Pages

Sunday, 11 November 2012

लाखोंचे आमिष अन मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल फसवेगिरी सुरू

फसवणुकीच्या तक्रारींना पोलीस दरबारी किंमत नाही

लाघवी भाषा, अधिकृतपणाचा आव आणी प्रामुख्याने ग्रामिण भागातील नागरीकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल च्या माध्यमातून फसवणुक करण्याचा ऑनलाईन गोरखधंदा सध्या तेजीत आहे. बनावट नावाने बँक खाते उघडून आधुनिक प्रणालींचा उपयोग करून चालणारा बिनभांडवली व कोणतीही जोखीम नसलेला हा अवैध व्यवसाय चांगलाच पसरत चाललाय. एकट्या घाटंजी तालुक्यातूनच गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत आमिषाला बळी पडलेल्या लोकांची लाखो रूपयांनी फसवणुक झाली आहे. आपली फसगत झाल्याने लोकलाजेखातर अनेकजण तक्रारीसाठी पुढेच येत नाहीत. अन जे कोणी हिंमत दाखवून पुढे येतात व पोलीसांकडे फिर्याद नोंदविण्यासाठी जातात त्यांना पोलीसांकडून अक्षरश: धुडकावून लावण्यात येते. स्थानिक पोलीसांना अशा प्रकरणांचा तपास करणे खरंच कठिण आहे. मात्र तरी स्थानीक पोलीसांनी किमान फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सायबर गुन्हे शाखांकडे देणे श्रेयस्कर ठरेल.  मात्र पोलीसांनी या गंभिर प्रकाराकडे असेच दुर्लक्ष केले तर फसवणुक करणारे हे रॅकेट आणखी बळकट होत जातील. घाटंजी तालुक्यातील झटाळा येथिल एका युवकाला नुकताच या रॅकेटने दहा हजारांनी गंडा घातला आहे. सदर युवकाला त्याच्या मोबाईल नंबरवर ९२३०४५२८३०४ या क्रमांकावरून कॉल आला. आयडीया कंपनीकडून काढ़ण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाला २५ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र त्यासाठी प्रोसेसिंग फिच्या स्वरूपात १६ हजार रूपयांची रक्कम स्टेट बँकेच्या ३२१०६७८१६०१ या खात्यात जमा करावे लागतील अशी अट ठेवण्यात आली. मात्र सदर युवकाने त्यांना आपल्याकडे सध्या केवळ १० हजार रूपयेच असल्याचे सांगितल्यावर निदान तेवढी रक्कम तरी भरा असे त्याला सांगण्यात आले. रक्कम खात्यात जमा करताच ती त्वरीत काढण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी परत त्याला दुस-या एका क्रमांकावरून कॉल आला. व पुन्हा त्या खात्यात १० हजार रूपये भरा व या ईमेल वर तुमची कागदपत्रे पाठवा एका तासात हे न केल्यास ही २५ लाखांची लॉटरी दुस-या क्रमांकाला देण्यात येईल अशी भिती त्या युवकाला दाखविण्यात आली. 
यावेळी मात्र सदर युवकाने काही मित्रांकडे याविषयी  विचारणा केली असता हा संपुर्ण फसवणुकीचा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने या प्रकाराची लेखी तक्रार करण्यास घाटंजी पोलीस स्टेशन गाठले. मात्र येथिल ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी त्या युवकाची तक्रार समजुन घेण्या ऐवजी, ‘तुम्ही अशी फाल्तुची कामे करताच कशाला? आम्ही यामध्ये काय करणार? निघा येथुन लवकर.’ अशी मुक्ताफळे उधळून तक्रारकर्त्यास तक्रारीची पोच पावती न देताच पिटाळून लावले. अनेक गंभिर घटनांची तक्रार करण्यास गेलेल्यांना त्यांच्या कायद्याविषयी असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन घाटंजी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी हाकलून देतात असा आजवरचा अनुभव आहे हे विषेश.
सायबर व तांत्रिक स्वरूपातील गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीसांची जिल्हास्तरावर विषेश शाखा आहे. तरी देखिल तक्रारकर्त्याना धाकदपट करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभिर आहे. तक्रार न नोंदविल्याने गुन्हेच घडत नाहीत हे दर्शविण्याचा हा केविलवाना प्रकार कुठवर चालणार याचा विचार करणे गरजेचे आहे.
साभार :- देशोन्नती 

No comments:

Post a Comment