Pages

Sunday, 24 July 2011

घाटंजी तालुक्याची ओळख असलेले अंजीचे प्राचीन नृसिंह मंदिर



घाटंजी शहरापासुन सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेले अंजी हे गाव केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रालगतच्या राज्यांमध्येही सर्वदुर प्रसिद्ध आहे. पुर्वीचे कुन्तलापूर व आजचे अंजी हे गाव ओळखल्या जाते ते येथे असलेल्या प्राचिन व जागृत नृसिंह मंदिरामुळे. सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या हेमाडपंथी मंदिरात भगवान नृसिंहाची गंडगी शिळेच्या पाषाणाची मुर्ती विराजमान आहे. अंजी या गावाला पुरातन इतिहास आहे. कुन्तलापूर (अंजी) चा चंद्रहास नावाचा राजा होता. चंद्रहास राजाचा इतिहास असा की, केरळ देशाचा राजा प्रसोभ याचा शत्रुंनी युद्धभुमीवर वध केला. त्यामुळे त्याच्या सर्व राण्या सती गेल्या. त्यावेळी राजाला चंद्रहास नावाचा दोन महिन्यांचा मुलगा होता. अनाथ झालेल्या चंद्रहासला त्याची दाई कुन्तलापूरला घेऊन आली. ती भिक्षा मागुन बालकासह आपले उदरभरण करीत असे. काही काळाने ती दाई मरण पावली. त्यानंतर चिमुकला चंद्रहास उपाशी तापाशी नगरात फिरत असे. त्याच्या चेह-यावरील राजघराण्याचे तेज व सौंदर्य पाहुन लोक त्याला अन्नवस्त्र देत असत. एकदा खेळता खेळता त्याला शालीग्राम (नृसिंह)ची मुर्ती सापडली. तो त्याची नित्यनेमाने पुजा करायला लागला. पुजेनंतर तो ती मुखात ठेवत असे. अंजी (कुन्तलापूर) चा राजा कुन्तलेश्वर होता. त्याचा दुष्टबुद्धी नावाचा प्रधान होता. त्यांनी एकदा ब्राम्हणभोज ठेवला असता चिमुकला चंद्रहास प्रधानाला रस्त्यावर खेळताना दिसला. त्याला चंद्रहासची दया आली. त्याला कडेवर घेऊन भोजनाला आणले. भोजन झाल्यावर चंद्रहास प्रधानाच्या मांडीवर बसला होता. त्यावेळी ब्राम्हणांनी मंत्राक्षता टाकुन त्याला आशीर्वाद दिला की, हा पुत्र हे राज्य चांगल्या रितीने चालवेल. प्रधान हे वाक्य ऐकुण मनोमन नाराज झाला. त्याला त्या बालकाप्रती असुया वाटायला लागली. त्याने चंद्रहासला संपविण्याचा निर्धार केला. त्याला ठार करण्यासाठी दुराचा-यांना पाचारण करण्यात आले. मारण्यासाठी शस्त्र उपसताच चंद्रहासने मुखातुन नृसिंहाची मुर्ती काढुन मदतीसाठी धावा केला. परमेश्वर भक्ताच्या रक्षणार्थ तेथे अवतरले. चंद्रहासला त्या संकटातुन सोडवले. पुढे हाच चंद्रहास कुन्तलापूर नगरीचा राजा झाला. त्याने अंजी येथे विष्णुपाषाणाची नृसिंह मुर्ती बसविली अशी आख्यायीका आहे.
पुर्वमुखी असलेल्या या मुर्तीची उंची साडेचार फुट आहे. मुर्तीच्या मस्तकावर किरीट आहे. मस्तकाच्या मागे प्रभावळ असून त्यावर दशावताराच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. संपुर्ण भारतात केवळ अंजी येथे अष्टभुजा असलेली नृसिंहाची मुर्ती आहे. हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहे. तर दोन हातांनी मांडीवर घेतलेल्या हिरण्यकश्यपुचे पोट विदारण केलेले आहे. मुर्तीचा एक हात हिरण्यकश्यपुच्या शेंडीकडे व एक हात पायाकडे आहे. पायाकडील बाजुला डावीकडे लक्ष्मी व उजवीकडे भक्त प्रल्हादाची मुर्ती आहे. त्याच्याच बाजुला कयाधु व भगवान शंकराची मुर्ती आहे. नृसिंहाची ही मुर्ती उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे. मंदीराच्या पुर्वेकडील भिंतीवर एक झरोखा आहे. या झरोक्यातुन सकाळी सुर्याची किरणे थेट नृसिंह मुर्तीचे चरणस्पर्श करतात.
वैशाख महिण्यात येथे सतत दहा दिवस नृसिंह जन्माचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.
या दहा दिवसात लाखो भक्त अंजी येथे येतात. या निमित्य काढण्यात येणा-या मिरवणुकीच्या वेळी गावात अत्यंत मांगल्यमय वातावरण असते. प्रत्येक घरासमोर मिरवणूकीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढलेल्या असतात. नृसिंह मंदिराचे व्यवस्थापन १८६५ पासुन  चोपडे घराण्याकडे आहे. वारसा पद्धतीप्रमाणे सन १९४० ते २००४ पर्यंत कै. मोहनीराज नारायणराव चोपडे हे श्री. नृसिंह देवस्थानाचे विश्वस्त होते. त्यानंतर त्यांचे जेष्ठ चिरंजीव कै. अनंत मोहनीराज चोपडे यांनी ही जबाबदारी सांभाळली. सध्या गोपाल अनंतराव चोपडे हे मंदिराचे विश्वस्त म्हणुन काम पाहात आहेत.

  

2 comments:

  1. Ya mandirat janyasathi itkya varshanantarhi changlya rastyachi soy nahi. Yasathi kahitari karayla pahije.

    ReplyDelete
  2. Its good information....
    Thank you for sharing with us.
    If you have any more detail regarding temple please upload it for others.

    ReplyDelete