घाटंजी तालुक्यातील मुर्ली तांड्यावरील घटना
गावक-यांकडून टोळीतील सदस्यांना चोप
‘त्या’ अज्ञात चिमुकलीचा जीव धोक्यातच
राजकीय दबावातून पोलीसांचे आरोपींना ‘अभय’
पैशाच्या लालसेने निष्ठुर झालेल्यांनी गुप्तधन मिळविण्यासाठी एका चिमुकल्या मुलीचा बळी देण्याचा केलेला प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने हाणून पडला. दि.१७ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही मन विषन्न करणारी घटना घडली. मात्र टोळीतील सदस्य त्या अज्ञात मुलीला घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घाटंजी लगत असलेल्या मुर्ली तांड्याजवळील एकहात्या मारोती मंदिरापुढे सुमारे ६ ते ८ लोक संशयास्पद स्थितीत वावरत असल्याचे त्या भागात शौचास गेलेल्या विजय चव्हाण नामक युवकास दिसले. त्यातच लहान मुलाच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने त्याचा संशय बळावला. त्याने लगेच तांड्यावरील नातेवाईकांना भ्रमणध्वनी करून बोलावुन घेतले. अवघ्या काही वेळातच २० ते २५ लोक तेथे आले. लोकांचा जमाव येत असल्याचे दिसताच त्या टोळीतील सदस्यांची पळापळ सुरू झाली.
त्यातील एकाने त्या लहान मुलीला घेऊन पळ काढला. त्या भागात अंधार असल्यामुळे तो पळुन जाण्यात यशस्वी झाला. या दरम्यान टोळीतील तिन सदस्य ग्रामस्थांच्या हाती लागले. घटनास्थळावरील प्रकार पाहुन संतापलेल्या नागरिकांनी त्यांना येथेच्च झोडपून काढले. त्यानंतर पोलीसांना सुचना देण्यात आली. पोलीस येईपर्यंत तिन आरोपींपैकी एकजण निसटण्यात यशस्वी झाला. दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले.
अशोक दर्शनवार (३६) रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार (५२) रा.बेलोरा ता.घाटंजी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ताकसांडे नामक दोन ईसम व ईतर अज्ञात आरोपी फरार आहेत. मात्र अटक केलेल्या आरोपींवर केवळ गावातील शांतता भंग केल्या बद्दल प्रतिबंधात्मक कार्यवाही करून रात्रीच जामिनावर मुक्तता करण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळावरून एम.एच. २९ क्यु.१९७७ व ए.पी.१० ए.टी.५१६४ क्रमांकाच्या दोन दुचाकी, कुदळ, फावडे, हळदीने माखलेला दगड, लिंबु, दोरी जप्त केले. मात्र ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे सुरा, पुजेचे ताट व हातमोजे पोलीस पंचनाम्यात आढळले नाहीत हे विषेश.
या घटनेत ताब्यात घेतलेले आरोपी मंदिरात हनुमान चालीसा वाचण्यासाठी आले होते असे आता पोलीस सांगत आहेत. मात्र नजरेसमोर अघोरी पुजा सुरू असताना हे दोन आरोपी खरंच हनुमान चालीसा वाचत होते काय? त्यांना त्या चिमुकल्या जीवाची किंकाळी ऐकु आली नाही का? घटनास्थळावरील परिस्थिती व आरोपींचे बयाण यामध्ये पोलीसाना संशय का आला नाही? जर आरोपी फक्त हनुमान चालीसा वाचण्यासाठी आले होते तर त्यांनी ग्रामस्थांना पोलीस तक्रार न करण्यासाठी १ लाख रूपये का देऊ केले? एरवी क्षुल्लक माहितीवरून घटनेचा तपास लावणा-या पोलीसांना एवढी गंभिर परिस्थिती डोळ्यापुढे दिसतांना गुन्हा दाखल करून गांभिर्याने तपास करण्याचीही गरज वाटू नये ही बाब संशयास्पद आहे. घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी, आरोपी, फिर्यादी व संबंधीतांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासल्यास या प्रकरणात नेमके कोण कोण गुंतले आहेत ? पोलीस कोणाच्या दबावात काम करीत आहेत ? याचा सहज उलगडा होऊ शकतो. घाटंजी पोलीस सदर घटनेत आरोपींना थेट पाठीशी घालत असल्याने वरिष्ठानीच या प्रकरणी तपास करावा अशी मागणी होत आहे. या घटनेतील ती अज्ञात मुलगी अद्यापही या टोळीतील सदस्यांच्याच ताब्यात असल्याची भिती आहे. उल्लेखनिय म्हणजे तालुक्यातील चोरांबा येथिल सपना गोपाल पळसकर ही सात वर्षाची मुलगी दस-याच्या दिवसांपासुन बेपत्ता आहे. त्यामुळे या घटनेतील मुलगी तिच तर नाही ना अशीही भिती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनी या प्रकरणात सुद्धा अद्याप योग्य तपास केलेला नाही. तालुक्यातील काही राजकीय धेंड या प्रकरणी आपल्या हस्तकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने घाटंजी पोलीसांकडून नि:पक्ष तपास होईल याबाबत साशंकता आहे.
साभार :- देशोन्नती
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment