Pages

Thursday 26 January 2012

कपडे धुतांना सापडलेले १८ हजार परत केले

मोलकरीणचा प्रामाणीकपणा
पैशाच्या मागे धावणा-या आजच्या काळात कोणाच्याही नियतीचा भरवसा सांगता येत नाही. धनदांडग्यांनाही पैशाचा मोह आवरत नाही. कुणाची मौल्यवान वस्तू अथवा पैसे हरविले तर ते परत मिळतील याची शाश्वतीच नसते. मात्र घाटंजी येथे एका मोलकरणीने धुण्याच्या कपड्यात सापडलेले तब्बल १८ हजार रूपये परत करून प्रामाणीकपणा आजही जिवंत असल्याचा प्रत्यय आणुन दिला.
येथिल घाटी भागात राहणारी मंगला वसंता कलाने ही महिला घरोघरी धुणी भांडी करून आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करते. २१ जानेवारीला वसंतनगर भागात राहणारे मोखडकर यांच्या घरी नेहमीप्रमाणे कामासाठी आली. त्या दिवशी मोखडकर कुटूंबीय गावाला गेले होते. त्यांनी धुण्याचे कपडे व भांडी बाहेर काढुन ठेवली होती. कपडे वाळवितांना मंगलाला एका  पँटच्या खिशात काहीतरी असल्याचे जाणवले. तिने खिसा पाहिला असता पाचशे रूपयांच्या नोटांचे बंडल आढळले. पैसे पाहुन ती थोडी घाबरली. काय करावे हे तिला सुचत नव्हते. मोखडकर कुटूंबीय तिन चार दिवस गावावरून परत येणार नव्हते. त्यामुळे तिने शेजारी राहणा-या उमाताई भारशंकर यांचे घर गाठले. त्यांना हा प्रकार सांगीतला. तिथे पैसे मोजले असता ५०० रूपयांच्या ३६ नोटा आढळल्या. भारशंकर यांनी मोखडकर कुटूंबीयांना याबाबत भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. आज मोखडकर कुटूंबीय घरी परतल्यावर त्यांना हे पैसे परत करण्यात आले. विशेष म्हणजे खिशात पैसे होते याची आठवण सुद्धा मोखडकर यांना नव्हती. मंगला मध्ये असलेल्या प्रामाणीकपणाने सर्वांनाच सुखद धक्का बसला. काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरणा-या मोलकरणीने प्रामाणीकपणे मोठी रक्कम परत करून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
साभार :- देशोन्नती

No comments:

Post a Comment