Pages

Showing posts with label मोबाईल. Show all posts
Showing posts with label मोबाईल. Show all posts

Thursday, 22 November 2012

टिपेश्वर अभयारण्यात शिजले ‘गुप्तधन’ प्रकरण ?

त्या कथित पुजेने वाढले गुढ

नवरात्राच्या काळात घाटंजी तालुक्यालगत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात काही लोक विशिष्ट प्रकारची पुजा करण्यासाठी गेले होते. सलग आठ ते दहा दिवस ही पुजा चालली अशी माहिती नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत असुन त्यामुळे गुप्तधन प्रकरणाचा ‘कट’ टिपेश्वर अभयारण्यात तर शिजला नाही ना ? अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. या कथित पुजेमध्ये घाटंजी तालुक्यातील सुमारे दहा ते बारा लोक सहभागी झाले होते, त्यामध्ये काही व्यावसायीक व शासकीय कर्मचारी सुद्धा होते अशी माहिती आहे. वन्यप्राण्यांनी व्यापलेल्या अभयारण्यामध्ये नेमकी कोणती ‘पुजा’ झाली याबाबत सर्वत्र चर्चेला पेव फुटले आहे. या पुजेत सहभागी झालेल्यांना एक ‘गुरूजी’ मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण देत होता. या कालावधीत पुजेमध्ये सहभागी झालेले लोक केवळ फलाहार घ्यायचे. हे सर्व साहित्य त्यांना घाटंजी येथुन पाठविण्यात येत होते. त्यांनी राहण्यासाठी राहुट्या उभारल्या होत्या. अष्टमीच्या दिवशी ही कथित पुजा संपली अशी माहिती आहे. योगायोगाने दस-याच्या दिवशी म्हणजेच ‘दशमी’ला चोरांबा येथिल सपना पळसकर ही मुलगी बेपत्ता झाली. तर ‘पंचमी’च्या पुर्वरात्रीला गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेली हो टोळी ग्रामस्थांच्या हाती लागली. हा केवळ योगायोग आहे की एका गंभिर कटाचा भाग याचा पोलीसांनी शोध घेण्याची गरज आहे. ग्रामस्थ व फिर्यादी विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे सदर घटनेत दहा पेक्षा जास्त लोक सहभागी होते. पोलीसांनी अद्याप केवळ चार आरोपींना अटक केली आहे. टिपेश्वर अभयारण्यामध्ये झालेल्या त्या कथित पुजेबाबत पोलीसांनी योग्य चौकशी केली तर या प्रकरणात एक मोठा सुगावा हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अटकेत असलेले काही आरोपी नवरात्राच्या काळात कुठे होते याचे मोबाईल च्या माध्यमातून ‘लोकेशन’ घेतल्यास या चर्चेमध्ये काही सत्यता आहे की नाही हे स्पष्ट होईल. या दरम्यान त्यांना कोण कोण भेटण्यास येत होते? ते कुठे कुठे गेले? याबाबतही पोलीसांनी तपास करण्याची गरज आहे. तसेच आरोपी व संबंधीतांच्या मोबाईल ‘कॉल डिटेल्स’ वरून या प्रकरणी पोलीसांना तपासाची दिशा मिळु शकते. मात्र पोलीस त्या मानसिकतेत असल्याचे दिसत नाहीत. गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा झालेला प्रयत्न, सुमारे विस दिवसांपासुन बेपत्ता असलेली चिमुकली व टिपेश्वरच्या अभयारण्यात झालेली कथित पुजा या तिन्ही घटनांचे एकमेकांशी साधम्र्य असल्याचे दिसत आहे. पोलीसांनी या दृष्टीने तपासाची चक्रे फिरविल्यास यातील नेमके तथ्य बाहेर येऊ शकते असा कयास वर्तविल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती 

अमोल राऊत

Thursday, 16 February 2012

‘मोबाईल फसवेगिरी’ अजुनही सुरूच

आणखी एका ईसमाला १५ हजारांनी गंडविले
पोलीस यंत्रणेला तक्रारीची वाट

मोबाईलवर कॉल करून लॉटरी व तत्सम बक्षिसांचे आमिष दाखवुन हजारो रूपयांनी गंडा घालण्याचा प्रकार अजुनही सुरूच आहे. प्रशांत कुंभारे नामक ईसम या आमिषाला बळी पडल्याने तब्बल १५ हजार रूपयांनी फसविल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यापुर्वी देशोन्नती ने ‘मोबाईलवर कॉल करून गंडविणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रीय’ या बातमी मधुन हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर काही मोबाईल  कंपन्यांनी अशा कॉल पासुन सावध राहण्याबाबत ग्राहकांना एस.एम.एस.द्वारे सुचनाही दिल्या होत्या. मात्र पोलीस यंत्रणेने ही बाब अद्यापही गंभिरतेने न घेतल्यामुळे फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. याबाबत विस्तृत माहिती अशी की, प्रशांत मुकींदा कुंभारे रा. हिरापूर जि.वर्धा यांना त्यांचा भ्रमणध्वनी क्रं.९७६७२९२७३१ यावर ९२३४४४८३१३०८ या क्रमांकावरून कॉल आला. तुम्हाला १० लाख रूपयांची लॉटरी लागली आहे. मात्र त्यासाठी बँक खाते क्रं.३०११७१०२८९४ यामध्ये १५ हजार २०० रूपये टाका असे सांगण्यात आले. त्यावेळी कुंभारे हे यवतमाळ तालुक्यातील त्यांची सासुरवाडी जवळा ईजारा येथे आले होते. त्यांनी कॉलवर विश्वास ठेवून अकोलाबाजार स्टेट बँकेत संबंधीत खात्यावर पैसे जमा केले. त्यानंतर ११ फेब्रुवारीला त्यांना ००९२३४१६९०८६७३ या क्रमांकावरून पुन्हा कॉल आला. आणखी २४ हजार रूपये खाते क्रं.१०८८७५९८११९ (खातेधारक - प्रदिपकुमार) किंवा ०७१००१५०१९५१ (खातेधारक - झिया उल हक सिद्धीकी) या खात्यामध्ये पैसे भरण्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र कुंभारे यांना शंका आल्याने त्यांनी पैसे भरले नाहीत. १३ फेब्रुवारीला त्यांना पुन्हा कॉल आला व किमान ६ हजार रूपये तरी खात्यात भरावे लागतील अन्यथा १० लाखांची रक्कम अनाथालयाला जाईल असे सांगण्यात आले. फोनवर बोलणा-या व्यक्तीने आपण कंपनीचे डी.एम.असल्याचे सांगीतले. आपण फसविल्या गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रक्कम भरली नाही. 
कुंभारे यांनी ज्या खात्यात पैसे जमा केले ते खाते अमितसिंग चंद्राकेस सिंग विला रा. इंद्रानगर गोरखपुर या व्यक्तीचे असल्याचे बँकेत चौकशी केली असता निदर्शनास आले. वृत्त लिहिस्तोवर घटनेची तक्रार करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे आज दुपारी १ वाजुन १२ मिनीटांनी नरेंद्र ढवळे रा.दहेगाव यांना ९१९१९९१७७१८३ या क्रमांकावरून कॉल आला. अडीच लाख रूपयांचे बक्षिस लागल्याचे त्यांना सांगीतल्या गेले. बक्षिसाची रक्कम १० मिनीटातच तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येईल असेही संबंधीताने त्यांना सांगीतले. मात्र त्यासाठी कमलेश कुमार नामक व्यक्तीच्या खाते क्रं. ३१९५१७४३८०७ यावर २ हजार ६०० रूपये भरा अशी अट ठेवण्यात आली. ढवळे यांनी ‘देशोन्नती’ मध्ये याबाबतचे वृत्त वाचलेले असल्याने हे गौडबंगाल असल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यामुळे त्यांनी पैसे भरले नाहीत. शिवाय या प्रकाराची पोलीसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.
गेल्या काही महिन्यांपासुन अशा ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र पोलीस यंत्रणा याकडे कोणाचीही तक्रार नसल्याने सपशेल दुर्लक्ष करीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल येत असल्याने भारतालगत असलेल्या देशांमधुन असे रॅकेट चालविल्या जात असल्याच्या संशय व्यक्त होत असुन यंत्रणेने आपल्या स्तरावर या रॅकेटचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे. 
साभार :- देशोन्नती 

Monday, 23 January 2012

विद्यार्थिनींनी परत केला महागडा मोबाईल

प्रामाणिकपणाबद्दल शाळेत कौतुक
आजच्या काळात बहुतांश लोक फक्त आपल्यापुरताच विचार करतात. आपला फायदा दिसत असताना कुणाला एखाद्याच्या नुकसानाची पर्वा नसते. महागड्या मोबाईलचे तर आजच्या काळात चांगलेच फॅड निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणालाही मोबाईल हवाहवासा वाटतो. त्यामुळे कधी मोबाईल हरविला तर तो आपला नव्हेच म्हणुन सोडून द्यावा लागतो. मात्र घाटंजी येथे दोन विद्यार्थिनींनी त्यांना सापडलेला मोबाईल संबंधीत व्यक्तीपर्यंत पोहचवुन प्रामाणिकपणाचे एक अनुकरणीय उदाहरण सामाजापुढे ठेवले आहे. विधी भगवान सरदार व काजल अशोक मंत्रीवार या येथिल नगर परिषद शाळा क्र.५ मध्ये सहाव्या वर्गात शिकणा-या विद्यार्थीनी पहाटे नेहमीप्रमाणे शाळेकडे येत असतांना त्यांना रस्त्यात एक महागडा मोबाईल पडलेला दिसला. मोबाईल खाली पडल्याने बंद झाला होता. त्यामुळे त्यांनी तो बॅगमध्ये ठेवला. घरी गेल्यावर त्यांनी मोबाईल सुरू करून त्यावर कुणाचा कॉल येईस्तोवर वाट पाहिली. कॉल येताच त्यांनी हा मोबाईल आम्हाला सापडला आहे. तो कुणाचा आहे सांगा अशी विचारणा केली. तसेच मोबाईल संबंधीत व्यक्तीला परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल नगर परिषद शाळेत त्यांचे कौतुक करण्यात आले. नगर परिषद शाळेचे शिक्षक कवेशकुमार कांबळे, रूपेश कावलकर, तुषार बोबडे, गजानन बंडीवार, चंद्रशेखर हळबेश्वर, हिरेश्वर यन्नरवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी इंग्रजी शब्द पाठांतर चाचणीत उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल अफशा महेवश सैय्यद, प्रितम हेमके, धवल कडू या विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले. विधी सरदार या विद्यार्थीनीने यापुर्वी शाळेच्या एका कार्यक्रमात सर्वानाच चकीत केले होते. खासदार भावना गवळी या कार्यक्रमात आल्या असता तिने थेट त्यांच्याकडे जाऊन आमच्या शाळेत येण्यासाठी चांगला रस्ता नाही. त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी रस्ता द्या अशी मागणी विधीने करून खुद्द खासदारांनाही अचंभित केले होते हे विशेष.
साभार :- देशोन्नती

Thursday, 19 January 2012

सावधान....! मोबाईलवर कॉल करून गंडविणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रीय

फसवणुकीच्या गोरखधंद्याचे धागेदोरे पाकीस्तानात?
घाटंजी तालुक्यातील युवकाला १५ हजारांनी फसविले
मोबाईलवर आंतरराष्ट्रीय बारा अंकी क्रमांकावरून कॉल येतो, तुम्ही २५ लाख रूपये जिंकणारे भाग्यवान ठरले आहात. तुमचा मोबाईल नंबर लकी ड्रॉ मध्ये निवडल्या गेला आहे. मात्र हे बक्षीस मिळविण्यासाठी तुम्हाला अमुक ईतकी रक्कम आमच्या बँक खात्यात जमा करावी लागेल. रक्कम जमा होताच ती लगेच काढण्यात येते. त्यानंतर त्या मोबाईलवर संपर्क  होत नाही किंवा अश्लिल शिवीगाळ केल्या जाते. जास्त मेहनत न करता लाखो रूपयांनी फसवणुक करण्याचा हा गोरखधंदा गेल्या काही दिवसात चांगलाच चर्चेत आला आहे. फसगत झालेले लोक मात्र डोकेदुखी मागे लागू नये म्हणुन तक्रार करण्यास पुढे येत नाहीत
घाटंजी तालुक्यात सध्या अनेकांना असे कॉल येत असुन काही लोक फसवणुकीला बळी सुद्धा पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घाटंजी तालुक्यातील येडशी गावचा एक युवक पैशाच्या लोभापायी तब्बल १५ हजारांनी गंडविल्या गेला आहे. या घटनेची पोलीस तक्रार झाली नसली तरी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. सदर युवकाला मोबाईलवर ९२३०५८७३८५८७ या क्रमांकावरून कॉल आला. त्याचा मोबाईल नंबर लकी ड्रॉ मध्ये निवडल्या गेल्याचे सांगण्यात आले. याविषयी माहितीसाठी १०१००६२७२११० या क्रमांकावर कॉल करा अशी सुचना देण्यात आली. फक्त ठराविक १० जणांनाच प्रत्येकी २५ लाखांचे बक्षीस लागल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र त्यावरील करापोटी १५ हजार रूपये आधी भरावे लागतील अशी अशी अट ठेवण्यात आली. त्यामुळे सदर युवकाने अकोलाबाजार येथिल स्टेट बँकेमधुन त्याला सांगण्यात आलेल्या बँक खात्यात १५ हजार रूपये जमा केले. आपले बक्षीस आता मिळणार या अपेक्षेने त्याने संबंधीत मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याला अश्लिल शिव्या ऐकाव्या लागल्या. आपण फसविल्या गेल्याचे लक्षात आल्यावर त्याने पोलीस स्टेशनशी संपर्क केला.
येडशी हे गाव घाटंजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याने तक्रार नोंदविणे शक्य नव्हते. त्यामुळे येथिल नायक पोलीस कॉन्स्टेबल उमेश चंदन यांनी सदर युवकाची अडचण समजुन घेतली. ज्या खात्यावर युवकाने पैसे जमा केले ते खाते कुठले आहे याची चौकशी करण्यास ते युवकासोबत स्टेट बँकेच्या घाटंजी शाखेत गेले.
तिथे त्या बँक खात्याची चौकशी केली असता ते आंध्रप्रदेशातील एका शहरातील असल्याचे निदर्शनास आले. शिवाय त्या खात्यात टाकण्यात आलेले पैसे तिरूपती येथिल एका एटीएम मधुन काढ़ण्यात आल्याची माहिती पुढ़े आली. त्यामुळे चंदन यांनी सदर युवकाला संबंधीत पोलीस स्टेशनला तक्रार करण्यास सांगीतले. मात्र अद्याप त्या युवकाने तक्रार केली नाही. बारा अंकी मोबाईलवरून फोन येत असल्याने ही आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच आंध्रप्रदेशासह लगतच्या राज्यात या टोळीचे जाळे पसरले असल्याची शक्यता आहे. +९२ हा आय.एस.डी. कोड पाकीस्तानचा आहे. त्यामुळे हे रॅकेट  पाकीस्तानमधुन तर चालविल्या जात नाही ना असा संशय व्यक्त केल्या जात आहे. ‘फेक  लॉटरी’ च्या माध्यमातुन लाखो रूपयांनी गंडविण्याचा प्रकार नुकताच दिल्ली येथे उघडकीस आल्याची बाब प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चेत आली आहे. तिथे चौकशी दरम्यान हे फसवणुक करणारे रॅकेट पाकीस्तानातुन चालविल्या जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुढे आला आहे. या पृष्ठभुमीवर घाटंजी तालुक्यासह विदर्भात घडत असलेल्या घटनांना गंभिरतेने घेण्याची गरज असुन नागरीकांनीही अशा फसव्या कॉल पासुन सावध राहणे आवश्यक आहे.


अमोल राऊत
साभार :- देशोन्नती