Pages

Sunday 1 January 2012

केशटोभाऊ पाठोपाठ अंजुबाईचेही लागले शुभेच्छा फलक

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कुतूहल व चर्चेचा विषय ठरलेल्या केशटोभाऊंच्या शुभेच्छा फलकांपाठोपाठ काल त्या फलकाला न्याहाळणारी अंजुबाई ही मनोरूग्ण महिलाही फलकावर झळकली. काही हौशी तरूणांनी तिच्याही छायाचित्रासह शुभेच्छा फलक शहरात लावले आहेत. काल पोलीस स्टेशनसमोर लागलेल्या फलकाला अंजुबाई ही वेडसर महिला मोठ्या कुतूहलाने न्याहाळत होती. आपल्यातीलच एक आज चक्क फलकावर झळकल्याने तिला त्याचे नवल वाटले होते. अखेर आज तिच्याही नावाचे शुभेच्छा फलक लागल्याने ती सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
या उपक्रमामुळे अशा प्रसंगी भुछत्राप्रमाणे उगवणा-या कार्यकर्त्यांचे होर्डींग्स मात्र नजरेस पडले नाहीत. एरवी घाटंजी शहरात शुभेच्छा फलकांचा सुकाळ असतो. मात्र यावेळी केशटोभाऊ व अंजुबाई यांच्या भीतीमुळे केवळ फलकावर चमकणा-या बेगडी नेते व कार्यकर्त्यांची फलक लावण्याची हिंमतच झाली नाही. समाजात मानाचे स्थान असणा-यांचे लागणारे होर्डींग्स ही समजण्यासारखी गोष्ट आहे. मात्र ज्याच्याकडे कोणते पद नाही व समाजात पतही नाही असे लोकही स्वत:चा गवगवा करण्यासाठी होर्डींगबाजी करतात.
घाटंजी शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेल्या पथदिव्यांच्या खांबांवर मोठमोठे होर्डींग्स लावण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासुन बिनदिक्कतपणे सुरू आहे. या फलकांचा आकार एवढा मोठा असतो की, अनेकदा वाहनधारक त्याला जाऊन धडकतात. त्यामुळे अपघात होऊन नागरिक जखमी सुद्धा झाले आहेत. मात्र या बाबीकडे नगर परिषद व पोलीस यंत्रणा सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने काही युवकांनी पुढे येऊन हा गांधीगीरीचा मार्ग अवलंबिला. त्याचा चांगलाच परिणाम नववर्षाच्या दिवशी दिसुन आला. काही सन्माननिय अपवाद वगळता शुभेच्छा फलक निदर्शनास आले नाही. हा बदल नेमका किती दिवस राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment