शिवणीत रा.कॉ.चा "तिन तिघाडा"
पारवा गटात कॉंग्रेसची गोची
उमेदवारी मिळविण्यासाठी लागतोय कस
वातावरणात अंग गोठवणारा गारवा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून गरमागरमी सुरू आहे. राष्ट्रवादी मध्ये नव्यानेच आलेल्या नेते व कार्यकर्त्यांमुळे आजवर तालुक्यात राष्ट्रवादीची धुरा सांभाळणारे नेते दुखावल्या गेले आहेत. प्रबळ दावेदार वाढ़ल्याने शिवणीमध्ये रा.कॉ. व पारव्यात कॉंग्रेसला निर्णय घेणे कठीण जात आहे
बाजार समिती सभापती निवडीदरम्यान झालेल्या मतभेदांमुळे आजवर ना.मोघेंना समर्थन देणारे जि.प.सदस्य सुरेश लोणकर कॉंग्रेसमधुन रा.कॉ.मध्ये आले. त्यांच्यासोबत एक मोठा कार्यकर्ता वर्ग असल्याने राष्ट्रवादीमध्ये त्यांचा दबावगट वाढ़ला. त्यामुळे जिल्हा परिषदेत त्यांची उमेदवारी निश्चित समजल्या जात होती. मात्र त्या मतदार संघात आजवर कार्य करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकोषाध्यक्ष व कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिष भोयर हे या निर्णयामुळे दुखावल्या गेले. उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणुक लढवायचीच असा चंग बांधुन ते आज नामांकन दाखल करणार आहेत. शिवणी मतदार संघासाठीच रा.कॉ.कडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार सदाशीव ठाकरे यांचे पुत्र जितेंद्र ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. ते सुद्धा आज उमेदवारी दाखल करतील. तर सुरेश लोणकरांनी काल मोठे शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. त्यामुळे शिवणी मध्ये उमेदवारी मिळविण्यासाठीच जोरदार रस्सीखेच राहणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी उमेदवारी कायम ठेवली नाही तरी ते पक्षाने निवडलेल्या उमेदवाराला साथ देणे कठीण आहे. ते तटस्थ राहिले तर ठिक मात्र जर त्यांनी पक्षाच्या विरोधात प्रचार केला तर प्रतिस्पर्धी उमेदवाराची वाट मोकळी होणार आहे. नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही पदाधिका-यांनी पक्षविरोधी प्रचार करून प्रभाग २ मध्ये शिवसेनेला खुले सहकार्य केले होते. तसेच प्रभाग १ मध्येही राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांनी आपल्या विजयासाठी सेनेच्या ईतर उमेदवारांना सहकार्य केले. तिच परिस्थिती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसुन येत आहे. पार्डी जि.प.गटात राष्ट्रवादीचे पं.स.सदस्य सहदेव राठोड यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार असा अंदाज बांधल्या जात होता. सहदेव राठोड हे पंचायत समितीत रा.कॉ.चे एकमेव सदस्य असुनही त्यांनी अत्यंत जबाबदारीने विरोधी भुमिका बजावली. एक अभ्यासू व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यास पुढ़े येणारे सदस्य अशी त्यांची ख्याती असल्याने पार्डी गटासाठी त्यांच्या पत्नीला जनसमर्थनही मिळू शकले असते. मात्र तेथे बाजार समितीचे उपसभापती प्रकाश डंभारे यांच्या पत्नीला संधी देण्यात आली. अण्णासाहेब पारवेकरांचा आदेशच सर्वस्व मानणारे असल्यामुळे डंभारे यांना त्याचे फळ मिळाले. सहदेव राठोड यांनीही मोठ्या मनाने पक्षाच्या आदेशाचा सन्मान राखत पार्डी गणातून उमेदवारी घेऊन समाधान मानले. पारवा जि प सर्कलमध्ये मागील निवडणुकीप्रमाणेच कॉंग्रेस अडचणीत सापडली आहे. कॉंग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश नसतानांही केवळ ना.मोघेंच्या कार्यक्रमात हजेरी लावणारे जि.प.सदस्य स्वामी काटपेल्लीवार व यवतमाळचे आमदार निलेश पारवेकर यांचे बंधु योगेश पारवेकर यांच्यात कॉंग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी तुल्यबळ स्पर्धा रंगली आहे. मागील निवडणुकीत निलेश पारवेकरांनी आपले राजकीय वजन वापरून वेळेवर ए.बी. फॉर्म आणल्याने काटपेल्लीवार यांची गोची झाली होती. मात्र ना.मोघेंनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने तेव्हा स्वामी काटपेल्लीवार अवघ्या काही मतांच्या फरकाने निवडून आले होते. रा.कॉ.कडून सुहास पारवेकर व भाजपाकडून रमेश यमसनवार हे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना गटबाजीने ग्रासले असल्याने नेमकी कोणाची काय भुमिका राहणार हे कळायला मार्ग नाही. उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले नेते तटस्थ राहणार, उमेदवारी कायम ठेवणार की, उमेदवारी मागे घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करून ‘कटस्थ’ होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment