सदर कर्मचारी ड्युटीवर नसल्याने ही तक्रार काल्पनिक वाटते'' असा शेरा दिला होता. वास्तविक पोलीस स्टेशनच्या आवारात हा प्रकार घडला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परिसरात होते. पोलीस कर्मचारी विलास सिडाम व भारत कापसीकर यांनी चंदन यांना त्या आरोपीच्या तावडीतुन सोडविले होते. तरी सुद्धा गुरनूलेंना ही तक्रार काल्पनिक वाटलीच कशी याचे संशोधन होणे गरजेचे आहे. तक्रारीवर योग्य न्याय न मिळाल्यामुळे पोलीस कर्मचारी न्यायालयात जाऊ शकतो अशी शंका उत्पन्न झाल्याने, कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-यास मारहाण झाल्यास कलम ३५३ अन्वये कार्यवाही होऊ शकते काय अशी विचारणा घाटंजी पोलीसांनी स्थानिक न्यायालयाला केली होती अशी माहिती आहे.
एकंदरीतच हे प्रकरण घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराचे ज्वलंत उदाहरण आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या दबावामुळे सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची औपचारीकता पोलीसांनी केली असली तरी कायद्याचा आपल्या स्वार्थासाठी फायदा करून घेणारे ठाणेदार बाबुराव खंदारे व स.पो.नि. अरूण गुरनूले यांची या प्रकरणातील संदिग्ध भुमिका तपासणे गरजेचे आहे. हे प्रकरण फारसे गंभिर नसले तरी हा 'प्रकार' नक्कीच गांभिर्याने घेण्यासारखा आहे. पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यानी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता पोलीस वर्तुळातूनच होऊ लागली आहे.
No comments:
Post a Comment