श्वानपथकही घुटमळले
तपास अद्याप जैसे थे
मुख्य सुत्रधार मोकळेच
गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या गंभिर प्रकरणात अखेर काल (दि.२०) ला रात्री घाटंजी पोलीसांनी चार आरोपींविरूद गुन्हा दाखल करून अटक केली.
अशोक गंगाराम दर्शनवार रा.घाटंजी, लक्ष्मण सिताराम एंबडवार रा.बेलोरा, राजेश उर्फ राजु पांडूरंग ताकसांडे, अरूण हरिभाऊ ताकसांडे दोघेही रा.मुरली यांचेविरूद्ध अप.क्र.९५/१२ कलम ३६३, ३६४, ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आज दुपारी यवतमाळ येथुन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पोलीसांना या प्रकरणात तपासाची दिशा गवसली नाही की, त्यांना तपासच करायचा नाही याबाबत संभ्रम अजुनही कायम आहे. चार आरोपी अटकेत आहेत. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे घटनेत दहा ते बारा आरोपी होते. मात्र ते कोण होते याची अटकेत असलेल्या आरोपींकडून माहिती घेतल्याचे दिसत नाही. त्यातही पोलीसांना आरोपीची केवळ एकाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. एक मुलगी बेपत्ता असल्याचा संशय असतांना चार दिवसात पोलीसांनी ज्या आरोपींकडून एक शब्दही वदवून घेतला नाही ते एका दिवसात काय सांगणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यावर पोलीस या तपासात कोणता ‘उजेड’ पाडणार हे स्पष्ट आहे. घटनेपासुन काही लोक पोलीस स्टेशनच्या आवारात घाबरलेल्या अवस्थेत घुटमळताना दिसत आहेत. जमानत घेण्याची हमी देऊन आरोपींना घरून आणताहेत. ते नेमके कशासाठी? या प्रकरणात त्यांना एवढा जिव्हाळा का निर्माण झाला याबाबत चर्चेला ऊत आले आहे. या घटनेतील मुख्य आरोपी कोणी वेगळेच असल्याचा संशय असुन पकडल्या गेलेल्या आरोपींनी त्यांची नावे घेऊ नयेत याची ‘खबरदारी’ पोलीसांकडून घेतल्या जात असल्याची खासगीत चर्चा आहे. ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे गुप्तधन शोधणा-या या टोळीच्या ताब्यात जर खरंच कोणी मुलगी असेल तर तिचा जीव अद्यापही धोक्यात आहे. मात्र ती मुलगी कोठे आहे याबाबत पोलीसांनी आरोपींना किमान विचारणा तरी केली असेल की नाही ही सुद्धा शंकाच आहे. समाजमन ढवळून टाकणा-या या घटनेवर पोलीसांच्या ‘नॉर्मल’ भुमिकेबद्दल संतापाचे वातावरण आहे. या संपुर्ण प्रकारावर सामाजीक संघटना, आदिवासी संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र पुढे आल्याचे दिसले नाही.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment