मुरलीच्या ग्रामस्थांचा लढा यशस्वी
लाखो रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप असलेल्या डी.डी. गिनगुले या वादग्रस्त शिक्षकाला अखेर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम यांनी निलंबीत केले. निलंबन काळात त्याला उमरखेड पंचायत समिती देण्यात आली आहे.
एका जिल्हा परिषद सदस्याच्या दादागीरीमुळे गेल्या काही काळात चर्चेत आलेल्या या शिक्षकावर अनेक आरोप आहेत. कोणतीही पुर्वसुचना न देता तब्बल आठ महिने ड्युटीवरच न गेलेल्या गिनगुले याला मुरली या गावीच नियुक्त करण्यात यावे यासाठी मंत्र्यांच्या निकटस्थ असलेल्या एका जिल्हा परिषद सदस्याने राजकीय पदाचा गैरवापर करून तसेच प्रसंगी पंचायत समिती कार्यालयात धुडगूस घालुन दबावतंत्राचा वापर केला होता. मात्र मुरली येथिल ग्रामस्थांचा या शिक्षकाच्या नियुक्तीला ठाम विरोध होता. त्यामुळे येथिल ग्रामस्थांनी १ जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकले होते. हा विरोध दडपण्यासाठी त्या जि.प.सदस्याने घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार खंदारे व स.पो.नि. गुरनूले यांच्या माध्यमातुन मुरली येथे पोलीस ताफा पाठवुन गावक-यांना धमकाविण्याचाही प्रयत्न केला होता.
डी.डी. गिनगुले हा जानेवारी २००४ ते ३ सप्टेंबर २०१० या कालावधीत तालुक्यातील सावंगी संगम येथिल जि.प. शाळेवर कार्यरत होता. त्यावेळी काही काळ मुख्याध्यापक पदाचा प्रभार त्याचेकडे होता. त्यावेळी त्याने शासनाकडून मिळालेला निधी, ई वर्ग जमिनीच्या हर्रासातुन शाळेला मिळालेली रक्कम, सर्व शिक्षा अभियान, मानव विकास मिशन च्या रकमेतुन सुमारे २ लाख रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार सावंगी संगम येथिल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केली होती. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी गिनगुलेची ग्रामस्थांनी तक्रार केली होती. त्यानुसार पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. पार्लावार यांनी या तक्रारीची चौकशी केली. त्यामध्ये सदर प्रभारी मुख्याध्यापकाने गैरप्रकार केल्याचे चौकशीत आढळुन आले. धामनदरी जि. प. शाळेचे अर्धवट बांधकाम तसेच या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवणा-या महिलेचे वेतनही देण्यात न आल्याचे आढळले. तसा अहवालही चौकशी अधिका-याने गटशिक्षणाधिका-याकडे सोपवला. त्यानंतर गिनगुले कडुन मुख्याध्यापक पदाचा प्रभार काढुन घेण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने केली. परंतु आदेश मिळुनही त्या शिक्षकाने प्रभार दिला नाही. त्यामुळे पंचनामा करून एकतर्फी प्रभार काढण्यात आला. मात्र या प्रकरणी थातुर मातुर कारणे दाखवा नोटिस बजावण्याची औपचारीकता वगळता पंचायत समितीने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नव्हती. विषेश म्हणजे दि. ४ सप्टेंबर २०१० पासुन सदर शिक्षक शाळेवर कोणतीही पुर्वसुचना न देता गैरहजर होता . या सर्व प्रकारानंतर त्याचेवर कार्यवाही होण्याऐवजी त्याला घाटंजी लगत असलेल्या मुरली गावी स्थानांतरीत करण्यात आले. मात्र गावक-यांच्या विरोधामूळे त्याला रूजू करून घेण्यात आले नाही. तरी देखिल जि.प.सदस्याने हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून गिनगुलेला मुरली येथेच नियुक्त करण्याचा हेका धरला.
त्यामुळे गिनगुलेचे प्रकरण अनेक महिण्यांपासुन रेंगाळतच होते. मात्र मुरली येथिल यादव निकम यानी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन आमदार संदिप बाजोरीया, सुमित बाजोरीया, कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर यांनी या प्रकरणात विषेश लक्ष घालुन मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे या प्रकरणात योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली होती. त्यामुळे अखेर सर्व बाबींचा विचार करून डी.डी. गिनगुले याचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. याबाबत प्रतिक्रीया देताना सतिष भोयर म्हणाले की, शैक्षणीक क्षेत्रातील बेशिस्त प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचा प्रकार योग्य नाही. गिनगुले यांचेवर झालेल्या कार्यवाहीतुन ईतर कर्मचा-यांनी धडा घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
साभार: देशोन्नती
No comments:
Post a Comment