स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शिवणी जि.प.सर्कल मधील मतदार अजुनही संभ्रमावस्थेतून निघालेला दिसत नाही.
राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्यात झालेल्या ओढाताणीनंतर काहीसे स्थैर्य आल्यासारखी स्थिती निर्माण झाली असली तरी सर्व चर्चीत उमेदवारांची गर्दी या सर्कलमध्ये झाल्याने मतदार राजा अस्थिर झाला आहे.
शिवणी जि.प.गटात सध्या रा.काँ.चे सुरेश लोणकर, कॉंग्रेसचे देवानंद पवार, मनसेचे प्रशांत धांदे, सेना-विदर्भ जन आंदोलन समितीचे मोहन जाधव, भाजपाचे विशाल कदम, अपक्ष जितेंद्र ठाकरे हे उमेदवार आहेत. यामधील विशाल कदम वगळता ईतर उमेदवार राजकीय पार्श्वभूमी लाभलेले व या ना त्या कारणावरून चर्चेत राहणारे आहेत. त्यामुळे यापैकी नेमकी कोणाची निवड करायची हा प्रश्न मतदारांना पडला आहे.
कॉंग्रेसच्या देवानंद पवार यांच्या गेल्या पाच वर्षातील उठाठेवी केवळ घाटंजी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा चर्चिल्या गेल्या. एकदा तर ‘पोपटपंची’ केल्याबद्दल सेना आमदाराकडून त्यांना ‘प्रसाद’ही मिळाला. सत्तेच्या उन्मादात वावरण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमूळे त्यांना समाजात झिडकारल्या जाणे स्वाभाविक आहे. अशा उमेदवाराच्या विरोधात राजकारणामध्ये आपले आयुष्य घालविणा-या सुरेश लोणकर यांना लढावे लागत आहे. त्यातच मोठ्या अपेक्षेने कॉंग्रेस मधुन राष्ट्रवादीमध्ये आलेल्या लोणकरांची योग्य ‘वेळ’ साधल्या गेली नाही. राज्य साक्षरता परीषदेच्या अध्यक्षपदासह अनेक पदे भुषविणा-या जेष्ठ व्यक्तीला जिल्हा परीषदेच्या क्षुल्लक तिकीटासाठी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे झगडावे लागले हे आणखी एक दुर्दैव !
तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर लोणकर यांची पकड आहे. ग्रामीण भागातील जनसंपर्कही दांडगा आहे. मात्र अनेकदा एखाद्या पदावर बसवितांना त्यांचे कुटूंबप्रेम आडवे येते हे वास्तव आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकीमध्ये त्यांनी कुटूंब व आप्तांना प्राधान्य दिल्याची उदाहरणे आहेत. अशावेळी निष्ठेने कार्य करणारे कार्यकर्ते मात्र दुर्लक्षील्या गेले हा भाग अलाहिदा. केवळ घाटंजी तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या सुरेश लोणकर यांना आजवर त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळाली नाही.
त्यांचा सध्याचा गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना शिवणी मध्ये अतिक्रमण करावे लागले. मात्र येथे लढण्याच्या हेतूने आतापर्यंत पुर्वतयारी करणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे स्वप्न भंगले. तिकीट वाटण्याची ‘पत’ असतांना तिकीट मागण्याची वेळ का यावी हा प्रश्नही विचारल्या गेला. लोणकरांशी स्पर्धा असलेल्या देवानंद पवार यांना ईतरांना बोटावर नाचविण्याची कला अवगत आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. मात्र या कलेचा वापर मर्यादेबाहेर झाल्याने सर्वांनाच त्याचा विट आला आहे. तरी देखिल पैशाने सर्व काही शक्य असल्याचा ‘अर्थ’ काढुन ते अजुनही आपल्याच मस्तीत वागत आहेत. अशा या मिश्र परिस्थितीमध्ये पवार यांना मारक ठरू शकणारे मोहन जाधव आणी लोणकरांच्या मतांवर डल्ला मारू शकणारे जितेंद्र ठाकरे व प्रशांत धांदे यांच्यामुळे शिवणीतील वातावरण सध्या संभ्रमीत करणारे आहे. या विचित्र लढतीत कोण सरस ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी शिवणी सर्कल मधील मतदार व राजकीय वातावरण ‘कन्फ्युज’ करणारेच आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment