गेल्या दोन दिवसांपासुन तालुक्यात विजेच्या कडकडाटासह झालेल्या संततधार पावसामुळे शेतक-यांना चिंतेत टाकले असुन जनजीवनावरही परिणाम झाला आहे. तालुक्यातील झटाळा येथिल मनिषा राजु कुडमेथे (वय २३) या महिलेचा नाल्याच्या पुरात वाहुन गेल्याने मृत्यू झाला. सदर महिला तिच्या पती सोबत कुर्ली येथुन दुचाकीवर येत होती. नाल्याच्या पुलावरून जात असतांना अचानक पुराचा लोंढा आल्याने दोघेही प्रवाहात पडले. त्यानंतर पतीला झाडाचा आधार मिळाल्याने त्याला बाहेर निघता आले. मात्र महिला पुरात वाहुन गेली. दुस-या दिवशी नाल्याच्या काठावर तिचे प्रेत आढळले. यावर्षी एप्रिल महिण्यातच त्यांचे लग्न झाले होते.
पेरणी, बियाणांचा दगा व त्यामुळे झालेली दुबार पेरणी या संकटाने अगोदरच जायबंदी झालेल्या शेती व शेतक-यांना संततधार पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. मानवनिर्मित आपत्तीनंतर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीने बळिराजा पुरता हतबल झाला आहे. रोजच्या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. परिणामी हलक्या जमिनीतील पिके पिवळी पडू लागली आहेत.जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्याने मुळाद्वारे पाणी व अन्नद्रव्य शोषले जात नाही. तीन ते चार टक्के पिके जळाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली नसल्याने ढगाळ वातावरणामुळे पिकांसाठी रोगट हवामान तयार होत आहे. सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. पिके पाण्यात असल्यामुळे पिवळी पडून नुकसान होत आहे. बहुतांश भागातील कापसाचे पीक पिवळसर पडू लागल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसामुळे कामे रखडली असून दिनक्रमही बदलला आहे.सध्या कापसाचे पीक भरण्याच्या अवस्थेत आहे. मध्यंतरी पावसाने विश्रांती दिल्याच्या काळात शेतक-यांनी कापसाला खताचा डोस देऊन ठेवला. तीन दिवस सलग पाऊस पडल्या नंतर शेतकरी आनंदित झाला; परंतु अधुनमधून पाऊस पडत असल्याने शेतक-यांच्या आनंदावर पाणी फेरले जाण्याची वेळ आली आहे. विषेश म्हणजे पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतांनाही वातावरणातील उकाडा मात्र कमी झालेला नाही. पाऊस पडून गेल्यावर तापणा-या कडक उन्हामुळे वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे.
No comments:
Post a Comment