आमडी येथिल घटनेने घाटंजी तालुक्यात खळबळ
जिच्याशी साता जन्माची गाठ बांधली त्या पत्नीला विष पाजुन व त्यानंतर गळा दाबुन अत्यंत निर्घुणपणे हत्या करणा-या नराधम पतीला घाटंजी पोलीसांनी अटक केली. त्याचेवर कलम ४९८ (अ), ३०२, २०१ भा.दं.वी.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि. १२ जानेवारीच्या दुपारी पती संजय नामदेव महल्ले (४५) रा.आमडी याने सौ.सुनिता हिला शेतात नेले. सुनिता हिच्या वडीलांच्या शेतातून आरोपीच्या शेतात पाईपलाईन टाकण्यावरून दोन कुटूंबात वाद सुरू होता. शिवाय आरोपी त्याच्या पत्नीला नेहमीच सासरवरून या ना त्या कारणावरून पैसे आणण्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्टीने छळ करीत होता. लग्न झाल्यापासुनच सदर विवाहितेला असा त्रास सुरू होता. मात्र नेहमीच मागण्या पुर्ण होत असल्याने त्याला ती सवयच जडली. लग्नाला तब्बल विस वर्ष होऊनही त्याच्या मागण्या वाढतच चालल्या होत्या. अगदी काही दिवसांपुर्वीच त्याने मुलीच्या वडीलांना को-या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी मागीतली होती. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्याचा पारा भडकला. त्यावेळी सर्वांसमक्ष त्याने ‘आता तुमचे आमचे नाते संपले, याचा परिणाम तुमच्या मुलीला भोगावा लागेल’ अशी धमकीही दिली होती. अखेर १२ जानेवारीला त्याने पत्नीला शेतात नेऊन निर्दयीपणे खुन केला. पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली असा बनाव निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र घटनास्थळावरील परिस्थितीवरून ती आत्महत्या नसुन खुनच आहे हे निदर्शनास आले. मृतक महिलेचा गळा दाबुन नंतर विष पाजण्यात आले असावे असा अंदाज सुत्रांनी व्यक्त केला. शवविच्छेदनातही अंगावर जखमा तसेच गळा आवळल्याच्या खुना दिसुन आल्याने ही हत्या असल्याचे प्राथमिक दृष्ट्या सिद्ध झाले. घटनेचा तपास प्रभारी ठाणेदार अरूण गुरूनूले करीत आहेत. सदर विवाहितेवर आमडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडीलांच्या या कृत्यामुळे मुलगी सोनू (वय १५) व मुलगा योगेश (वय ७) यांच्यावरील मायेची सावली निघुन गेली आहे. आपल्या मुलीचा निर्घुणपणे खुन करणा-या नराधमाला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मुलीचे वडील जयवंत महादेव निवल यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment