नातेवाईकांचा रोष तक्रारकर्त्यांवर
एक आरोपी अद्यापही फरारच
घाटंजी पोलीसांची दुटप्पी भुमिका
भारत निर्माण योजनेत लाखोंच्या अपहाराचा आरोप असलेल्या योजनेच्या सचिव सखुबाई पांडुरंग कचाडे यांचा ह्नदयविकाराच्या झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. त्यांना नुकताच उच्च न्यायालयाकडुन अटकपुर्व जामिन मंजुर झाला होता. वासरीचे माजी सरपंच व योजनेचे अध्यक्ष दत्ता देवसिंग जाधव आणी मृतक सखुबाई कचाडे यांच्यावर भारत निर्माण योजनेत सुमारे १२ लाखांची अफरातफर केल्याचा आरोप आहे.
जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अभियंत्यांनी केलेल्या चौकशीत अपहार झाल्याची बाब सिद्ध झाली होती. मात्र त्यानंतर घोटाळ्यांना प्रोत्साहन देणा-या स्थानिक जि.प.सदस्याचा दबाव व घाटंजी पोलीसांच्या ‘कठपुतली' कारभारामुळे गुन्हा दाखल होण्यास तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला. आपल्या गॉडफादरच्या आदेशा शिवाय कोणतेही काम न करणा-या घाटंजी पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराने दिड महिन्यांपासुन आरोपींना अटक केली नाही. या आरोपींचा अटकपुर्व जामिन दोन वेळा नामंजुर झाला. शेवटी उच्च न्यायालयात सखुबाई कचाडे यांना जामिन मिळाला. मात्र दत्ता जाधव याचा अटकपुर्व जामिन फेटाळण्यात आला. एवढा कालावधी होऊनही घाटंजी पोलीसांना आरोपी सापडत नाहीत हे संशयास्पदच आहे.
आरोपी दत्ता जाधव हा आतापर्यंत त्याच्या माहुर येथिल नातेवाईकाकडे राहात होता. घाटंजी पोलीसानांही ही माहिती होती. मात्र राजकारण्यांच्या ‘खुट्याला’ बांधुन असल्याने पोलीस त्याला अटक करीत नसल्याची चर्चा आहे. या दोन्ही आरोपींवर भा.दं.वि.च्या ४४६,४०९,४२०,४७७ (अ),४६९,३४ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. म.न.से.चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती. अपहारातील आरोपी सखुबाई कचाडे यांच्या नातेवाईकांनी या मृत्यूस तक्रारकर्ते जबाबदार असल्याचा आरोप केला असुन तशी तक्रारही घाटंजी पोलीस स्टेशनला केली आहे.
घाटंजी पोलीसानी अत्यंत तत्परतेने वासरीच्या विद्यमान सरपंच प्रियंका प्रशांत धांदे, उपसरपंच श्रीहरी सुर्यकांत निबुधे, प्रशांत भाऊराव धांदे, अशोक सुर्यकांत निबुधे, भोपीदास हेमला राठोड यांचेविरूद्ध भा.दं.वि.च्या ३०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारकर्त्यांनी कथितपणे धाकदपट केल्याचा त्यांचा आरोप आहे. विषेश उल्लेखनिय म्हणजे या अपहारातील दोन्ही आरोपी तक्रार केल्यास आत्महत्या करून त्यास ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व सचिवांना जबाबदार धरण्याची धमकी देत होते. अशा आशयाची लेखी तक्रार वासरी ग्रा.पं.च्या ठरावासह ८ मार्च रोजीच करण्यात आली होती. एकंदरीतच घाटंजी पोलीसांचा कारभार आता बेलगाम झाला असुन वरिष्ठांचे त्यावर नियंत्रण नसल्याचेच विवीध घटनांवरून सिद्ध होत आहे.
पोलीस अधिक्षकांकडून ठाणेदाराची कान उघाडणी
लाखो रूपयांच्या अपहार प्रकरणात राजकीय आदेशावरून आरोपींना संरक्षण देणारे घाटंजीचे ठाणेदार बाबुराव खंदारे यांची नुकतेच रूजू झालेल्या पोलीस अधिक्षकांनी चांगलीच कान उघाडणी केल्याची माहिती आहे. या घोटाळ्यातील महिला आरोपीचा मृत्यू झाल्यावर राजकीय दबावातुन तक्रारकर्त्यांविरोधातच तडकाफडकी गुन्हे दाखल केले होते. एरवी अशा प्रकरणात दिवसेंदिवस तक्रार चौकशीत ठेवणा-या घाटंजी पोलीसांनी गुन्हे दाखल करण्याची घाई केली यावर पोलीस अधिक्षकांनी ठाणेदाराला धारेवर धरून प्रकरणातील आरोपी एवढे दिवस फरार कसे याचाही जाब विचारल्याची माहिती आहे. म.न.से.च्या शिष्टमंडळाने याबाबत पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात योग्य चौकशी करण्याची मागणी केली.
No comments:
Post a Comment