Pages

Tuesday, 19 July 2011

काष्ठशिल्पकलेतील घाटंजीचा "हुसेन"







कलाकार हा परिसासमान असतो. जसे लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचे सोने होते तसेच एखाद्या वस्तुला कलाकाराच्या हाताचा स्पर्श होताच इतरांच्या दृष्टीने निरूपयोगी असलेली वस्तूही मनमोहक होऊन जाते. लाकडाचे फर्निचर बनवितांना निघणा-या चरपटांचे आपल्या दृष्टीने काय मोल? मात्र घाटंजीतील राजेंद्र देशमुख यांनी त्यातील सौंदर्य ओळखून एका वेगळ्याच कलेला जन्म दिला.
सहज मनात आलेल्या कल्पनेतुन आज त्यांनी स्वत:चे विश्व निर्माण केले आहे. प्रसिद्ध चित्रकार दिवंगत मकबुल फिदा हुसैन यांच्या सारखाच ‘लुक' असलेले राजेंद्र देशमुख हे काष्ठशिल्पकलेतले ‘हुसैन'च आहेत. ते पुर्वी पांढरकवडा एस.टी. आगारात वाहकपदी कार्यरत होते. ते नोकरीवर असतांना त्यांच्या शेजारी लाकडी फर्निचर बनविणारा व्यक्ती राहत होता. देशमुख यांना चित्र काढण्याचा छंद होता. त्यामुळे शेजारपाजारची मुले त्यांच्याकडे चित्रे काढुन घेण्यासाठी यायची. एकदा एका मुलाला चित्र काढुन देताना त्यांचे लक्ष लाकडी चरपटाकडे गेले. त्यावरील छटा पाहुन त्यांच्या मनात विचार घोळु लागले. त्यांनी काढलेल्या पक्षाच्या चित्रावर रंगाऐवजी चरपटावरील रंगसंगतीचा वापर करून ती चित्रावर चिकटवली. अन तिथुन सुरू झाला एका जगावेगळ्या कलेचा अद्भुत प्रवास. चित्रानंतर त्यांनी त्यापासुन वस्तू बनविल्या. सुरूवातीस गंमत म्हणुन सुरू केलेल्या या कलेचे त्यांना अक्षरश: वेड लागले. मनात आलेल्या कल्पनांना लाकडी चरपटांच्या माध्यमातुन आकार देतांना ते त्यामध्ये हरवुन जात असत. मात्र नोकरीमुळे कलेला अपेक्षीत वेळ देऊ शकत नसल्याने त्यांना नोकरीची अडचण वाटायला लागली. अखेर २००१ मध्ये एस. टी. च्या वाहकपदाचा राजीनामा देऊन थेट घाटंजीची तिकीट काढली. अन ते कलाविश्वात रममाण झाले. लाकडी चरपटे व  फेविकॉल वापरून त्यापासुन एकापेक्षा एक सुरेख अन अकल्पनीय वस्तु साकारल्या. भिंतीवर लक्ष वेधुन घेणारे वॉलपीस, जुन्या जमान्यातील ग्रामोफोन, पुâलदाण्या, अशा एक ना अनेक नित्योपयोगी व शोभेच्या वस्तू त्यांनी बनविल्या आहेत. आज त्यांच्या संग्रही हजारो वस्तुंचे भांडार झाले आहे. या वस्तूंचे संग्रहालय उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
त्यांची पत्नी सौ. सुनंदा व पुत्र राहुल यांचा सुद्धा या कलेला हातभार असतो. त्यांच्या पत्नीने लाकडी चरपटापासुन बनविलेल्या रिंग पासुन १४५  फुट लांब साखळी बनविली आहे. या साखळीत सुमारे २५ हजार रिंग चा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारची जगातील सर्वात लांब साखळी बनविणार असल्याचे ते म्हणाले. अरूंद तोंडाच्या बाटलीमध्ये विवीध कलाकृती साकारण्याचे तंत्रही त्यांनी अवगत केले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या २४५ बाटलीतील कलाकृती त्यांनी तयार केल्या आहेत. आजवर त्यांनी दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगलोर यासह विवीध ठिकाणी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. कलाकार हा समाजाचे प्रतिबिंब कलेतून साकारतो. समाजातील सत्य पुढे आणतो. त्यामुळेच अनेकदा त्यांचेवर टिका होते. सत्यता असलेल्या कलाकृती वादग्रस्त ठरतात. समाजाने कलाकाराची भावना समजुन घ्यावी अशी अपेक्षा राजेंद्र देशमुख व्यक्त करतात.

शब्दांकन 
अमोल राउत, घाटंजी 



संपर्क 
राजेंद्र देशमुख
Mobile No. 9850761464

4 comments:

  1. Its really great feeling while watching this blog.... please keep it up...

    ReplyDelete
  2. आम्हा घाटंजी कराना याचा अभिमान आहे की घाटंजीत सुद्धा असे उच्च कोटीचे कलाकार आहे. आमचे देशमुख काकाना विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  3. Khuppach Chann...... Apratim... Keep It Contd...

    ReplyDelete
  4. Ghatanji Kharach apratim kalakaranchi khan ahe..
    Prasad Khaparde, Ashok Giri, Vijay Durutkar, Bhalerao Sir, Ashok Marawar, Balhal Sir, Pramod Thakare, Rajendra Deshmukh.... he sagale kalakar Ghatanjitalya nakshtratil tejomay tare ahet... vinanti ahe ki sagalyancha parichay dyawa...

    ReplyDelete