बसस्थानकाकडे जाणाया रस्त्यावर बघ्यांची गर्दी...येणारा प्रत्येकजण येथे थांबुन विचार करीत परतायचा की, हे झालंच कसं ? वादळात मुळासकट उन्मळुन पडलेलं भलं मोठं झाड अचानक दोन महिण्यानंतर उभं कसं झालं ? हा निसर्गाचा चमत्कार की आणखी काही ? एक ना अनेक प्रश्नांनी चर्चेला पेव फुटले होते.
दि. १९ मे रोजी घाटंजी परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळुन पडले होते. त्यात बसस्थानकाकडे जाणा-या रस्त्यावरील हे भलेमोठे झाड सुद्धा जमिनीवर कोसळले होते. हे झाड रस्त्यावरून हटवायला सार्वजनिक बांधकाम विभागाला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होती. एस.टी. महामंडळाच्या बसेस सुद्धा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. रहदारीचा रस्ता असुनही येथे विद्युत दिव्यांची व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी हा रस्ता अंधाराच्या हवाली होतो. हे झाड हटविण्यासाठी सा.बां.विभागाकडुन अक्षम्य हलगर्जीपणा झाला. या दरम्यान मनोज तोडकर हा इसम रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर पडलेल्या झाडावर जाऊन आदळला. सुमारे एक ते दिड महिना मृत्युशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्युस या विभागाचा निष्काळजीपणाच कारणीभुत आहे हे निश्चित. या दोन महिण्यांच्या कालावधीत झाडाचे खोड रस्त्याच्या कडेला पडून होते. आता अचानक एका रात्रीतुन हे झाड उभे झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. कोणी म्हणतो की, पावसामुळे माती खचल्याने झाड उभे झाले. मात्र एवढे अवाढव्य झाड सरळ अवस्थेत उभे राहीलच कसे?
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मेहेत्रे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता सुरूवातीला ते म्हणाले की, झाडाचा लिलाव करावयाचा असल्याने ते क्रेनच्या साहाय्याने उभे केले आहे. लवकरच ते तिथुन हटविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र अवघ्या काही वेळातच त्यांनी पुन्हा संपर्क करून सांगीतले की, या झाडाची लिलावप्रक्रिया झाली आहे. मात्र कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. ते झाड कुणीही उभे केले नसुन आपोआपच ते सरळ झाले आहे असे ते म्हणाले. त्यामुळे ‘झाड’ प्रकरणाचे गुढ अधिकच वाढले आहे. रात्रीच्या वेळी क्रेनच्या साहाय्याने झाड उचलण्यात आल्याचे काही लोक सांगत आहेत. या झाडाची गोलाई अंदाजे ३०० सेंटीमीटर आहे, लांबी १५ फुट तर वजन सुमारे ४ टन आहे. एवढे अवाढव्य झाड आपोआप उभे राहु शकत नाही असा कयास वर्तविल्या जात आहे. आज दिवसभर अचानक उभ्या राहिलेल्या या झाडाची चांगलीच चर्चा घाटंजी शहरात सुरू होती.
साभार :- देशोन्नती
No comments:
Post a Comment