तब्बल दोन आठवड्यांपासुन तालुक्यातील किन्ही (वन) जि.प. शाळेवर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला असल्याने उद्या प्रजासत्ताक दिनाला विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीतच ध्वजारोहण होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन शिक्षकांची पदे मंजुर असतांना केवळ एकाच शिक्षकावर कारभार सुरू असल्याने संतप्त पालकांनी १२ जानेवारी पासुन पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. या जि.प.शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग असुन ५० पटसंख्या आहे. येरंडगाव केंद्रांतर्गत येत असलेल्या या शाळेवर तब्बल सात महिन्यांपासुन एकच शिक्षक आहे. पारवा येथिल शाळेवर अतिरिक्त असलेल्या सचिन मांडवगडे या शिक्षकाची किन्ही (वन) शाळेवर १९ डिसेंबरला समुपदेशनाद्वारे बदली करण्यात आली. मात्र पारवा शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे यांनी शिक्षकास कार्यमुक्त केले नाही. ग्रामस्थांनी याबाबत पंचायत समितीकडे तक्रार केल्यावर गटशिक्षणाधिका-यांनी शिक्षकाला कार्यमुक्त करण्याचा आदेश मुख्याध्यापकास दिला. मात्र या आदेशालाही मुख्याध्यापकांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासुन विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार आहे. केवळ किशोर भोयर हे एकमेव शिक्षक विद्यार्थ्यांअभावी शाळेत केवळ येऊन बसतात. प्रस्तुत प्रतिनिधीने किन्ही (वन) शाळेला प्रत्यक्ष भेट दिली असता पालक व विद्यार्थ्यांनी आपल्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुखदेव आत्राम, उपसरपंच राजु कुंभारे, पालक प्रकाश रामटेके व विद्यार्थी प्रतिक उमरे, बाळू जिवने (वर्ग ४ था), सचिन कुंभारे (वर्ग ३ रा) हे म्हणाले की, जोपर्यंत या शाळेवर पुर्णवेळ कायमस्वरूपी शिक्षक देण्यात येणार नाही तोवर बहिष्कार राहणार आहे.
याबाबत गटशिक्षणाधिकारी जुमनाके यांची प्रतिक्रीया घेतली असता आदेशाचे पालन न करणारे मुख्याध्यापक ठाकरे व शिक्षक मांडवगडे यांचेवर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. या निमित्ताने पंचायत समिती शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. सुमारे पंधरा दिवसांपासुन विद्यार्थी शाळेत येत नसल्याने उद्या प्रजासत्ताकदिनी तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत ध्वजारोहणासाठी पाठवणार का ? असा प्रश्न विचारल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती
साभार :- देशोन्नती
किन्ही (वन) येथिल शाळेची बातमी दि.२७ जानेवारीला
ई.टिव्ही. वाहिनीच्या १२.३० वाजताच्या
बातमीपत्रात दाखविण्यात आली.
या बातमीची झलक आपल्यासाठी.
No comments:
Post a Comment