वय वर्ष ७४, शिक्षण जेमतेम तिसरा वर्ग. परिस्थिती दोन वेळच्या जेवणाची सोय होईल अशी. या परिस्थितीतील व्यक्ती मोलमजुरी करून पोट भरणे एवढाच विचार करू शकते. मात्र चंद्रपुर जिल्ह्यातील दादाजी खोब्रागडे यांनी सर्वसामान्यांमध्ये राहुन असामान्य विषयाला हात घातला. तांदळाच्या नवनविन वाणांचे संशोधन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची व त्यानुषंगाने देशाची एक वेगळी ओळख निर्माण करणा-या दादाजी नावाच्या साक्षात संघर्षाचा सन्मान घाटंजी येथे शिवजयंती उत्सवात आज होणार असुन त्यांना यावर्षीच्या वीर राजे संभाजी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात नांदेड या छोट्याशा गावी हालाखीच्या परिस्थितीत जिवन जगत असतांना दादाजी खोब्रागडे यांनी अवघ्या दिड एकर शेतीमध्ये तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसीत करून पुस्तकी ज्ञानाला सणसणीत चपराक दिली आहे. दादाजींच्या कर्तृत्वामुळे संशोधन हे केवळ ए.सी.च्या थंडगार हवेतच नाही तर ऊन, वारा, पाऊस सहन करून निसर्गाच्या सानिध्यात सुद्धा होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केले.
आपल्या दिड एकर शेतीला नैसर्गीक प्रयोगशाळेचे रूप देऊन गेल्या चाळीस वर्षांपासुन दादाजी संशोधन करीत आहे. मात्र हे करीत असतांना त्यांना करावा लागलेला संघर्ष अकल्पनीय आहे.
१९८३ मध्ये दादाजीनी तांदळाचे एक नविन वाण विकसीत केले. या वाणाची पेरणी करून बघा असे त्यांनी गावातील शेतक-यांना सांगीतले. मात्र तेव्हा कोणीही त्याला महत्व दिले नाही. याला अपवाद ठरले ते याच गावातील भिमराव शिंदे हे शेतकरी. त्यांनी चार एकरात या वाणाची पेरणी केली. पहिल्याच वर्षी शिंदे यांना तब्बल ९० क्विंटल तांदूळाचे पिक झाले. तेव्हा त्यांची किर्ती सर्वत्र पसरू लागली. त्या काळात एच.एम.टी. कंपनीची घड्याळे प्रसिद्ध असल्याने दादाजींनी त्या वाणाला एच.एम.टी. हे नाव दिले. पंजाबराव कृषी विद्यापीठातील तज्ञांनी हे वाण तपासण्यासाठी घेतले. मात्र तिथे दादाजींचा घात झाला. विद्यापीठाने या वाणाच्या संशोधनाचे श्रेय दादाजींना देण्या ऐवजी हे वाण पीकेव्ही एचएमटी या नावाने बाजारात आणले. तेव्हापासुन दादाजींचा विद्यापीठाशी संघर्ष सुरू आहे. चाळीस वर्षाच्या संघर्षाची दखल देशातील कोणत्याही कृषी विद्यापीठाने किंवा शासनाने घेतली नाही. मात्र फोर्ब्स या प्रतिष्ठीत मासिकाने त्यांच्या कार्याची दखल घेताच सर्वांना त्यांचे महत्व वाटू लागले. त्यानंतर दादाजींना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांनी तांदळाची विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चिन्नुर, नांदेड दिपक, काटे एचएमटी व डीआरके सुगंधी अशी नऊ वाणे विकसीत केली असुन त्यांच्या एचएमटी सोना या वाणाला देशात प्रचंड मागणी आहे. विदर्भात गेल्या काही वर्षांपासुन शेतकरी आत्महत्यांची चर्चा होत असतांना प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करीत वेगळ्या वाटेने वाटचाल करणा-या या विदर्भपुत्राने आत्मविश्वासाचा संदेश समाजात पेरला आहे.
घाटंजीत आज रात्री ७ वाजता दादाजी खोब्रागडेंच्या या संघर्षाला मानाचा मुजरा करण्यासाठी शिवतिर्थ, जेसिस कॉलनी येथे वीर राजे संभाजी पुरस्काराने त्याना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष वसंतराव पुरके, उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के, लोकनेते सुरेश लोणकर, अण्णासाहेब पारवेकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
No comments:
Post a Comment