प्रामाणिकपणाबद्दल शाळेत कौतुक
आजच्या काळात बहुतांश लोक फक्त आपल्यापुरताच विचार करतात. आपला फायदा दिसत असताना कुणाला एखाद्याच्या नुकसानाची पर्वा नसते. महागड्या मोबाईलचे तर आजच्या काळात चांगलेच फॅड निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणालाही मोबाईल हवाहवासा वाटतो. त्यामुळे कधी मोबाईल हरविला तर तो आपला नव्हेच म्हणुन सोडून द्यावा लागतो. मात्र घाटंजी येथे दोन विद्यार्थिनींनी त्यांना सापडलेला मोबाईल संबंधीत व्यक्तीपर्यंत पोहचवुन प्रामाणिकपणाचे एक अनुकरणीय उदाहरण सामाजापुढे ठेवले आहे. विधी भगवान सरदार व काजल अशोक मंत्रीवार या येथिल नगर परिषद शाळा क्र.५ मध्ये सहाव्या वर्गात शिकणा-या विद्यार्थीनी पहाटे नेहमीप्रमाणे शाळेकडे येत असतांना त्यांना रस्त्यात एक महागडा मोबाईल पडलेला दिसला. मोबाईल खाली पडल्याने बंद झाला होता. त्यामुळे त्यांनी तो बॅगमध्ये ठेवला. घरी गेल्यावर त्यांनी मोबाईल सुरू करून त्यावर कुणाचा कॉल येईस्तोवर वाट पाहिली. कॉल येताच त्यांनी हा मोबाईल आम्हाला सापडला आहे. तो कुणाचा आहे सांगा अशी विचारणा केली. तसेच मोबाईल संबंधीत व्यक्तीला परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल नगर परिषद शाळेत त्यांचे कौतुक करण्यात आले. नगर परिषद शाळेचे शिक्षक कवेशकुमार कांबळे, रूपेश कावलकर, तुषार बोबडे, गजानन बंडीवार, चंद्रशेखर हळबेश्वर, हिरेश्वर यन्नरवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी इंग्रजी शब्द पाठांतर चाचणीत उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल अफशा महेवश सैय्यद, प्रितम हेमके, धवल कडू या विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले. विधी सरदार या विद्यार्थीनीने यापुर्वी शाळेच्या एका कार्यक्रमात सर्वानाच चकीत केले होते. खासदार भावना गवळी या कार्यक्रमात आल्या असता तिने थेट त्यांच्याकडे जाऊन आमच्या शाळेत येण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी रस्ता द्या अशी मागणी विधीने करून खुद्द खासदारांनाही अचंभित केले होते हे विशेष.
No comments:
Post a Comment