Pages

Thursday, 29 November 2012

गरिबाच्या लेकराले किंमत नसते काय?

‘सपना’च्या आईचा जळजळीत सवाल

‘कोण्या मोठ्या लोकायचं लेकरू कोनी नेलं असतं... तं सारेच्या सारे कामाले लागले असते. पन आता कोनालेच कायी घेनदेन नाई... गरिबाच्या लेकराची किंमतच नसते का? त्यायचा जीव गेला तरी दुनियेले काही फरक पडत नाही...’ चिंतातूर चेह-यावर ओघळणारे अश्रू पुसत चोरांब्याची शारदाबाई बोलत होती. तब्बल एक महिन्यापासुन बेपत्ता असलेल्या सपनाची ती आई. दिवसभर मजुरी केली तरच जेवणाची सोय होईल अशी बिकट परिस्थिती. मुलीच्या शोधासाठी वणवण भटकण्याची वेळ आल्याने खायचे काय? असा प्रश्न पुढे असुनही दोन मुलांना कडेवर घेऊन सपनाचे आई वडील तिचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र सुरूवातीपासुनच पोलीस प्रशासनाच्या असंवेदनशिल व्यवहारामुळे ते हतबल झालेत. गोपाल व सौ.शारदा पळसकर हे दाम्पत्य घाटंजीलगत असलेल्या चोरांबा येथे कोलामपोडावर राहतात. त्यांना तिन अपत्य. सात वर्षांची सपना सर्वात मोठी त्यापाठोपाठ अपर्णा (३ वर्ष) व मंगल केवळ एक वर्षाचा. विजयादशमीचा तो सोन्यासारखा दिवस. या दिवशीच ‘सोन्यासारखी’ लेक बेपत्ता झाली ते पळसकर दाम्पत्याला कळलं सुद्धा नाही. कारण गावातच शारदाबाईचे माहेर. सपना कधी कधी आजीकडेच राहायची. त्यामुळे दस-याच्या दिवशी ती बेपत्ता झाल्याचे कुणाच्या लक्षातही आले नाही. सकाळी ती आजीकडेही नसल्याने तिची गावभर शोधाशोध सुरू झाली. आजुबाजूच्या जंगलातही सर्वांनी मिळून शोध घेतला. नातेवाईकांकडे विचारणा झाली. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर २५ ऑक्टोबरला पळसकर दाम्पत्याने पोलीस स्टेशन गाठले. पण सुरूवातीला तक्रार घेण्यासच टाळाटाळ करण्यात आली. आधी तुम्ही शोध घ्या... आम्ही देखिल प्रयत्न करतो... तक्रार करू नका. असे गोड बोलुन त्यांची बोळवण करण्यात येत होती.
जेव्हा तिच्या पालकांनी तक्रारीचा आग्रह धरला तेव्हा त्यांना धाकदपट करण्यात आली. तेव्हाही ते न जुमानल्याने अखेर बेपत्ता असल्याची नोंद घेऊन पोलीसांनी कागदी सोपस्कार केले. पण तक्रारीची पोच देण्यास चक्क नकार देण्यात आला. महिनाभर जिकडेतिकडे भटकत असलेल्या पळसकर दाम्पत्याच्या कानावर जेव्हा मुरली येथिल घटना पडली तेव्हा त्वरीत त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. आपली सपना तिच तर नसेल ना या भितीने त्या मायमाऊलीच्या काळजाची काय अवस्था झाली असेल ते अकल्पनीयच. 
पोलीस मात्र ती सपना असेल असा संशय व्यक्त करून तपास करण्याच्या मानसिकतेत नसल्याने मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने पळसकर दाम्पत्याने थेट ‘एस.पी.’ साहेबांना गाठले. पण ते तर गुप्तधनासाठी प्रयत्न करणे हा गुन्हा नव्हे, घटनास्थळी मुलगी असणे शक्यच नाही, ती तुमचीच मुलगी असेल हे कसे म्हणायचे? असे प्रतिप्रश्न करायला लागल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. साहेबांनाही आमच्यावर विश्वास बसला नाही असे निराश चेह-याने शारदाबाईने सांगितले. 
घाटंजी पोलीसांविषयी कोलामपोडावर प्रचंड संताप असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. ‘ठाणेदारानं डब्बे भरून घेतले म्हनुनच त्यायचे हात बांधुन असंन’ अशा शब्दात ग्रा.पं.सदस्य यशोदा मेश्राम यांनी पोलीस तपासावर आपली नाराजी व्यक्त केली. गावात यापुर्वी अशी घटनाच घडली नसल्याचे गावकरी सांगतात. सात वर्षांची मुलगी जाणार तरी कुठे? अन ते ही या छोट्याशा गावातून? शंकेला नक्कीच वाव आहे. पण हे पोलीसांना कोण सांगणार? ते केवळ या प्रकरणात आपण सुरक्षीत राहावे यासाठी कागदी घोडे नाचविण्यातच व्यस्त आहेत तर निवडणुकीच्या वेळी मिरवणारे राजकारणी आपल्या ‘सग्या सोय-यांना’ वाचविण्याच्या प्रयत्नात हे प्रकरणच दडपण्यासाठी निघालेत. मन सुन्न करणा-या या बिकट परिस्थितीत एक चिमुकला निष्पाप जीव मात्र कुठे असेल याच प्रश्नाने संवेदनशिल माणसाच्या मनाचा ठाव घेतलाय.
अमोल राऊत
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment