Pages

Showing posts with label फसवणुक. Show all posts
Showing posts with label फसवणुक. Show all posts

Friday, 16 November 2012

घाटंजीच्या तिरूपती जिनींग मध्ये वजनकाट्यात तफावत

मनसेच्या हस्तक्षेपानंतर वजनकाटा बंद
कापसाच्या सौदा पट्टीतही खोडतोड

कापसाच्या खरेदीचा हंगाम जेमतेम सुरू झाला असतांना घाटंजीच्या तिरूपती कॉटन मॉडर्न जिनिंगमध्ये शेतक-यांची लुट करण्याचा सुरू असलेला कार्यक्रम मनसेच्या हस्तक्षेपामुळे उधळल्या गेला. 
शेतक-यांनी घरून मोजुन आणलेल्या वजनात व जिनिंगमध्ये केलेल्या मोजणीत वजनामध्ये सुमारे ४५ किलोची तफावत असल्याचे काही शेतक-यांच्या निदर्शनास आले. संबंधीतांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांना याबाबत कळविल्यावर त्यांनी जिनिंगमध्ये येऊन सर्वांसमक्ष वजनकाट्याची तपासणी करण्याची मागणी केली. मापारी व बाजार समितीच्या उपस्थितीत प्राथमिक तपासणी केली असता ४६ किलोची तफावत दिसुन आली. तसा पंचनामाही यावेळी करण्यात आला. मात्र काही कालावधी नंतर पुन्हा काट्याची तपासणी करून पंचनामा करण्यात आला त्यावेळी ही तफावत केवळ १ ते २ किलोंची होती. त्यामुळे बाजार समितीचा कोणता पंचनामा योग्य होता याबाबत साशंकता निर्माण झाली असल्याचा आरोप धांदे यानी केला. 
जिनिंगच्या कर्मचा-याने वजनकाट्याला विशिष्ट ठिकाणी छेडछाड करताच वजनात असलेली तफावत अत्यंत कमी झाल्याचा आरोप शेतकरी व मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आला. हा प्रकार उघड झाल्यावर संतापलेल्या जिनिंग मालकाने मी आता एकाही गाडीचा कापुस घेणार नाही. सगळ्या परत घेऊन जा अशी दर्पोक्ती केली. यावेळी मनसे कार्यकर्ते व जिनिंग मालक यांच्यात शाब्दीक बाचाबाची सुद्धा झाली. बाजार समितीच्या मार्वेâट यार्डावर लिलाव झाल्यानंतर कापसासाठी ठरविण्यात आलेला भाव कापुस सौदा पट्टीवर लिहिण्यात येतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची खोडतोड नियमानुसार करता येत नाही. मात्र व्यापारी व जिनिंग मालक बहुतांश शेतक-यांच्या सौदा पट्टीवरील ठरविलेला कापसाचा दर खोडून त्यामागे त्यापेक्षा कमी दर लिहितात. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक फसवणुक होत असल्याचा आरोप धांदे यांनीr केला. पुराव्यादाखल त्यांनी काही शेतक-यांच्या खोडतोड केलेल्या कापुस सौदा पट्या सुद्धा दाखविल्या.
केवळ तिरूपती कॉटन जिनिंगमध्येच नव्हे तर तिरूपती अ‍ॅग्रोसह ईतरही जिनिंगच्या वजनकाट्यांमध्ये तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी व संबंधीत विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी ही बाब गंभिरतेने घ्यावी अशी शेतक-यांची मागणी आहे. तांत्रिक बिघाडाच्या गोंडस नावाखाली होत असलेल्या शेतक-यांच्या फसवणुकीची तज्ञांमार्पâत चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत बाजार समितीचे सचिव कपील चन्नावार यांची प्रतिक्रीया घेतली असता सदोष वजनकाट्याची दुरूस्ती होई पर्यंत या जिनिंगमधील वजनकाटा बंद करण्यात आला असुन शेतक-यांची फसवणुक होणार नाही यासाठी दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

साभार :- देशोन्नती 

Sunday, 11 November 2012

लाखोंचे आमिष अन मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल फसवेगिरी सुरू

फसवणुकीच्या तक्रारींना पोलीस दरबारी किंमत नाही

लाघवी भाषा, अधिकृतपणाचा आव आणी प्रामुख्याने ग्रामिण भागातील नागरीकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन मोबाईल च्या माध्यमातून फसवणुक करण्याचा ऑनलाईन गोरखधंदा सध्या तेजीत आहे. बनावट नावाने बँक खाते उघडून आधुनिक प्रणालींचा उपयोग करून चालणारा बिनभांडवली व कोणतीही जोखीम नसलेला हा अवैध व्यवसाय चांगलाच पसरत चाललाय. एकट्या घाटंजी तालुक्यातूनच गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत आमिषाला बळी पडलेल्या लोकांची लाखो रूपयांनी फसवणुक झाली आहे. आपली फसगत झाल्याने लोकलाजेखातर अनेकजण तक्रारीसाठी पुढेच येत नाहीत. अन जे कोणी हिंमत दाखवून पुढे येतात व पोलीसांकडे फिर्याद नोंदविण्यासाठी जातात त्यांना पोलीसांकडून अक्षरश: धुडकावून लावण्यात येते. स्थानिक पोलीसांना अशा प्रकरणांचा तपास करणे खरंच कठिण आहे. मात्र तरी स्थानीक पोलीसांनी किमान फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सायबर गुन्हे शाखांकडे देणे श्रेयस्कर ठरेल.  मात्र पोलीसांनी या गंभिर प्रकाराकडे असेच दुर्लक्ष केले तर फसवणुक करणारे हे रॅकेट आणखी बळकट होत जातील. घाटंजी तालुक्यातील झटाळा येथिल एका युवकाला नुकताच या रॅकेटने दहा हजारांनी गंडा घातला आहे. सदर युवकाला त्याच्या मोबाईल नंबरवर ९२३०४५२८३०४ या क्रमांकावरून कॉल आला. आयडीया कंपनीकडून काढ़ण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकाला २५ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र त्यासाठी प्रोसेसिंग फिच्या स्वरूपात १६ हजार रूपयांची रक्कम स्टेट बँकेच्या ३२१०६७८१६०१ या खात्यात जमा करावे लागतील अशी अट ठेवण्यात आली. मात्र सदर युवकाने त्यांना आपल्याकडे सध्या केवळ १० हजार रूपयेच असल्याचे सांगितल्यावर निदान तेवढी रक्कम तरी भरा असे त्याला सांगण्यात आले. रक्कम खात्यात जमा करताच ती त्वरीत काढण्यात आली. त्यानंतर दोन तासांनी परत त्याला दुस-या एका क्रमांकावरून कॉल आला. व पुन्हा त्या खात्यात १० हजार रूपये भरा व या ईमेल वर तुमची कागदपत्रे पाठवा एका तासात हे न केल्यास ही २५ लाखांची लॉटरी दुस-या क्रमांकाला देण्यात येईल अशी भिती त्या युवकाला दाखविण्यात आली. 
यावेळी मात्र सदर युवकाने काही मित्रांकडे याविषयी  विचारणा केली असता हा संपुर्ण फसवणुकीचा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने या प्रकाराची लेखी तक्रार करण्यास घाटंजी पोलीस स्टेशन गाठले. मात्र येथिल ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर यांनी त्या युवकाची तक्रार समजुन घेण्या ऐवजी, ‘तुम्ही अशी फाल्तुची कामे करताच कशाला? आम्ही यामध्ये काय करणार? निघा येथुन लवकर.’ अशी मुक्ताफळे उधळून तक्रारकर्त्यास तक्रारीची पोच पावती न देताच पिटाळून लावले. अनेक गंभिर घटनांची तक्रार करण्यास गेलेल्यांना त्यांच्या कायद्याविषयी असलेल्या अज्ञानाचा फायदा घेऊन घाटंजी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी हाकलून देतात असा आजवरचा अनुभव आहे हे विषेश.
सायबर व तांत्रिक स्वरूपातील गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीसांची जिल्हास्तरावर विषेश शाखा आहे. तरी देखिल तक्रारकर्त्याना धाकदपट करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभिर आहे. तक्रार न नोंदविल्याने गुन्हेच घडत नाहीत हे दर्शविण्याचा हा केविलवाना प्रकार कुठवर चालणार याचा विचार करणे गरजेचे आहे.
साभार :- देशोन्नती 

Wednesday, 15 August 2012

माजी जि.प.सदस्य काटपेल्लीवार विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल



शेतजमीन सौदे प्रकरणात ७ लाख रूपये घेऊन फसवणुक केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून पारवा पोलीसांनी माजी जि.प.सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार यांचेविरूद्ध कलम ४१७, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कुर्लीचे सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी या प्रकरणात न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रीया संहिता कलम १५६ (३) अन्वये घाटंजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंग संधु यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने गुन्हा दाखल करून ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जयप्रकाश काटपेल्लीवार यांचे कुर्ली येथिल शेत गट क्रं ४/१ जमिन आहे. यापैकी ४ हेक्टर ८० आर जमिन त्यामधील विहीर व विद्युत मोटरपंपासह विक्रीचा करार सौदेपत्र फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी यांचेसोबत दि. १९ मे २००९ रोजी झाला होता. ईसारा दाखल ७ लाख रूपये विक्रीचा करारनामा नोंदवुन घेतला. मात्र त्यानंतर ठरलेल्या तारखेवर काटपेल्लीवार हे दुय्यम निबंधक कार्यालयात जमिन खरेदी करून देण्यासाठी आले नाही. त्यामुळे त्यांनी सौदेपत्राच्या अटी नियमांचे पालन न करून फसवणुक केली आहे. त्यामुळे फिर्यादी अयनुद्दीन सोलंकी यांनी १३ जुलै रोजी पारवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र राजकीय दबावातून पारवा पोलीसांनी या प्रकरणात चौकशी केली नव्हती. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
साभार :- देशोन्नती