Pages

Saturday 7 January 2012

ज्वारीची भाकरी खाऊन स्पर्धा करायची तरी कशी ?

धावपटू राजन भुरेचा जळजळीत सवाल
ग्रामिण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना संधी मिळाली तर ते यशाची शिखरे गाठू शकतात. मात्र ग्रामीण खेळाडूंना कधी पुढे येऊच दिल्या जात नाही. मोठ्या स्पर्धांमध्ये टिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा त्यांना मिळत नाहीत. त्यांचा आहारही सकस नसतो. केवळ डाळीच्या पाण्यावर अन ज्वारीच्या भाकरीवर ग्रामिण खेळाडू स्पर्धेत कसा टिकणार ?  असा जळजळीत सवाल राजन भुरे उपस्थित करतो. 
नशिबाने केलेल्या आघातानंतर स्वत:ला सावरून पुन्हा ‘टॅ्रक’ वर उतरलेल्या राजनला ग्रामिण भागातील खेळाडूंसाठीच जगायचं आहे. ग्रामिण भागातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची त्याची ईच्छा आहे. ग्रामिण खेळाडूंसाठी जिल्हास्तरावर क्रिडा प्रबोधीनी असावी जेणेकरून त्यांच्यातील प्रतिभेला चालना मिळेल असे त्याचे मत आहे. खेड्यातील खेळाडूंना नेहमीच हेटाळणीला सामोरे जावे लागते. याचे उदाहरण देतांना तो म्हणाला की, २००२ मध्ये नागपुरला राजीव गांधी राज्यस्तरीय सद्भावना दौड स्पर्धेत घाटंजी तालुक्यातून ९ खेळाडू सहभागी झाले होते. मात्र स्पोर्ट्स किट नसल्याने त्यांना सुरूवातीस मैदानाबाहेर काढण्यात आले. मात्र नागपुरचे तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी हस्तक्षेप केल्याने त्यांना स्पर्धेत घेण्यात आले. त्यावेळी  मैदानाबाहेर काढण्यात आलेले पाच खेळाडू अव्वल ठरले तर राजन भुरे यांना बेस्ट कोच पुरस्कार मिळाला होता. जि.प.च्या अनुकंपा यादीत नाव असुनही राजनला अद्याप नोकरी मिळाली नाही. सध्या तो माणिकवाडा (धनज) येथे बहिणीकडे राहतो. बहिण उज्वला पारधी व जावई संजय पारधी यांनीच आजवर आपल्याला सावरले असल्याचे तो सांगतो. तसेच अडचणीच्या वेळी शिरोली येथिल कैलास कोरवते मदतीस धावुन येतात असे त्याने सांगीतले. येत्या २४ फेब्रुवारीला बंगळुरू येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेत व त्यानंतर मार्च महिन्यात थायलंड येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. अशा स्पर्धांसाठी जातांना शासन केवळ तांत्रीक बाबी पुर्ण करते. मात्र देशाचे प्रतिनिधीत्व करीत असताना साधा प्रवासखर्चही देण्यात येत नसल्याबाबत त्याने खंत व्यक्त केली. अशा परिस्थितीत ग्रामिण खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पोहचणार? असा सवाल त्याने उपस्थित केला. अंगी प्रचंड गुणवत्ता अन अनुभवातून आत्मसात केलेल्या अनेक गोष्टींमुळे राजन एक यशस्वी प्रशिक्षक होऊ शकतो. मात्र वशिलेबाजीच्या काळात त्याच्या गुणवत्तेची पारख कोण करणार ? त्याला संधी कोण देणार ? ग्रामिण खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची कुवत आहे. परंतु सध्याच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना केवळ जिल्हास्तरापर्यंतच संधी आहे. त्यानंतर ज्याची आर्थिक परिस्थिती आहे तोच पुढे जाऊ शकतो. घाटंजी तालुक्यातील ग्रामिण भागात खेळांप्रती प्रचंड आकर्षण आहे. मात्र त्यांची दखल घेण्यासाठीच कुणी तयार नाही. या भागाचे लोकप्रतिनिधी ना.शिवाजीराव मोघे अनेक वर्षांपासुन मंत्रीपदावर आहेत. मात्र घाटंजी तालुक्यासह जिल्ह्यातील खेळाडूंसाठी त्यानी पावले उचलली नाहीत. आदिवासी भागातील खेळाडूंना चालना देण्यासाठी शासनस्तरावर धोरण ठरविण्याची गरज राजन भुरे याने तळमळीने बोलुन दाखविली.
 नशिबाने केलेल्या प्रहारांना तेवढ्याच वेगाने मागे सोडून राजन पुन्हा आयुष्याच्या शर्यतीत उतरलाय. त्याला गरज आहे ती मदतीची प्रोत्साहनाची.

अमोल राऊत

साभार:- देशोन्नती

No comments:

Post a Comment