त्या कथित पुजेने वाढले गुढ
नवरात्राच्या काळात घाटंजी तालुक्यालगत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात काही लोक विशिष्ट प्रकारची पुजा करण्यासाठी गेले होते. सलग आठ ते दहा दिवस ही पुजा चालली अशी माहिती नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत असुन त्यामुळे गुप्तधन प्रकरणाचा ‘कट’ टिपेश्वर अभयारण्यात तर शिजला नाही ना ? अशी शंका व्यक्त केल्या जात आहे. या कथित पुजेमध्ये घाटंजी तालुक्यातील सुमारे दहा ते बारा लोक सहभागी झाले होते, त्यामध्ये काही व्यावसायीक व शासकीय कर्मचारी सुद्धा होते अशी माहिती आहे. वन्यप्राण्यांनी व्यापलेल्या अभयारण्यामध्ये नेमकी कोणती ‘पुजा’ झाली याबाबत सर्वत्र चर्चेला पेव फुटले आहे. या पुजेत सहभागी झालेल्यांना एक ‘गुरूजी’ मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण देत होता. या कालावधीत पुजेमध्ये सहभागी झालेले लोक केवळ फलाहार घ्यायचे. हे सर्व साहित्य त्यांना घाटंजी येथुन पाठविण्यात येत होते. त्यांनी राहण्यासाठी राहुट्या उभारल्या होत्या. अष्टमीच्या दिवशी ही कथित पुजा संपली अशी माहिती आहे. योगायोगाने दस-याच्या दिवशी म्हणजेच ‘दशमी’ला चोरांबा येथिल सपना पळसकर ही मुलगी बेपत्ता झाली. तर ‘पंचमी’च्या पुर्वरात्रीला गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेली हो टोळी ग्रामस्थांच्या हाती लागली. हा केवळ योगायोग आहे की एका गंभिर कटाचा भाग याचा पोलीसांनी शोध घेण्याची गरज आहे. ग्रामस्थ व फिर्यादी विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे सदर घटनेत दहा पेक्षा जास्त लोक सहभागी होते. पोलीसांनी अद्याप केवळ चार आरोपींना अटक केली आहे. टिपेश्वर अभयारण्यामध्ये झालेल्या त्या कथित पुजेबाबत पोलीसांनी योग्य चौकशी केली तर या प्रकरणात एक मोठा सुगावा हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अटकेत असलेले काही आरोपी नवरात्राच्या काळात कुठे होते याचे मोबाईल च्या माध्यमातून ‘लोकेशन’ घेतल्यास या चर्चेमध्ये काही सत्यता आहे की नाही हे स्पष्ट होईल. या दरम्यान त्यांना कोण कोण भेटण्यास येत होते? ते कुठे कुठे गेले? याबाबतही पोलीसांनी तपास करण्याची गरज आहे. तसेच आरोपी व संबंधीतांच्या मोबाईल ‘कॉल डिटेल्स’ वरून या प्रकरणी पोलीसांना तपासाची दिशा मिळु शकते. मात्र पोलीस त्या मानसिकतेत असल्याचे दिसत नाहीत. गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा झालेला प्रयत्न, सुमारे विस दिवसांपासुन बेपत्ता असलेली चिमुकली व टिपेश्वरच्या अभयारण्यात झालेली कथित पुजा या तिन्ही घटनांचे एकमेकांशी साधम्र्य असल्याचे दिसत आहे. पोलीसांनी या दृष्टीने तपासाची चक्रे फिरविल्यास यातील नेमके तथ्य बाहेर येऊ शकते असा कयास वर्तविल्या जात आहे.
साभार :- देशोन्नती
साभार :- देशोन्नती
देशोन्नती विशेष
अमोल राऊत
No comments:
Post a Comment