फसवणुकीच्या गोरखधंद्याचे धागेदोरे पाकीस्तानात?
घाटंजी तालुक्यातील युवकाला १५ हजारांनी फसविले
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती
घाटंजी तालुक्यातील युवकाला १५ हजारांनी फसविले
मोबाईलवर आंतरराष्ट्रीय बारा अंकी क्रमांकावरून कॉल येतो, तुम्ही २५ लाख रूपये जिंकणारे भाग्यवान ठरले आहात. तुमचा मोबाईल नंबर लकी ड्रॉ मध्ये निवडल्या गेला आहे. मात्र हे बक्षीस मिळविण्यासाठी तुम्हाला अमुक ईतकी रक्कम आमच्या बँक खात्यात जमा करावी लागेल. रक्कम जमा होताच ती लगेच काढण्यात येते. त्यानंतर त्या मोबाईलवर संपर्क होत नाही किंवा अश्लिल शिवीगाळ केल्या जाते. जास्त मेहनत न करता लाखो रूपयांनी फसवणुक करण्याचा हा गोरखधंदा गेल्या काही दिवसात चांगलाच चर्चेत आला आहे. फसगत झालेले लोक मात्र डोकेदुखी मागे लागू नये म्हणुन तक्रार करण्यास पुढे येत नाहीत
घाटंजी तालुक्यात सध्या अनेकांना असे कॉल येत असुन काही लोक फसवणुकीला बळी सुद्धा पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घाटंजी तालुक्यातील येडशी गावचा एक युवक पैशाच्या लोभापायी तब्बल १५ हजारांनी गंडविल्या गेला आहे. या घटनेची पोलीस तक्रार झाली नसली तरी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. सदर युवकाला मोबाईलवर ९२३०५८७३८५८७ या क्रमांकावरून कॉल आला. त्याचा मोबाईल नंबर लकी ड्रॉ मध्ये निवडल्या गेल्याचे सांगण्यात आले. याविषयी माहितीसाठी १०१००६२७२११० या क्रमांकावर कॉल करा अशी सुचना देण्यात आली. फक्त ठराविक १० जणांनाच प्रत्येकी २५ लाखांचे बक्षीस लागल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र त्यावरील करापोटी १५ हजार रूपये आधी भरावे लागतील अशी अशी अट ठेवण्यात आली. त्यामुळे सदर युवकाने अकोलाबाजार येथिल स्टेट बँकेमधुन त्याला सांगण्यात आलेल्या बँक खात्यात १५ हजार रूपये जमा केले. आपले बक्षीस आता मिळणार या अपेक्षेने त्याने संबंधीत मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याला अश्लिल शिव्या ऐकाव्या लागल्या. आपण फसविल्या गेल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलीस स्टेशनशी संपर्क केला.
येडशी हे गाव घाटंजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याने तक्रार नोंदविणे शक्य नव्हते. त्यामुळे येथिल नायक पोलीस कॉन्स्टेबल उमेश चंदन यांनी सदर युवकाची अडचण समजुन घेतली. ज्या खात्यावर युवकाने पैसे जमा केले ते खाते कुठले आहे याची चौकशी करण्यास ते युवकासोबत स्टेट बँकेच्या घाटंजी शाखेत गेले.
तिथे त्या बँक खात्याची चौकशी केली असता ते आंध्रप्रदेशातील एका शहरातील असल्याचे निदर्शनास आले. शिवाय त्या खात्यात टाकण्यात आलेले पैसे तिरूपती येथिल एका एटीएम मधुन काढ़ण्यात आल्याची माहिती पुढ़े आली. त्यामुळे चंदन यांनी सदर युवकाला संबंधीत पोलीस स्टेशनला तक्रार करण्यास सांगीतले. मात्र अद्याप त्या युवकाने तक्रार केली नाही. बारा अंकी मोबाईलवरून फोन येत असल्याने ही आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच आंध्रप्रदेशासह लगतच्या राज्यात या टोळीचे जाळे पसरले असल्याची शक्यता आहे. +९२ हा आय.एस.डी. कोड पाकीस्तानचा आहे. त्यामुळे हे रॅकेट पाकीस्तानमधुन तर चालविल्या जात नाही ना असा संशय व्यक्त केल्या जात आहे. ‘फेक लॉटरी’ च्या माध्यमातुन लाखो रूपयांनी गंडविण्याचा प्रकार नुकताच दिल्ली येथे उघडकीस आल्याची बाब प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चेत आली आहे. तिथे चौकशी दरम्यान हे फसवणुक करणारे रॅकेट पाकीस्तानातुन चालविल्या जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुढे आला आहे. या पृष्ठभुमीवर घाटंजी तालुक्यासह विदर्भात घडत असलेल्या घटनांना गंभिरतेने घेण्याची गरज असुन नागरीकांनीही अशा फसव्या कॉल पासुन सावध राहणे आवश्यक आहे.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment