टाळ मृदुंगाचा मंजूळ नाद...भजन व भक्तीसंगीताची मेजवानी..... आणी प्रत्येक मुखात गण गण गणात बोते चा गजर अशा भक्तीमय वातावरणात घाटंजी येथे संत श्री गजानन महाराज प्रगट दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. दिवसभरात तालुक्यातील गावागावातून आलेल्या भक्तांनी घाटंजी शहरातील रस्ते ओसंडून वाहात होते. या चार दिवसीय महोत्सवादरम्यान सुमारे एक ते दिड लाख भाविकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.
दि. ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजीत या समारोहादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभिषेक, होमहवन, किर्तन व भजन संगीताच्या कार्यक्रमांनी घाटंजी शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळपासुनच येथिल गजानन मंदिरात तालुक्यातून आलेल्या भक्तांची रीघ लागली होती. सर्व भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसाद वितरणासाठी ग्रामिण भागातून मोठ्या संख्येने सेवा मंडळे, हरिपाठ मंडळ, दुर्गोत्सव व गणेशोत्सव मंडळे यासह शिरोली, सगदा, पारवा, मानोली, खापरी, मुरली, या गावांमधुन अनेक सर्वधर्मीय भक्त स्वयंस्फूर्तीने नि:शुल्क सेवा देतात. स्वयंपाकापासुन पत्रावळी उचलण्यापर्यंतची सर्व कामे ही मंडळी पार पाडतात. शिक्षक, शासकीय कर्मचारी, व्यावसायीक सुद्धा आपली प्रतिष्ठा श्रींच्या चरणी ठेवुन हाती लागेल ते काम करतांना दिसतात. शहरातील रस्त्यांवर काही दानशुरांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. दुपारच्या सुमारास टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींची पालखी शहरातुन काढण्यात आली. वारकरी मंडळे, भजनी मंडळ, दिंड्या, अभंगाच्या नादात तल्लीन होऊन नाचणारे आबालवुद्ध यामुळे घाटंजी शहर भक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघाले होते.
घाटंजी येथिल गजानन मंदिर हे सर्वदूर प्रसिद्ध असुन जिल्ह्यातील दुस-या क्रमांकाचे गजानन मंदिर अशी या देवस्थानाची ख्याती आहे. भक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीसांची संख्या जास्त असली तरी गर्दी नियंत्रण करण्या ऐवजी सर्व पोलीस एकाच ठिकाणी ठिय्या मांडून बसल्याने नाराजी व्यक्त होत होती.
(छायाचित्र :- अमोल राऊत, पांडूरंग निवल, वामनराव ढवळे)
(छायाचित्र :- अमोल राऊत, पांडूरंग निवल, वामनराव ढवळे)
No comments:
Post a Comment